हिंदूधर्मतारिणी...

    30-May-2024
Total Views | 177
Ahilya Devi and Hindu
होळकर घराणे मुळातच हे शिवभक्त होते. त्यामुळे अहिल्यादेवी यांनी श्री सोमनाथ, श्री ओंकारेश्वर, श्री नागनाथ, श्री त्र्यंबकेश्वर, श्री काशी विश्वनाथ, श्री घृष्णेश्वर आदी शिवमंदिरांचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवी यांनी आपले राज्य हे शिवार्पण करून, राज्यकारभार केला. म्हणून, त्यांच्या हातात आपल्याला शिवपिंड दिसते. त्यांच्या दरबारी आदेशावर ‘श्रीशंकर आज्ञेवरून’ अशी राजमुद्रा असे. भगवान शिवशंकराच्या नावानेच त्यांनी लोककल्याणकारी राज्य चालवले. तसेच संपूर्ण देशभरात अहिल्यादेवींनी मंदिरे, वास्तू, जलकुंडे आणि बारवांची निर्मिती केली. अशा या हिंदूधर्मतारिणीच्या महान कार्याविषयी...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी... संपूर्ण हिंदुस्थानला आपल्या मायेच्या पदराखाली घेणारी लोकमाता, पुण्यसलीला. नर्मदेच्या प्रवाहाप्रमाणे त्यांचे जीवन निर्मळ होते. त्यांनी लोककल्याणाचे कार्य केलेच, त्याप्रमाणे हिंदू धर्माचा जीर्णोद्धारही केला. इ.स. 712 मध्ये भारतावर मुहम्मद बीन कासीम याने आक्रमण केले. त्यानंतर अनेक परकीय इस्लामिक आक्रमणांची मालिका सुरू झाली. ही आक्रमणे केवळ जमीन किंवा संपत्ती जिंकण्यासाठी नव्हती, तर इस्लामचा प्रसार हे महत्त्वाचे कारण त्यामागे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “ही मुस्लीम आक्रमणे केवळ लूट किंवा विजयाच्या लालसेपोटी केलेली नव्हती. त्यांच्यामागे आणखी एक हेतू होता.... हिंदूंच्या मूर्तिपूजा आणि अनेकेश्वरवादावर प्रहार करणे आणि भारतात इस्लामची स्थापना करणे, हे देखील या मोहिमेचे एक उद्दिष्ट होते, याबद्दल मुळीच शंका नाही.” ( संदर्भ - ऊी. इरलरीरहशल आलशवज्ञरी - थीळींळपस रपव डशिशलहशी, तेर्श्रीाश छे.8 झरसश छे.55) मुस्लीम आक्रमकांनी भारतात केलेल्या मंदिरांच्या विध्वंसाने इतिहासाची पानेच्या पाने भरलेली आहेत, त्यातील वानगीदाखल काही उदाहरणे....

 
1) कुतुबुद्दीन ऐबक याने मुहम्मद घोरीच्या आज्ञेवरून दिल्लीत ’कुव्वतुल इस्लाम’ नावाची एक मोठी मशीद बांधली. 27 हिंदू आणि जैन मंदिरे पाडून त्यांचे साहित्य वापरून ती मशीद बांधली आहे, असा फार्सी शिलालेखच तिच्यावर आहे. आता ती मशीद पडक्या अवस्थेत आहे. आजही तिथे हिंदू आणि जैन मंदिरांचे अवशेष आपल्याला दिसतात.

2) उज्जैन येथील ज्योतिर्लिंग महाकालेश्वराचे तेव्हाचे मंदिर, सुलतान इल्तुत्मिश याने उद्ध्वस्त केले. महाकालेश्वराची पिंड दिल्लीला नेली आणि दिल्लीतील तेव्हाच्या जामा मशिदीच्या पुढे, येणार्‍या-जाणार्‍या मुसलमानांनी ती तुडवावी, म्हणून टाकली. ही घटना मिन्हाजुद्दीन याने ‘तबकात-ई-नासिरी’ या ग्रंथात लिहून ठेवली आहे.

3) औरंगजेब बादशाह झाल्यावर त्याच्या हुकुमावरून 1669 मध्ये काशी विश्वनाथाचे मंदिर पाडून टाकण्यात आले. तशी नोंद त्याच्या दरबाराच्या अखबारात आहे. त्या जागेवर मशीद बांधण्यात आली.

