कोंडी फुटणार! 'या' १२ ठिकाणी होतोय मुंबई लोकलचा विस्तार
विरार ते चर्चगेट, कल्याण - कसारा, पनवेल ते छ.शिवाजी महाराज टर्मिनस चोहोबाजूंनी विस्तारतेय मुंबई लोकल
14-Sep-2024
Total Views | 16
मुंबई : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुंबईत गणेश दर्शनासाठी आले असता त्यांनी मुंबई लोकलने प्रवास केला. यादरम्यान माध्यमांशी संवाद साधत अश्विनी वैष्णव यांनी मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. शुक्रवार, दि.१३ रोजी केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडुप दरम्यान लोकलने प्रवास केला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी २.३४ वाजताच्या अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलने द्वितीय श्रेणीच्या डब्यातून भांडुपपर्यंत प्रवास केला. त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना आणि रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी शहरातील एका गणेश मंडळालाही भेट दिली. यावेळी वैष्णव यांनी माध्यमांशी संवाद साधत मुंबई उपनगरात सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा ही दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईत १२ रेल्वे प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत.
सध्या मुंबई महानगर क्षेत्रात ३०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे आणि १६,२४० कोटी रुपयांचे एकूण १२ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
- मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला ५वी आणि ६ वी लाईन (१७.५ किमी) प्रकल्पाचा पहिला टप्पा
- परळ-कुर्ला (१०.१ किमी) डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- कल्याण-आसनगाव चौथ्या लाईन साठी (३२ किमी) भूसंपादन प्रगतीपथावर आहे ( पूर्णत्वाचे उद्दिष्ट : डिसेंबर २०२६)
- कल्याण-कसारा तिसऱ्या लाईनचा (६७ किमी) पहिला टप्पा आसनगाव - कसारा फेब्रु २०२५ पर्यंत व दूसरा टप्पा
- कल्याण आसनगाव डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. निळजे-कोपर दुहेरी कॉर्ड लाईन (५ किमी) प्रकल्प देखील प्रगतीपथावर आहे.
यामध्ये मुंबई रेल विकास कार्पोरेशन (MRVC) च्या प्रकल्पांचा देखील समावेश आहे.
- पनवेल- कर्जत (२९.६ किमी) उपनगरीय कॉरिडॉर ज्यांचे भराव काम, बोगदे आणि पूलाची कामे प्रगतीपथावर आहेत आणि डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहे.
- ऐरोली-कळवा उन्नत उपनगरीय कॉरिडॉर लिंक प्रकल्पाचा दिघा गाव स्टेशन हा टप्पा कार्यान्वित झाला आहे.
- कल्याण- बदलापूर ३री आणि ४थी लाईन (१४.०५ किमी) प्रकल्पाचे युटिलिटी शिफ्टिंग, माती भराव काम आणि पूलाचे काम प्रगतीपथावर आहे (टीडीसी: डिसेंबर २०२५)
- विरार-डहाणू रोड ३री आणि ४थी लाईन (६४ किमी) प्रकल्पाचे माती भराव काम आणि पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.
- बोरिवली-विरार ५व्या आणि ६व्या लाईनच्या (२६ किमी) प्रकल्पासाठी युटिलिटी शिफ्टिंग देखील चालू आहे (टीडीसी: डिसेंबर २०२७).
- पश्चिम रेल्वेचा मुंबई सेंट्रल-बोरिवली ६वी लाईन (३० किमी) प्रकल्प ज्यातील खार-गोरेगाव टप्पा (८.९ किमी) कार्यान्वित झाला आहे आणि उर्वरित गोरेगाव-बोरिवली (८.२ किमी) मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- नायगाव-जुचंद्र दुहेरी कॉर्ड लाइनचे (६ किमी) प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.
वैष्णव यांनी भांडुप स्थानकापर्यंत धीम्या लोकलने प्रवास केला आणि पुढील नियोजित कार्यक्रमासाठी तेथे उतरले. त्यांनी सांगितले की सर्व कर्मचारी माझे कुटुंबीय आहेत असे सांगितले व कर्मचाऱ्यांच्या विनंतीचा मान ठेवत त्यांच्यासोबत सेल्फी घेतला. यावेळी आमदार मिहीर कोटेचा, रेल्वे महाव्यवस्थापक धरमवीर मीना आणि विविध विभागांचे प्रधान मुख्य अधिकारी व रजनीश गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग यांसह इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.