"सुनील राऊत दोनवेळा कोट शिवून तयार होते मग..."; दरेकरांचा संजय राऊतांना सवाल

    17-Jun-2024
Total Views | 19
 
Darekar & Raut
 
पुणे : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपले भाऊ मंत्री का झाले नाहीत हे ठाकरेंना विचारा. आमदार सुनील राऊत दोनवेळा कोट शिवून तयार होते, त्याचं काय झालं? असा सवाल भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांना केला आहे. खासदार नारायण राणेंवर राऊतांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "संजय राऊत यांचा घोडा बेफाम सुटला आहे. त्यांना वेसण घालण्याची गरज आहे. शिवसेनेचा कोकणामधून बेस हलला आहे. भिवंडी सोडून शंभर टक्के महायुतील यश मिळाले आहे. त्यामुळे वैफल्यातून संजय राऊत वक्तव्य करत आहेत. आमच्या पक्षांमध्ये कोणाला मंत्री करावे आणि कोणाला करू नये, याची चिंता संजय राऊतांनी करू नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपले भाऊ का मंत्री झाले नाहीत हे पहिले ठाकरेंना विचारा. दोनवेळा कोट शिवून आमदार सुनील राऊत तयार होते, त्यांचे काय झाले याचं आधी उत्तर द्या मग आम्ही उत्तर देऊ. राणेंनी जेवढी पदे आहेत ती उपभोगली आहेत. त्यांच्यासाठी मंत्रिपद हा मोठा विषय नाही," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  शिवरायांची वाघनखे आणण्याचा मार्ग मोकळा! जुलैमध्ये भारतात येणार
 
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर बोलताना ते म्हणाले की, "तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ दिसत आहे. निवडणूक होईपर्यंत काय होते ते बघा. प्रत्येकाच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. लोकसभेत मिळालेले यश असेच राहील. प्रत्येकाला मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. आपल्या पक्षाच्या जागा जास्त याव्यात, जास्त लढवल्या तर जास्त येतील अशा भ्रमात ते आहेत. त्यामुळे ते एकमेकांचे पाय निश्चितपणे ओढतील यात शंका नाही," असे ते म्हणाले.
 
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पुण्यातील साखर संकुल येथे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर दरेकरांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "पीक कर्ज हा महत्वाचा मुद्दा आहेच. परंतु प्रमुख कारण जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक स्थिती हेही आहे. राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नाहीत. अशावेळी सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्या सशक्त होणे गरजेचे आहे. तसेच राज्यातील सहकार क्षेत्रातील जिल्ह्याची शिखर संस्था असते ती मजबूत झाली तर आपल्या ग्रामीण भागातील विकासाला, शेतकऱ्यांना मदत करायला गती मिळू शकते," असेही मत दरेकरांनी व्यक्त केले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121