'केडीएमसी'चा चेन्नई पॅटर्न यशस्वी

    26-May-2025
Total Views | 9

Cleanliness Drive by Kalyan-Dombivali Mangarpalika got massive success

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 'चेन्नई पॅटर्न'चा प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत आहे. पालिका क्षेत्रातील 'ड' प्रभागात गेल्या दोन दिवसांत 'चेन्नई पॅटर्न' द्वारे राबविण्यात आलेली विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी ठरली आहे. या मोहिमेद्वारे कल्याण पूर्व येथील आत्माराम नगर परिसर, कमलादेवी महाविद्यालय मागील भाग, साईबाबा मंदिर गुजराती चाळ, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानासमोरील परिसर आणि मंगेशी संस्कार परिसर येथे गेल्या दोन दिवसांत रात्रीच्या सत्रात एकूण ३३५ टन कचरा उचलण्यात आला.

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 'ड' प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी ही संपूर्ण मोहीम 'सुमित एल्कोप्लास्ट' या घनकचरा व्यवस्थापन एजन्सीमार्फत राबविली. रात्रपाळीतील कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी योग्य नियोजन, यंत्रणाआणि मनुष्यबळ यांचा समन्वय साधण्यात आला होता.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रभाग क्षेत्र 'ड'चे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर, सुमित एल्कोप्लास्टचे सानु वर्गीस,
प्रवीण भोईर, युनिट ऑफिसर विकास सोनवणे व सुपरवायझर यांनी विशेष मेहनत घेतली आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही मोहीम वेळेत आणि गुणवत्तेने पार पडली.


शहर स्वच्छतेचा आदर्श उभा करण्याचा पालिकेचा प्रयत्न


कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ही 'स्वच्छ भारत अभियाना'च्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने कार्यरत आहे. केवळ साफसफाई न करता, नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करून शहर स्वच्छतेचा आदर्श उभा करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी, कचरा वेळेवर व योग्य पद्धतीने द्यावा आणि अशा उपक्रमांना सहकार्य करून स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यपूर्ण कल्याण-डोंबिवलीच्या निर्मितीत हातभार लावावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.

'चेन्नई पॅटर्न' मुळे कचरा व्यवस्थापनात सुधारणा


'केडीएमसी' 'चेन्नई पॅटर्न' मॉडेलचा अवलंब करून कचरा व्यवस्थापनात सुधारणा होताना दिसत आहे. ज्यामुळे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यास मदत होणार आहे. या मॉडेलमध्ये कचरा संकलनासाठी विशेष वाहनांचा वापर केला जात असून, कचरा वाहतुकीसाठी एक प्रभावी प्रणाली विकसित केली जाते.


संकलित कचऱ्याचा प्रभावी पुनर्वापर


दोन दिवसांत 'ड' प्रभागात एकूण ३३५ टन कचरा उचलण्यात आलेला असून, तो प्रक्रिया करण्यासाठी विशेष ठिकाणी पाठवला जाणार असून जिथे तो वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागला जाऊन त्याचा पुनर्वापर होणार आहे. 'चेन्नई पॅटर्न'चा हा एक महत्त्वाचा फायदा असून, कचऱ्यातील पुनर्वापरयोग्य साहित्य वेगळे करून त्यातून उपयोगी वस्तू तयार केल्या जाणार आहेत. ज्यामुळे कचरा कमी होऊन पर्यावरण राखण्यास मदतच होणार आहे. आता 'केडीएमसी' ने 'चेन्नई मॉडेल'चा प्रभावी अवलंब करण्यास सुरुवात केली असल्याने कल्याण-डोंबिवली शहर कचरामुक्त आणि स्वच्छ बनण्याच्या दिशेने योग्य पाऊल पडले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121