पुणे अपघात प्रकरण : ड्रायव्हर म्हणाला, "गाडी 'तो'च चालवत....!"
24-May-2024
Total Views | 36
मुंबई : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात नवनवे खुलासे होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुणे पोलीसांच्या तपासात अनेक बाबी समोर आल्या असून कारच्या चालकाने सांगितले की, गाडी 'तो'च चालवत होता, त्यामुळे गाडी नेमकी कोण चालवत होता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची माहिती मिळताच विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला फोन केला होता, असे सदर प्रकरणी समोर आले आहे.
दरम्यान, अपघात झाल्याची माहिती मिळताच विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला फोन करत सांगितले की, तू गाडी चालवत होतास असं पोलिसांना सांग. त्याबद्दल तुला बक्षीस देऊ, असं विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला सांगितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या धक्कादायक माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच, पुणे पोलीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून विशाल अग्रवाल यांच्यावर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यासंदर्भातील कलम लावले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघातानंतर अनेक स्तरावर टीकेची झोड उठवली होती. या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील, पबमधील कर्मचारी यांना अटक केली. तसेच, अल्पवयीन आरोपीची ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, येरवडा पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पीआय व पीआय अडचणीत येण्याची शक्यता आहे. पुणे अपघात प्रकरणात पुणे पोलीस तपास करत असून नवीन माहिती समोर येताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. ते म्हणाले, अजित पवार गटाचे आ. सुनील टिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये आले होते, हे सत्य आहे, असे पोलीस आयुक्तांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. त्याचबरोबर, पोलीस आयुक्तांनी सांगितले की, सदर अपघातप्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच, या प्रकरणात पहिला एफआयआर सकाळी ८ वाजता दाखल करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, सदर प्रकरणात भादंवि कलम ३०४(अ) लावले होते. परंतु प्रकरणाचे गांभीर्य पाहून सकाळी ११ ते १२ दरम्यान दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला. त्यात भादंवि कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. परिणामी, दोन्ही एफआयआर एकाच दिवशी दाखल झाल्याने त्यास दोन एफआयआर म्हणता येत नाही, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. दुसरा एफआयआर अल्पवयीन मुलाचे वडील आणि पब चालकावर दाखल करण्यात आला आहे.