आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'अहिल्याभवन' संपूर्ण देशात आदर्श ठरेल : मंत्री मंगल प्रभात लोढा

    13-Aug-2024
Total Views | 53
 
Lodha
 
मुंबई : मानखुर्द येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील पहिले ‘अहिल्या भवन’ उभारले जाणार असल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने चेंबूरमधील फाईन आर्ट्स सोसायटीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
 
जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून हे अहिल्या भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी ४७ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच ३५,५०० स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारले जाणार आहे. या अहिल्याभवनामध्ये मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत.
 
हे वाचलंत का? -  विधानसभा निवडणूक कधी होणार? वाचा सविस्तर...
 
यावेळी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "भारतात आज प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन उभारले जाणार आहे. महिला आणि बालकांच्या विकासासाठी शासनाची कटिबद्धता दर्शवणारे हे भवन फक्त राज्यातच नव्हे, तर देशात आदर्श ठरेल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहे. त्यांची शिकवण जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला आदरांजली देण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे कार्य केले जाईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
संकटात अडकलेल्या किंवा हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांना मानसिक व कायदेविषयक समुपदेशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या समुपदेशन केंद्रांच्या योजनेचे अद्ययावत समुपदेशन केंद्र या इमारतीत कार्यरत होईल. याद्वारे पीडित महिलांना आवश्यक ते समुपदेशन करून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोबतच महिलांना विविध कायदे, योजना व विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी २०० व्यक्तींची क्षमता असलेले अद्ययावत ऑडिटोरियम या संकुलात उभे राहणार आहे. त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांना मुंबईत हक्काचे विश्रामगृह या संकुलात उभारण्यात येणार आहे. याशिवाय महिला व बालकांच्या विविध विकासात्मक चळवळीसाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देखील या विश्रामगृहाचा लाभ घेता येणार आहे.
 
अहिल्या भवनाच्या परिसरात पुढीलप्रमाणे कार्यालये राहतील :
 
१. बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांचे एकूण २० कार्यालये या इमारतीत असतील.
२. महिला आयोगाचे मुंबई विभागीय कार्यालय.
३. बालहक्क आयोगाचे मुंबई विभागाचे कार्यालय.
४. बालकल्याण समिती :
५. बाल न्याय मंडळ :
६. महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे मुंबई जिल्ह्याचे कार्यालय
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121