4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 6 जून 1950 रोजी ’विश्व बौद्ध भ्रातृत्व संमेलनात केलेल्या भाषणात, इस्लामिक अत्याचारांचा उल्लेख केला आहे. बाबासाहेब म्हणतात, “विदेशी आक्रमकांपैकी मुसलमानांद्वारे बौद्ध धर्माला अधिक झळ पोहोचली. मुसलमान लोक प्रतिमा आणि मूर्तीचे विरोधक होते. त्यांनी बुद्धांच्या मूर्तींची तोडफोड केली व भिक्षूंना ठार मारले.”
नालंदा येथील विशाल ग्रंथालयात ताडपत्र व भोजपत्रावर लिहिलेले सुमारे दोन लाख ग्रंथ होते; त्यात हजारो वर्षांचे ज्ञान साठवलेले होते. त्यांना बख्तियार खिलजीने आग लावून दिली आणि तिथे शिकत असलेल्या सहा हजार विद्यार्थ्यांपैकी काहींना ठार मारले व काहींना जबरदस्तीने मुसलमान करून सोडले. मुसलमानी आक्रमक जेथे जेथे गेले, तेथे तेथे त्यांनी बौद्धांना ठार तरी मारले किंवा मुसलमान तरी बनविले आणि बौद्ध मूर्तीची तोडफोड केली, ग्रंथालये जाळली व विहार नष्ट केले. (खंड 18-3, पान 211)अशाप्रकारे मुस्लीम आक्रमकांनी हजारो मंदिरे पाडून येथील हिंदू समाजाच्या अस्मितेचा अपमान केला.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून इस्लामी आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. पुढे मराठ्यांचा उत्तरेत प्रभाव वाढला, तेव्हा अनेक मंदिरे पुन्हा बांधण्यात आली. भारतावर आक्रमण करणार्‍या परकीय मुस्लीम आक्रमकांनी येथील समाजाच्या राष्ट्रीय भावना ठेचून टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मराठ्यांनी संपूर्ण देशभर सत्ताविस्तार केल्यानंतर अनेक हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार केला. महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या बादशहाला, कोणत्याही मुसलमानाने गोहत्या करू नये, असं फर्मान काढायला लावलं. (संदर्भ : शिंदेशाहीचे राजकारण) ओडिशातील जगन्नाथ रथयात्रा अनेक वर्षे बंद पडली होती, ती मराठ्यांनी पुन्हा सुरू केली. हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धार कार्यात, अहिल्यादेवी होळकर यांचेही मोठे योगदान आहे. त्यांनी नव्याने अनेक मंदिरे, घाट बांधले आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी श्री काशी विश्वनाथ मंदिर, श्री सोमनाथ मंदिर, वैजनाथ, श्री घृष्णेश्वर ( वेरूळ) आदी मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. याशिवाय, श्री ओंकारेश्वर, श्री भीमाशंकर आदी ठिकाणी त्यांनी घाट, मंदिरे, धर्मशाळा असे काही न काही धर्मादाय कार्य केले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व त्यांनी खासगी खर्चातून केले आहे.

संपूर्ण देशभरात अहिल्यादेवींनी मंदिरे, वास्तू, जलकुंडे आणि बारवांची निर्मिती केली. त्याची यादीच डॉ. गणेश पोटे यांनी ’वेध अहिल्याबाईंचा’ या पुस्तकातील ’धार्मिक कार्ये आणि दानधर्म’ या प्रकरणात दिली आहे. (पान क्र.318 ते 328) अहिल्यादेवींच्या या कार्यामुळे भारतात पर्यायाने हिंदू धर्माचाच जीर्णोद्धार झाला. अहिल्यादेवींनी काशीजवळ ब्रह्मपुरीची स्थापना करून वेदांचा अभ्यास करण्यासाठी एक केंद्र निर्माण केले. या वेदशाळेत चार वेद, उपनिषदे, ब्रह्मकर्म, गणितशास्त्र, अर्थशास्त्र आदींच्या अध्ययनाची व्यवस्था केली. छापखाने उपलब्ध नसतानाही शेकडो ग्रंथ राजमातांच्या संग्रही होते. विशेष म्हणजे, यातील जवळपास सर्वच ग्रंथ हे धर्मग्रंथ होते. संग्रही असणार्‍या ग्रंथांचे पारायण आणि श्रवण सदैव अखंडितपणे चालू होते. राजमाता अहिल्यादेवींनी काही धर्मग्रंथांचे हस्तलिखित बनवून घेतले होते, तर काही धर्मग्रंथ महाराष्ट्रातील चांदवडहून मागवल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. शेकडो हस्तलिखिते धर्मग्रंथांचा संग्रह हा अहिल्यादेवींची धर्माच्या बाबतीत असणारी ज्ञानतृष्णा दर्शवतो.

