बंद खोलीत सापडला अभिनेत्याचा मृतदेह! शुटींगला न पोहोचल्याने सहकाऱ्यांनी उघडला दरवाजा

अभिनेते योगेश महाजन यांचे निधन

    20-Jan-2025
Total Views | 37

actor yogesh mahajan


मुंबई : ‘हिरवं कुंकू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते योगेश महाजन यांचे रविवार, दि. १९ जानेवारी रोजी गुजारतच्या उमरगाव येथे निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. ‘शिवशक्ति - तप, त्याग, तांडव’ या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी ते उमरगाव येथे गेले असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. शनिवारी सायंकाळी हिंदी मालिकेचे चित्रीकरण करत असतानाच महाजन यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि औषधे घेतल्यानंतर जवळच्या हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबले मात्र, रविवारी सकाळी शूटिंगसाठी न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेलचा दरवाजा तोडून पाहणी केली असता, ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मूळचे जळगावचे असलेले योगेश महाजन हे मराठी, हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले होते. ‘मुंबईचे शहाणे’ आणि ‘संसाराची माया’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. चित्रपटसृष्टीत महाजन त्यांच्या सहजसुंदर अभिनयासाठी ओळखले जायचे. लोकप्रिय अभिनेते योगेश महाजन यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अनेक सहकलाकार आणि चाहत्यांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पत्नी, मुलांसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121