मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मध्य प्रदेशातील मदरशांमध्ये (56 madrasas) हिंदू मुलांना इस्लामचे शिक्षण दिल्याप्रकरणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुख्य सचिव वीरा राणा यांना दिल्लीत बोलावले होते. मंगळवारी श्योपूरमधील जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार मध्य प्रदेश मदरसा बोर्डाने ५६ मदरशांची मान्यता रद्द केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मदरशांमध्ये हिंदू मुलांच्या नावावर सरकारी मदत घेतली जात होती.
हे वाचलंत का? : अहिल्यादेवी होळकर... 'सामान्य स्त्रीचा असामान्य जीवन प्रवास'
शालेय शिक्षण मंत्री राव उदय प्रताप सिंह यांनीही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या मदरशांची प्रत्यक्ष पडताळणी लवकर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. श्योपूर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात मदरशांमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या किंवा नोकरी करणाऱ्या अशा हिंदू विद्यार्थ्यांच्या नावावर सरकारी मदत घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मदरशांमध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांचे नाव २००४ मध्ये नोंदवण्यात आले होते, त्यानंतर २०१८ आणि २०२३ मध्येही त्याच विद्यार्थ्याचे नाव समाविष्ट करण्यात आले होते.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील १५०५ मदरशांमध्ये ९४२७ हिंदू मुले शिकत आहेत. यापैकी मुरैना येथील ६८ मदरशांमध्ये २०६८ मुले, भिंडमधील ७८ मदरशांमध्ये १८१२ आणि रेवा येथील १११ मदरशांमध्ये १४२६ मुले शिक्षण घेत आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर आयोगाने कडक भूमिका घेतली आहे.