पंढरपूरच्या विठ्ठलावर अहिल्यादेवींची अपार श्रद्धा होती. विठोबाच्या नियमित नैवेद्याची सोय होळकर घराण्याने केली. रखुमाईच्या पायातला दागिना अहिल्यादेवींनी स्वतः पाठवला होता व तो दागिना रोज रखुमाईच्या पायात घालावा, असा आदेश त्यांनी दिला होता. विठ्ठलभक्तांच्या निवासाची सोय व्हावी, यासाठी होळकरांनी पंढरपूरमध्ये ‘होळकरवाडा’ नावाची भव्य अशी वास्तू बांधली. पंढरपूरबरोबरच अनेक धार्मिक ठिकाणी त्यांनी केलेल्या निर्मितीच्या खुणा आजही आपल्याला त्यांच्या धर्मपरायणतेची साक्ष देत उभ्या आहेत. अहिल्यादेवी एक कुशल प्रशासक आणि धोरणी राज्यकर्त्या तर होत्याच, पण त्यांनी भारतीय संस्कृतीचा जीवनप्रवाह अविरत ठेवण्याचे जे कार्य केले, ते केवळ अजोड आहे. अहिल्यादेवी या भगवान शंकराच्या निस्सीम भक्त होत्या. होळकर घराणे मुळातच हे शिवभक्त होते. त्यामुळे अहिल्यादेवी यांनी श्री सोमनाथ, श्री ओंकारेश्वर, श्री नागनाथ, श्री त्र्यंबकेश्वर, श्री काशी विश्वनाथ, श्री घृष्णेश्वर आदी शिवमंदिरांचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवी यांनी आपले राज्य हे शिवार्पण करून, राज्यकारभार केला. म्हणून, त्यांच्या हातात आपल्याला शिवपिंड दिसते. त्यांच्या दरबारी आदेशावर ‘श्रीशंकर आज्ञेवरून’ अशी राजमुद्रा असे. भगवान शिवशंकराच्या नावानेच त्यांनी लोककल्याणकारी राज्य चालवले.

होळकर राजघराण्याच्या राजचिन्हांवर ‘प्राहोमेशोलभ्या श्री. कर्तु: प्रारब्धात’ असे संस्कृत भाषेतील वाक्य आहे. या वाक्याचा अर्थ असा की, भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले की, हे देवी, कर्तृत्व आणि प्रारब्ध यांची जोड जमली की मनुष्य वैभवशाली होतो.
डॉ. देविदास पोटे यांनी त्यांच्या पुस्तकात होळकर राजवंशाच्या राजचिन्हांची सविस्तर माहिती दिली आहे. या राजचिन्हांमध्ये जमीन, जमिनीवर पिकांची समृद्धी, उजव्या बाजूला नंदी आणि तलवार तसेच डाव्या बाजूला घोडा आणि ध्वज अशी प्रतीके आहेत, तर वरील बाजूस छत्र आणि छत्राखाली सूर्य अशी प्रतीके आहेत. भगवान शंकराचे वाहन ’नंदी’ आणि शौर्याचे प्रतीक असलेला ‘घोडा’ यात दिसून येतो. या राजचिन्हांत विजयाचा ध्वज फडकत असलेलाही दिसतो. तलवारीच्या सामर्थ्याने मिळविलेली विजयश्री आणि न्यायाचे रक्षण करण्यासाठी सुसज्ज असलेली तलवारदेखील प्रतीकरूपाने या चिन्हांंमध्ये आहे. सर्वात वर ईश्वराची छत्रछाया सर्वांवर सदैव असावी, यासाठी ईश्वराचे छत्र वरदहस्तरूपाने सर्वांवर आहे. ईश्वराच्या वरदहस्तामुळेच होळकरांच्या राज्याचा सूर्य सदैव अस्तित्वात आहे आणि राहील, याची साक्ष राजचिन्ह पाहिल्यानंतर पटते. असे अर्थपूर्ण मानचिन्ह असलेल्या होळकर घराण्याचे राज्य आदर्श स्वरूपाचे होते. अहिल्यादेवींनी इंदूरहून महेश्वर येथे आपली राजधानी वसवली. येथील मंदिरे, घाट आणि स्थापत्य पाहून त्यांच्या धर्मपरायणतेची साक्ष पटते. नर्मदेच्या पवित्र तीरावर वसलेल्या महेश्वराचा अतिशय सुंदर घाट आहे. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहेत.

