मुंबई : विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केल्यानंतर आता यंदाचा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा सरकारने केली आहे. यावर्षी पहिल्यांदाच राज्य शासन उत्सवात सहभागी होणार असून यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.
गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “जगात आणि देशात आपल्या गणेशोत्सवाची ओळख सर्वात मोठा महोत्सव म्हणून झालेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे.”
यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, तालुका स्तरापासून राज्य स्तरावर धार्मिक प्रथा परंपरानुसार पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमात काम करणाऱ्या विविध गणेशोत्सव मंडळांना पारितोषिकाची घोषणा केली आहे. तसेच गिरगाव चौपाटीवर ड्रोन महोत्सव आयोजन करण्यात येणार असून पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई आणि राज्यातील सर्व भागात स्थानिक स्तरावर शक्य असेल त्या सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्यात येणार आहे.
घरबसल्या गणरायाच्या दर्शनासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मयावर्षीपासून घरबसल्या नागरिकांना गणरायांचे दर्शन व्हावे यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात भजनी मंडळांना भजनाच्या साहित्यासाठी लाखो रुपयांचे अनुदान देण्याची योजना घोषित करण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री आशिष शेलार यांनी दिली. तसेच पु. ल. देशपांडे कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या महोत्सवाचे नियोजन आणि समन्वय करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवात शासनाचा सहभाग काय असणार?राज्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन या कार्यक्रमांतून घडेल. हे कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर ज्या ठिकाणी मराठी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणीही आयोजित करण्यात येतील. तसेच मराठी भाषिक बहुल भारताबाहेरील काही देशामध्ये सांस्कृतिक कार्यक्रांचे आयोजन करण्यात येईल.
यासोबतच व्याख्यानमालेसह गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचेही आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील महत्त्वाची मंदीरे आणि सर्वजनिक गणेशोत्सवाच्या देखाव्यांचे ऑनलाइन दर्शन घरबसल्या व्हावे, यासाठी एक पोर्टल निर्माण करण्यात येईल. उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ अंतर्गत तालुका स्तरावर स्पर्धेद्वारे विविध पारितोषिके देण्यात येतील. घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो व्हिडिओ क्लिप्स पोर्टलवर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येईल. ज्या चित्रपटांमधून गणपती विषयक परंपरा, कला संस्कृती दर्शवली आहे, अशा चित्रपटांचा विशेष गौरव करण्यात येईल.
गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि नाणेयादरम्यान, गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि नाणे काढण्यात येईल. तसेच संपूर्ण राज्याभरातून गणपतीविषयक रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात येईल. ‘ड्रोन शो’चेही आयोजन करण्यात येईल. या राज्य महोत्सवाची माहिती संपूर्ण देशभर व्हावी यासाठी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ आणि समाज माध्यमे यांच्या माध्यमातून देशभरात प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल. तसेच आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. उत्सवाच्या दरम्यान प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई आणि सुशोभिकरण करणार.पारंपारिक भजन व आरती सादर करणाऱ्या भजनी मंडळांना साहित्य वाटप, अनुदान देणार. राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार. तसेच विसर्जन सोहळ्यामध्ये आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा तसेच वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार. राज्यात शिकत असणाऱ्या देशाबाहेरील विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी योजना, उपक्रम राबविण्यात येणार आहे.