मुंबई विद्यापीठाचे 'मनमोहनसिंग'

    दिनांक  04-Aug-2017   


‘दै. मुंबई तरुण भारत’ व ‘विवेक समूहा’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी गेल्या आठवड्यात लिहिलेल्या ‘सदिच्छा आणि व्यवस्थापन’ या लेखात एखाद्या व्यक्तीचा केवळ हेतू चांगला असणे व त्याचे व्यवस्थापन करता येणे यातील फरक, आव्हाने व परिणाम यावर विस्तृतपणे विवेचन केलं आहे. ‘शिवाजी महाराजांच्या पोवाड्यापेक्षा त्यांच्या यशस्वी व्यवस्थापनाचे मर्म जरी जाणून घेतले तरी सज्जन माणसांच्या व्यावहारिक अपयशांच्या शोकांतिका कमी होतील. अशी माणसे जेव्हा अयशस्वी होतात तेव्हा केवळ त्यांच्यावरचा लोकांचा विश्वास कमी होतो असे नाही, तर चांगली माणसे जगात काही चांगले करू शकतात यावरचाच विश्वास कमी झालेला असतो.’ अशी या लेखातील शेवटची वाक्यं आहेत. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या निकालांच्या निमित्ताने जी काही परिस्थिती उद्भवली आहे, त्याचं वर्णन करण्यासाठी ही वाक्यं अत्यंत चपखल ठरावीत.

 

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीवरून सध्या अभूतपूर्व असा गोंधळ सुरू आहे. पुरेशा तयारी अभावी ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासणीचा घाट घातला गेला आणि कोणतीही यंत्रणा नसणं व प्राध्यापक-कर्मचाऱ्यांना या पद्धतीचा अनुभव नसणं यामुळे निकाल जाहीर करण्याची वेळ आली तरी लाखो उत्तरपत्रिकांची साधी तपासणीही पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे आता विद्यापीठावर रोज नव्याने ‘डेडलाईन्स’ देत बसण्याची वेळ आली. ३१ जुलै त्यानंतर आता ५ ऑगस्ट आणि ५ ऑगस्टनंतर कदाचित आणखी पुढे. यामुळे हजारो विद्यार्थी परीक्षांच्या निकालाच्या प्रतीक्षेत असून त्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे. परदेशात शिक्षण घेण्याच्या संधीही आता वेळ उलटून गेल्याने मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. या सगळ्या परिस्थितीची जबाबदारी अर्थातच कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या माथ्यावर येऊन पडली असून यामुळे डॉ. देशमुख सध्या सगळ्यांच्याच ‘हिटलिस्ट’वर आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रापासून अर्थातच शैक्षणिक क्षेत्रात असं सर्वत्र डॉ. देशमुख टीकेचे धनी ठरले आहेत. सरकारलाही विद्यापीठाच्या या अवस्थेवर उत्तरं देणं अवघड झालं असून त्यामुळे देशमुखांवर सरकारी नाराजीही तीव्र असल्याचं म्हटलं जात आहे. देशमुखांचं पुढे काय होणार याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात असून कित्येकजण देशमुखांची गच्छंती अटळ असल्याचं खात्रीशीरपणे सांगत आहेत.

 

हे सगळं का झालं याबाबत गेल्या १०-१२ दिवसांत बरंच लिहिलं गेलं आहे. किंबहुना ज्याप्रकारे पुरेशा तयारीअभावी हा ऑनलाईन परीक्षांचा निर्णय अचानकपणे घेतला गेला त्यानंतर हे असं होणार हे निश्चित होतंच. पण याचबरोबर ज्याप्रकारे डॉ. संजय देशमुख यांच्यावर नामुष्की ओढवली आहे त्यातून आपल्या सर्वांनाच नव्यानं एक धडा मिळाला आहे. नेतृत्व हे केवळ सदिच्छांच्या जोरावर उभं राहत नाही तर उत्तम व्यवस्थापन व वेळप्रसंगी कठोरातील कठोर पातळीवरील निर्णय घेण्याच्या व तो पेलावण्याच्या क्षमतेवरच उभं राहतं. तुमची विचारसरणी काय आहे, त्याहीपेक्षा ती राबवण्याची तुमच्याकडे क्षमता आहे का, ही गोष्ट जास्त महत्वाची ठरते. तुम्ही व्यक्तिगत आयुष्यात कसे आहात, तुमचं व्यक्तिमत्व किती आकर्षक वगैरे आहे याहीपेक्षा तुम्ही ज्यांना उत्तरदायी असता त्या लोकांचे प्रश्न कसे सोडवता, ‘रिझल्ट्स’ कसे देताच यावरून तुमची परीक्षा होत असते. अन्यथा तुमचा संजय देशमुख होऊ शकतो हा तो धडा आहे. डॉ. देशमुख मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणजे एका अर्थाने विद्यापीठाचे नेतेच. राज्यातीलच नव्हे तर देशातील एका महत्वाच्या विद्यापीठाचे प्रमुख म्हणून हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी खांद्यावर असलेले कुलगुरू. साधारण २ वर्षांपूर्वी देशमुख यांची विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली. त्यात देशमुख हे अतिशय शांत, सज्जन, सुस्वभावी व्यक्ती म्हणून परिचित. दोन महिन्यांपूर्वी देशमुखांना ओळखणाऱ्या कोणालाही विचारलं तरी ‘एक भला माणूस’ हीच प्रतिक्रिया मिळायची. मात्र, अचानक २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षाची अखेर जवळ आली आणि परीक्षांच्या निकालाच्या निमित्तानं हा परीक्षा विभागाचा सावळागोंधळ समोर आला. आणि हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य पणाला लागल्यावर डॉ. देशमुखांच्या मागे असलेल्या या सदिच्छा मात्र कामी आल्या नाहीत.