राजगादी आणि राजवाडा आणि नर्मदेच्या तीरावरच किल्ला आहे. त्यातील राजगादीवर अहिल्याबाईंची मूर्ती आहे. ही राजगादी पाहिल्यावर तो सगळा काळ जीवंत होऊन आपल्यासमोर उभा राहतो. अहिल्यादेवींचे जीवन हे धर्मपरायण होते. ‘ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवले आहे, ते पार पाडणे हे माझे कर्तव्य आहे. प्रजेला सुखी ठेवणे हे माझे काम आहे,’ हे त्यांच्या राजनीतीचे सूत्र होते. त्यांच्या जीवनातील त्याग आणि सेवा ही ईश्वर समर्पित होती. आपला समाज जेव्हा पारतंत्र्यात जातो, तेव्हा कला व साहित्याचा र्‍हास व्हायला सुरुवात होते. संरक्षणाची तलवार गळून पडली की, लेखकांची लेखणी आणि चित्रकारांचा कुंचला परकीयांचे दास्यत्व करू लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात हिंदू समाजाचा ’स्व’ प्रकट झाला. राज्याभिषेकानंतर महाराजांनी परकीय गोष्टी नाकारल्या होत्या. मराठीत झालेली फारसी शब्दांची घुसखोरी काढून पर्यायी संस्कृतप्रचुर शब्द देणारा ’राजव्यवहारकोश’ रचला. मंत्रिमंडळातील सर्व पदांची नावे संस्कृतमध्ये ठेवली. किल्ल्यांची नावे संस्कृतमध्ये आहेत. राजमुद्राही संस्कृत आहे. त्यांच्यानंतर संपूर्ण देशभर मराठ्यांनी हिंदू संस्कृतीचा जीर्णोद्धार केला. त्यात अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान मोठे आहे.
 
मध्ययुगात छत्रपती थोरले शाहू महाराज, यांच्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या नावापुढे ‘पुण्यश्लोक’ ही उपाधी लावली जाते. या शब्दाचा अर्थ पवित्र, कीर्तिवंत, चारित्र्यसंपन्न असा होतो. अहिल्यादेवी या धर्मपरायण, सात्त्विक वृत्तीच्या होत्या. आईच्या मायेने सारा हिंदुस्थान त्यांनी पदराखाली घेतला होता. एखाद्या योगिनीप्रमाणे त्यांचा दिनक्रम होता. त्यांच्या दिनचर्येेेतला महत्त्वाचा भाग म्हणजे, त्यांच्या जेवणाच्या पंगतीला सर्व जातींचे लोक असत. जे अन्न इतरांना तेच अन्न त्या घेत असत. येथे भेदभावाला कोणताही थारा नव्हता. अहिल्यादेवी दानशूर आणि उदार शासक होत्या. त्यांच्यात दया, करुणा, परोपकाराची भावना ओतप्रोत भरलेली होती आणि म्हणूनच आपल्या शासनकाळात गरिबांकरिता व भुकेलेल्यांसाठी त्यांनी अनेक अन्नछत्रं उघडली. पाण्याकरिता अनेक पाणपोया सुरू केल्या. एवढेच नव्हे तर पशुपक्ष्यांचीही त्या काळजी घेत असत. पक्ष्यांना अन्न मिळावे, यासाठी त्या काही शेते राखून ठेवत. धर्मकार्यासाठी लागणारा सगळा खर्च त्या स्वतःच्या खासगी संपत्तीतून करीत असत. ज्यांनी सात्त्विक स्वरूपाचे कार्य केले, अशा व्यक्तीला आपण ’पुण्यश्लोक’ म्हणतो. म्हणूनच, लोकांनी अहिल्यादेवींनाही ‘पुण्यश्लोक’ म्हटले. त्यांच्या लोककल्याणकारी कार्यामुळे त्या आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत आणि या पुढेही युगानुयुगे आपल्या स्मरणात राहतील. पुण्यश्लोक लोकमातेला शत शत वंदन!
रवींद्र सासमकर
(लेखक राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विशेष निमंत्रित सदस्य, छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने समिती, महाराष्ट्र शासन आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121