चौंडी... पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर (आधीचे अहमदनगर) जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सीना नदीच्या किनारी वसलेले एक सुंदर गाव. आज या गावाची ओळख आहे ती अहिल्यादेवींची जन्मभूमी म्हणून. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि पर्यटनदृष्ट्याही चौंडीचे स्थान अनन्यसाधारण असेच. त्यानिमित्ताने चौंडी गाव, तेथील अहिल्यादेवी होळकर यांचे स्मृतिस्थळ, शिल्पसृष्टी, या स्थळाचे राजकीय महत्त्व, नगरच्या नामांतराचा लढा यांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणात दृष्टिपथात येणारं आणि रात्री चुलीतला निखारा विझल्यानंतर नजरेआड होणारं ते गाव.. नदीकाठाच्या कुरणांवर गायी, गुरे, शेळ्या, मेंढरं राखून शेती करणार्या लोकांनी उदयास आणलेलं... नदीकाठच्या लव्हाळाने शाकारलेल्या छपराच्या घरांचं वस्तीवजा गाव... नदीकाठच्या ओबडधोबड दगडांना आकार देऊन एकावर एक रचून बांधलेल्या भिंतीचं... शेणा-मातीने सारवलेली घरं, पांढर्या गारगोटी ठेचून त्यातून सांडलेल्या पिठातून तयार झालेली रांगोळी दाराभोवती रेखाटणारं, रानटी शेंगांपासून ते हुलगा-जवारीच्या पिकांपर्यंत शेती करून पोटाची खळगी भरणारं ते गाव... काळाच्या प्रवाहात सर्व समाजाच्या लोकांची वस्ती बनलेलं... चौंडेश्वरी मातेच्या अन् महादेवाच्या मंदिर पायाशी डोके टेकवून धर्म-सण-उत्सव साजरे करणारे गाव.
अहमदनगर म्हणजे आजच्या अहिल्यानगरपासून अगदी 85 किमी एवढ्या अंतरावर वसलेलं मल्हारपीठ नावाचं गाव. मल्हारपीठाला ‘चौंडी’ असही म्हणत. हेच चौंडी गाव आधी बीड जिल्ह्यात येत होतं. आता ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) जिल्ह्यात जामखेड तालुक्यात आहे. तिथल्या लोकांना ‘चौंडीकर’ म्हणूनच ओळखत. चौंडीकर माणकोजी शिंदे हे गावचे पाटील. गावात चौंडीकर शिंदे पाटलाचा वाडा. पाटीलकी म्हटलं की शेती, महसूल, सुव्यवस्था राखणे अशी सगळीच जबाबदारी. आलेल्या माणसांचा पाहुणचार ते कारभारात मदत करायला त्यांची नावाप्रमाणे सुशील पत्नी सुशीलामाई शिंदे, धाराशिव (उस्मानाबाद)जिल्ह्यातील चोराखळी गावच्या मैदाडाची ती लेक. गाव त्यांना ‘सुशीलामाय’ म्हणत. गावकी अन् भावकी जपायला तशी दोन मुले एक शहाजी चौंडीकर अन् दुसरे महादजी चौंडीकर शिंदे. गाव तसं आडमार्गाला होतं, पण धार्मिक उत्सव आणि महादेवाच्या मंदिरामुळे तसं प्रसिद्ध. यांचं चौंडी गावात दि. 31 मे 1725 रोजी सीना नदीच्या मुशीत आणि सुशीलामाईच्या कुशीत एक कन्यारत्न जन्मले. त्या कन्यारत्नाचं नाव राजमाता, पुण्यश्लोक, होळकर कुलप्रभा, महाराणी, अवघ्या हिंदुस्थानात 28 वर्षे आदर्श आणि तत्त्वशील राज्यकारभार करणारी लोककल्याणकारी माता अहिल्यादेवी होळकर... म्हणजेच शिवयोगिनी अहिल्यामाई होळकर!
