जालना : विधानसभा निवडणूकीसाठी मराठा समाजातून अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. तसेच आपल्याला पारदर्शी चेहरा द्यायचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगेंनी विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून ते सर्व २८८ जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, "२९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी जर विधानसभा निवडणूक लढायची असं ठरल्यास आम्ही अपक्ष उमेदवार उभे करणार आहोत. आम्हाला एक पारदर्शी आणि नवीन चेहरा द्यायचा आहे. आमच्याकडे मतं आहेत. त्यामुळे कोणतंही चिन्ह असलं तरी गरज नाही," असेही ते म्हणाले.