 

सदिच्छा व व्यवस्थापनाबाबत चर्चा करत असताना डॉ. देशमुख यांच्यावर ओढवलेल्या या परिस्थितीत काही मोठ्या नेत्यांची उदाहरणं मांडण्याचा मोह आवरत नाही. देशाचे गेले सलग तीन पंतप्रधान म्हणजे अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद मोदी. अटलबिहारी वाजपेयी हे अत्यंत शांत-संयमी, लोभस, कवीमनाचं व्यक्तिमत्व. अमोघ वक्तृत्व आणि सर्वांना हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्व यांच्या जोरावर वाजपेयींनी कोट्यावधी जनतेच्या मनावर कित्येक दशकं राज्य केलं. मात्र, याच्या जोडीनं वाजपेयींकडे एका नेत्याकडे आवश्यक असलेलं मुत्सद्दीपण आणि धोरणीपणही होतं, ज्याच्या जोरावर त्यांनी देशाच्या इतिहासातील पहिलं कॉंग्रेसेतर सरकार पूर्ण पाच वर्षं चालवून दाखवलं. नरेंद्र मोदींनी गुजरात दंगलींच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं बारा-तेरा वर्षं होणारी बोचरी टीका सहन केली, डगमगून न जाता नेटानं आपली वाटचाल पुढे चालू ठेवली आणि अखेर देशाच्या पंतप्रधानपदी ऐतिहासिक अशा बहुमतानं ते विराजमान झाले. जनसामान्यांना कदाचित न पटणाऱ्या मात्र देशाच्या हितासाठी आवश्यक अशा नोटबंदीसारख्या निर्णयांची कठोरपणे अंमलबजावणी मोदींनी करून दाखवली आणि तोही निर्णय प्रचंड यशस्वी ठरला. आज मोदींची लोकप्रियता दररोज नव्यानं वाढतच चाललेली दिसते. दुसरीकडे मनमोहन सिंग, एक अत्यंत विद्वान, चारित्र्यवान, सज्जन व्यक्तिमत्व म्हणून परिचित. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्यानंतर सर्वाधिक काळ देशाचं पंतप्रधानपद भूषवण्याचा बहुमान मनमोहन सिंग यांना मिळाला. मात्र, एवढं होऊनही मनमोहन सिंगांच्या कारकीर्दीच्या अखेरीस ‘इतिहासच माझं मूल्यमापन करेल’ असं म्हणत भावनिक आवाहन करण्याची वेळ आली. नेतृत्व राज्यव्यवस्थेत व पक्षाच्या अंतर्गत कारभारात एक कठोर प्रशासक म्हणून काहीही वचक निर्माण न करता आल्यानं परिस्थिती सिंग यांच्या हाताबाहेर गेली आणि २०१४ पर्यंत व पुढेही काय झालं हे आपल्यासमोर आहेच. वाजपेयी, सिंग आणि मोदी ही तीनही खूपच मोठी उदाहरणं. पण अशाच प्रकारची शेकडो उदाहरणं प्रत्येक छोट्यामोठ्या क्षेत्रात प्रत्येक समूहात असतात आणि त्या सर्वांना ही तत्व लागू पडतात. आणि म्हणूनच मुंबई विद्यापीठाच्या या सद्यस्थितीबाबत चर्चा करत असताना ‘अत्यंत चांगला माणूस’ असलेले डॉ. देशमुख मुंबई विद्यापीठाचे ‘मनमोहन सिंग’ ठरले असल्याचं खेदानं नमूद करावं लागतं.

 

आता या धक्क्यातून सावरून, आलेली आपत्ती निस्तरून पुन्हा पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी नव्यानं उभं राहायचं आव्हान मुंबई विद्यापीठासमोर आहे. प्रा. डॉ. नीरज हातेकर यांच्यासारख्या अत्यंत विद्वान, व्यासंगी प्राध्यापकानंही या सगळ्या गोंधळाला कंटाळून, एका सात्विक संतापातून विद्यापीठापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला यावरून परिस्थिती किती गंभीर बनली आहे याची कल्पना येईल. हातेकर निवृत्त होतात तर या सगळ्याला जबाबदार असलेले डॉ. देशमुख अद्याप पदावर राहूच कसे शकतात, असाही प्रश्न आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे. कालांतरानं ही परिस्थिती सावरेल, निकालही कधीतरी लागतील, यातून विद्यापीठ प्रशासनही कदाचित धडा घेईल. डॉ. संजय देशमुखांचं काय होणार हेही येत्या काळात समजेलच. पण हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य पणाला लावणाऱ्या या परीक्षागोंधळाची घटना विद्यापीठाच्या इतिहासात कायमस्वरूपी एका कटू आठवणीच्या रुपानं नोंदली जाणार आहे, आणि याला संस्थेचा प्रमुख या नात्यानं जबाबदार असलेले डॉ. देशमुखांचंही नाव परत परत घेतलं जाणार आहे एवढं मात्र निश्चित..  

 

- निमेश वहाळकर