अहिल्यादेवी होळकर हे भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावे, असे नाव. भारताच्या मार्गारेट, एलिझाबेथ, कॅथरीन राणी म्हणून ज्यांचा गौरव झाला, त्या अहिल्यादेवी होळकर. काश्मीर ते कन्याकुमारी हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार करून आजच्या भारताला पर्यटन उद्योगात विकसित करणार्यासाठी पायाभरणी करणार्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. राजेशाही सांभाळणारी आणि सुुुखनैव वैभव असताना गरिबांच्या झोपडीत रमणारी राणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर... आज चौंडी हे गाव राजकारण आणि पर्यटन अशा दोन्ही अर्थाने नावारूपास आलेे आहे. येथे असलेलं अहिल्यादेवी होळकर यांचे स्मृतिस्थळ, शिल्पसृष्टी ते धनगर समाजबांधवांनी आपल्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याचं ठिकाण, या दोन्ही अर्थाने चौंडी हे एक मोठं नाव. हेच चौंडी गाव अलीकडच्या काळात आरक्षणाचा प्रश्न पेटला तसं समाजाची मते मिळावी, यासाठी काही राजकीय लोकांचा अड्डा बनलं, हेही नाकारून कसे चालेल.
चौंडीमध्ये समाज बैठका सुरू झाल्या, तसे येथे तेथील वाड्याचे पुनरुज्जीवन करीत स्मृतिशिल्प साकारण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी जोर दिला. आज चौंडीला गेल्यावर सुरुवातीला दिसते ती कमान. आत जाताच उजव्या आणि डाव्या बाजूला बारा राशींची प्रतीकं असलेले पुतळे आणि नक्षत्रांची प्रतीकात्मक शिल्पे दिसतात. विविध प्रकारचे वृक्ष यामुळे बागेचं रूप अधिकच खुलून दिसतं. समोरच भव्यदिव्य असा महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा. पुतळ्याच्या पायथ्याला दोन तोफा. पुतळ्याला वळसा घालून पाठीमागे माणकोजी शिंदेंचा वाडा. वाड्यात ओसरीला वडील माणकोजी शिंदे, आई सुशीला शिंदे, सोबत भाऊ शहाजी व महादजी परिवारासोबत असलेलं शिल्प. भुयारीमार्गासह सुसज्ज वाडा पाहता क्षणीच नजरेत भरतो. शेजारी महान मातेच्या जन्माने पावन झालेली खोली, त्याबाहेर अहिल्यामाई होळकर, सासरे मल्हारराव होळकर, हरिहर बुक्क आणि चंद्रगुप्त मौर्य यांचं शिल्प पाहायला मिळतं. लाकडी माळवदाचा हा वाडा अगदीच चिरेबंदी आहे. कोठी, देवघर, तळघर, बैठकखोली, स्वयंपाकघर, सदर, स्नानगृह, अतिथीगृह आणि सुरक्षेच्या दृष्टीने माची, बुरूज, संरक्षक कठडे असलेला वाडा अहिल्यादेवींच्या माहेरची ऐश्वर्यसंपन्नता दर्शवितो.
त्यात अण्णा डांगे, महादेव जानकर, राम शिंदे, गोपीचंद पडळकर अशा लढाऊ नेत्यांनी वारंवार लढा देत चौंडीच्या विकासासाठी लढा दिलाच. शरद पवार, अजित पवार यांसह अनेक मंत्री यांनी सरकारातून विकासासाठी निधी दिला. सगळ्या प्रयत्नांनी आज चौंडी एक स्मृतिस्थळ आणि पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले. वाड्याजवळ अहिल्येश्वर महादेवाचं मंदिर, गावाजवळच चौंडेश्वरी देवीचं मंदिर, यावरून ‘चौंडी’ हे नाव पडलं. शेजारून ओढ्यावजा वाहणारी सीना नदी. अलीकडच्या काळात जलसंधारण कामात नदीचे रुंदीकरण करण्यात आले. सुमारे अडीचशे वर्षे जुना अहिल्यादेवींनी बांधलेला घाट. चौंडीवरून इंदूर या गावी माहेर ते सासर बस सुरू झाली. त्यामागे पर्यटन हा उद्देश ठेवला. आजही इथे पर्यटक भेट देतात.
