समाजसेवेचे व्रत अंगीकारताना फायद्या-तोट्याच्या गणितांचा विचार न करता, आपले संपूर्ण आयुष्य निराधारांसाठी वेचणार्या समाजसेवक रविंद्र सुर्यवंशी यांच्याविषयी...
आपण कोण आहोत किंवा कसे आहोत, यापेक्षा आपण काय करू शकतो, याची खुणगाठ एकदा मनाशी पक्की बांधली की, निर्धारित उद्दिष्ट साध्य करणे मुळीच अशक्य नाही. याचाच प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील एका गरीब घरातून आलेल्या आणि आपले ध्येय गाठलेल्या रविंद्र वाळूजी सुर्यवंशी यांच्याकडे बघितल्यावर येतो. नाशिक शहरात अनंत अडचणींचा सामना करत, वयाच्या 26व्या वर्षी त्यांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. नाशिकरोड येथे 1970 साली जन्मलेल्या रविंद्र सुर्यवंशी यांना बालपणापासूनच समाजसेवेची आवड. आईवडील दोघेही शेतकरी. तालुक्यातील अतिशय दुर्गम असलेले धारगाव हे त्यांचे मूळ गाव. तेथे शिक्षणाची कोणतीच सोय नसल्याने आणि पाचवीला पूजलेल्या गरिबीने रविंद्र यांचे संगोपन मामांकडेच नाशिक रोडला झाले. तेथेच मनपा शाळेत प्राथमिक शिक्षण, तर आरवायके महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या याच जडणघडणीच्या काळात रविंद्र यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली आणि पुढे जाऊन हीच आवड त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली. मुंबई येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात डीएचएमएस, तर पुणे येथील याच महाविद्यालयातून फिजिओथेरपीचे शिक्षण रविंद्र यांनी पूर्ण केले. नाशिकला परतल्यानंतर काही काळ तेथील विविध दवाखान्यांमध्ये काम केल्यानंतर 2000 सालच्या दरम्यान शहरातील दोन डॉक्टर मित्रांच्या मदतीने भाभा नगर येथे पहिला वृद्धाश्रम रविंद्र यांनी सुरू केला. मात्र, हा वृद्धाश्रम दोन ते तीन वर्षांतच बंद पडला. मग काही वर्षे थांबल्यानंतर 2006 साली ‘सहारा केअर सेंटर’ या नावाने इंदिरानगर येथे रविंद्र सूर्यवंशी यांनी वृद्धाश्रम सुरू केला. 2006 सालापासून सुरू झालेली ही सेवा अजूनही अविरतपणे सुरू आहे. या 18 वर्षांत सूर्यवंशी यांनी दहा हजारांपेक्षा जास्त वृद्धांची सेवा केली असून, आज त्यांच्या वृद्धाश्रमात 40 ज्येष्ठ नागरिक आनंदी आयुष्य जगत आहेत.
दरम्यान, इंदिरानगर येथील जागा अपुरी पडायला लागल्यानंतर, दहा वर्षांपूर्वी नाशिक शहराजवळील चांदशी या गावात त्यांनी हा वृद्धाश्रम स्थलांतरित केला. येथे वृद्धांची काळजी घेणे त्यांच्या नातलगांना काही कारणाने शक्य नाही. मग त्यांची सर्व सुश्रुषा सुर्यवंशी स्वतः आणि त्यांच्यासोबत असलेले चार कर्मचारीच करतात. वृद्धांचे डायपर बदलणे, केस कापणे, दाढी, नखे कापणे, त्यांना आंघोळ घालणे, कपडे घालणे, त्यांचा भांग पाडणे अशी सर्व जबाबदारी ही मंडळी न थकता निभावतात. यांमध्ये अंध, अपंग, मतिमंद, मनोरुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच अंथरूणावर खिळलेले अशा सर्व प्रकारच्या गरजूंचा वृद्धांचा समावेश आहे. त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अॅलोपॅथी, होमियोपॅथी तसेच आयुर्वेदिक फिजिओथेरपी, नामांकित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारांबरोबरच सेवेसाठी 24 तास रुग्णवाहिका सज्ज ठेवली आहे. रविंद्र सुर्यवंशी यांनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी झोकून दिले असले, तरी कुटुंबाकडे मात्र अजिबात दुर्लक्ष केले नाही. त्यांची दोन्ही मुले पुण्यातून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी मिळवून चांगल्या पदावर कार्यरत आहेत. 1995 साली रविंद्र यांचा स्वाती यांच्यासोबत विवाह झाला. त्या पेशाने शिक्षिका असून, त्यांच्या या समाजसेवेच्या व्रतात खंबीरपणे साथ देतात. सर्व काही सुरळीत सुरू असताना ‘कोविड’ महामारीने सर्वांचेच आयुष्य उद्ध्वस्त केले. याची झळ अधिक प्रमाणात सुर्यवंशी यांच्यासोबत कुटुंबीयांना बसली. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये रविंद्र यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये त्यांचे फुप्फुस 99 टक्के निकामी झाले. 13 दिवस अतिदक्षता विभागात, तर एक महिना घरी त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.
यावेळी आपला वृद्धाश्रम आणि त्यातील जीवलगांचे काय होणार, ही चिंता त्यांना सतावत होती. मात्र, पत्नी आणि मुलांनी त्यांचे हे समाजसेवेचे व्रत अव्याहतपणे सुरुच ठेवले. त्यावेळी वृद्धाश्रमात 27 वृद्ध होते. त्यांचे सगळे दिवसाचे विधी उरकून मग रविंद्र यांचीदेखील सर्व कामे त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले करत असत. या कालखंडात वृद्धाश्रमातील सर्व कामगारही काम सोडून गेल्यामुळे कुटुंबाला तारेवरची कसरत करावी लागली. जेव्हा बरे होऊन रविंद्र आश्रमात परतले, तेव्हा ते आश्रम जसा सोडून गेले होते, अगदी तशाच अवस्थेत होता. यासाठी ते देवाचे आणि कुटुंबाचे आभार मानतात. दरम्यान, त्यांनी सेवाकार्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. अहिल्यानगर, शहापूर आणि दिंडोरी या तीन शहरांतही वृद्धाश्रम सुरू केले. फसवणूक झाल्याने अहिल्यानगरचा 15 दिवसांत, तर शहापूर येथील दोन वर्षे, तर दिंडोरी येथील वृद्धाश्रम कोरोनामुळे बंद करावा लागला. या समाजसेवेच्या व्रतस्थ सेवेसाठी रविंद्र यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्यात दोन स्वयंसेवी संस्थां पुढे आल्या असून, आर्थिक साहाय्य करत आहेत. आगामी काळात रस्त्यावर सोडून दिलेल्या अशा अनेक लोकांचा ‘सहारा’ बनून त्यांच्यासाठी निवारा उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचा मानस रविंद्र यांनी बोलून दाखवला आहे. त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडावी, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
विराम गांगुर्डे