मुंबई, दि.२१ : प्रतिनिधी मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे टिटवाळा ते सीएसएमटीला जाणाऱ्या ट्रेन २० मिनिटे उशीराने धावत आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून आला.
मंगळवार दि.२१ मे रोजी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. टिटवाळा ते सीएसएमटी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन १५ ते २० मिनिटे उशीराने धावत असल्याने सकाळी ऑफीसच्या दिशेने निघालेल्या नागरिकांन मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. अशातच ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोरील जाहिरात फलकाला आग लागल्याने तिथे प्रवाशांची गर्दी झाली होती. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली आणि ही आग विझवण्यात त्यांना यश मिळाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
रेल्वेचे अधिकारी हा बिघाड दुरुस्त करण्याच्या कामात गुंतले आहे. मात्र, अद्याप हा बिघाड दुरुस्त झालेला नाही. मुंबईत लोकलसेवा ही प्रमुख वाहतूक व्यवस्था आहे. लोकलसेवेला मुंबईची जीवन वाहिनी म्हटले जाते. अशातच गेल्या काही दिवसांपासून या सेवेत काही तांत्रिक कारणांमुळे होणाऱ्या बिघाडामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.