लोकमाता अहिल्यादेवींचा सीना नदीपासून ते नर्मदा नदीपर्यंत म्हणजेच माहेर ते सासर प्रवास झाला. अहिल्यादेवी यांचा विवाह होळकरशाहीचे मुकुटमणी, पेशव्यांचे विश्वासू सहकारी माळवा (सध्याचे मध्य प्रदेश)चे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला. अकाली वैधव्य, घरातच 11 सतीच्या किंचाळ्या, आधी पती, मग मुलगा, नंतर सासू, सासरे, जावई यशवंत आणि मुलगी मुक्ता अशा आप्तस्वकीयांचे मृत्यू आपल्या डोळ्यांनी अहिल्याबाईंनी पाहिले. ते दुःख त्या मातेने सहन केले. तरीही 28 वर्षे आदर्श राज्यकारभार केला. दुःखाचे डोंगर कोसळूनसुद्धा, कर्तृत्वाच्या रथावर चढली ती महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. पंडित नेहरू आपल्या ’भारताचा शोध’ या ग्रंथात लिहितात, ’‘आदर्श व तत्त्वशील राज्यकर्त्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर.” मराठी संस्कृतीकोशात मराठ्यांच्या इतिहासातील उज्ज्वल स्त्रीरत्न म्हणून गौरव करण्यात आला. सर जॉन माल्कम म्हणतो, “सर्व जातीचे लोक पूज्यबुद्धीने जिचे नाव घेतात, त्या अहिल्यादेवी.” विनोबा भावे यांनी अहिल्यादेवींचा उल्लेख ’शस्त्राच्या नाही तर बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकणारी राणी’ असा केला आहे.
म्हणूनच स्वातंत्र्यसेनानी नगेंद्र आजाद म्हणतात,
तुम देवी थी, अन्नपुर्णा थी, जनजन की सुखदाता
तुम करुणा थी, ममता थी, तुम सचमुच भारतमाता..!!
सांस्कृतिक वैभव असलेलं हे चौंडी गाव अनेक अर्थाने भटकंती करणार्या समाजाचं चळवळीचं स्थान झालं. इथे दरवर्षी 31 मे या अहिल्यादेवी यांच्या जन्मदिनी शासकीय जयंती साजरी होते. या दिवशी अहिल्यादेवी यांचे सासर इंदूरवरून कोणाला तरी निमंत्रण असतं. अलीकडच्या काळात जागतिक कीर्तीचा आदर्श राज्यकारभार करणार्या मातेचा गौरव व्हावा, यासाठी विविध संघटना आणि राजकीय नेत्यांनी ‘अहमदनगर’ शहराचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करावे, ही मागणी लावून धरली. महाराष्ट्राला नामांतर चळवळीचे लढे नवीन नाहीत. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, उस्मानाबादचे धाराशिव, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असा प्रवास सगळ्याच राजकीय पक्षांनी केला. प्रत्यक्ष जनतेचाही सहभाग होताच.
मुळात अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करावे, ही मागणी करण्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री राम शिंदे हे आग्रही राहिले. रासप नेते महादेव जानकर, चौंडी विकासासाठी कायम लढलेले अण्णा डांगे अशी मोठी फळी अहिल्यानगर नामांतरासाठी साथीला राहिली. सोलापूर विद्यापीठ नामांतराचा लढा अगोदरच चालू होता. त्यामुळे नव्याने संघटन बांधणी करावी लागली नाही. एकीचं बळ म्हणतात ते हेच! त्यानंतर अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा नेण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवींच्या 298व्या जयंतीदिनी चौंडीला अहमदनगरचे नाव ‘पू. अहिल्यादेवीनगर’ करायला होकार दिला. नामांतर लढा तेवढा सोपा वाटत नव्हता. कारण, सन 1490ला कोटबाग निजाम या महालापासून हे शहर अहमद निजामाने उभं केलं. त्याच्या नावावरून शहराला गेली 500 हून अधिक वर्षे या शहराचे नाव ‘अहमदनगर’ राहिले. एवढा प्रदीर्घ काल दख्खनी मुस्लीम राजवटीत या शहराची अनेक दृष्टीने भरभराट झाली. चांदबिबीपासून ते उत्तर मुघल बादशहांनीसुद्धा अहमदनगर जवळून अनुभवले होते.
अनेक मुघल निजाम अशा लढ्यात हे शहर साक्षीदार राहिले. अहिल्यादेवींनी मंदिरांचा जीर्णोद्धार करत असताना मशिदींना धक्का न लावण्याबाबत घेतलेला औदार्याचा निर्णय यामुळेच अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यास उघड विरोध कोणी केला नाही किंवा अघटित घटना घडल्या नाहीत. तथापि, त्याबाबत लगेच कोणतीच ठोस पावले उचलली न गेल्याने घोषणा फक्त घोषणाच राहणार, असे वाटत होते. लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच तातडीने हालचालींना वेग आला. राज्य सरकारने तातडीने जिल्हाधिकार्यांना सूचना दिल्या. कार्यालयीन प्रक्रिया पार पडली. अहमदनगर महापालिकेने सर्वसाधारण सभा घेऊन ठराव पारित केला. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी जिल्हाधिकारी यांना मंजूर ठराव पाठवला. त्यात अहिल्यादेवी यांच्या जन्माने पावन झालेल्या अहमदनगरचे नामांतर करून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा ठराव पारित झाल्याने नामांतराचा मार्ग मोकळा झाला. अनेक वर्षांची मागणी नसली तरी, सामाजिक भावना लक्षात घेता, मागणी लवकर पूर्ण झाली, याचा आनंद झाला. सरतेशेवटी 13 मार्चला अहमदनगरचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ असे झाले. महामहिम अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य, इतिहास आणि विचार यासाठी ही नामांतराची घोषणा झाली. अनेक अर्थाने अहिल्यादेवी यांचे नाव शहराला दिल्याने त्याचा फायदाच होईल.
सरकारने नगरचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरा जपत असताना अहिल्यादेवी यांचे दिलेलं नाव योग्य व समर्पकच. पू. अहिल्यादेवी यांनी कापड उद्योगास चालना दिली होती. आजही ‘माहेश्वरी साडी’ प्रसिद्ध आहे. पण, सरकारने फक्त नामांतरावर न थांबता अहिल्यानगरमधील जुने उत्सव, परंपरा यांनाही अभय द्यावे. यासोबत अस्तित्वात असलेल्या उद्योगांना चालना द्यावी. अहिल्यादेवी यांनी इंदूर, महेश्वरमध्ये पेठा वसवल्या. तशाच पेठा वसवून आर्थिकदृष्ट्या अहिल्यानगरचा विकास करावा. जिल्ह्यातील बहुतांश समाज छोट्या उद्योगावर उभा आहे. त्यामुळे लहानलहान वर्गाचे हितही लक्षात घेणे गरजेचे आहे. नगरच्या सांस्कृतिक विकासात चौंडीसह परिसरातील गावांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. चौंडी गावात संग्रहालय उभारणी, ही तेथील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची मागणी आहे. सीना नदीचे पुनरुज्जीवन करणेही तितकेच गरजेचे आहे. तेथे शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने पाणी हीच महत्त्वाची गरज. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्र विकास आराखड्याबाबत ठोस पावले उचलून, सीना नदीपात्राचा समावेश आवश्यक आहे. परिसरातील भागात रोजगार उपलब्ध नाही. चौंडी हे नगर दक्षिणचा भाग असल्याने दुष्काळी अशी ओळख परिसरातील तालुक्यांना आहे. ही ओळख सरकारने पुसावी, अशी येथील स्थानिकांची आग्रही मागणी.
स्कॉटलंड कवयित्री जोना बोली अहिल्यादेवींविषयी लिहिते-
जिच्या हृदयात प्रेम होते
काम तिचे तगडे होते
अहिल्या हे तिचे,
आदरार्थी नाव होते
जगात आदर्श अशी न्यायव्यवस्था उभी करून, एका हातात शस्त्र आणि दुसर्या हातात शास्त्र घेऊन आदर्श राज्यकारभार करणार्या राजमाता अहिल्यादेवी होळकर. घाट, पाणपोया, वृक्षलागवड, जुन्या वास्तू, मंदिरे यांचा जीर्णोद्धार करणार्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर, शेतकरी, कारागीर यांना बळ देणार्या, प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी होळकर, हिंदू मंदिरे विकास करून पर्यटन विकास करणार्या अहिल्यादेवी होळकर, पाण्यातल्या माशापासून ते रानातल्या पशुपर्यंत कोणी उपाशी, तहानलेला राहू नये, यासाठी आपली हयात खर्च करणार्या अहिल्यादेवी होळकर, आज सर्वांसाठी आदर्श आहेत. हा आदर्श इथल्या सामाजिक, राजकीय लोकांसह तरुणांनी घ्यावा, हीच माता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी अभिवादन ठरेल.
बिभीषण गदादे