मुंबई, दि. २ : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ (सीएसएमटी) रिकामी लोकल ट्रेन रुळावरून घसरल्याच्या सलग दुसऱ्या दिवशीही गुरुवार, दि.२ रोजी सकाळी कार्यालयीन गर्दीच्या वेळी गाड्या विलंबाने धावत असल्याने नवी मुंबईकरांनी रोष व्यक्त केला.
मध्य रेल्वेने सांगितले की, छशिमट स्थानकाजवळ क्रॉसओव्हर पॉईंट (ट्रॅक चेंजिंग पॉईंट) येथे लोकल गाड्यांना १० किमी प्रतितास वेग प्रतिबंध लागू केल्यामुळे असे घडले. याठिकाणी तीन दिवसांत डबा रुळावरून घसरण्याच्या दोन घटना घडल्या. सीएसएमटीच्या अगदी बाहेर ज्या क्रॉसओव्हर पॉईंटवर रुळावरून घसरले त्या ठिकाणी 10 किमी प्रतितास वेगावर निर्बंध लादण्यात आले. हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवांना होणारा विलंब याचाच परिणाम आहे,” असे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, आर.के यादव यांनी रुळावरून डबा घसरलेल्या जागेची पाहणी केली आणि भविष्यातील घटना टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुधारात्मक उपाययोजना अंमलात आणण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) जवळ तीन दिवसांत दोन गाड्या रुळावरून घसरल्यानंतर गुरुवार दि.२ रोजी लागू करण्यात आलेल्या वेगावरील निर्बंधांमुळे मुंबईतील हार्बर मार्गावरील रेल्वे सेवांना ३० ते ४० मिनिटांचा विलंब झाला. सीएसएमटीच्या आधी क्रॉसओव्हर पॉईंटवर सोमवार पहिल्यांदा डबे रुळावरून घसरल्याने सेवा तीन तास ठप्प झाली. इतकेच नाहीतर बुधवार दि.१ रोजी चाचणी लोकलचा डबाही रुळावरून घसरला. मध्य रेल्वेच्याने दिलेल्या माहितीनुसार, गाड्यांची रांग लागल्यामुळे या मार्गावरील लोकल गाड्या त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. प्रवाशांना मात्र किमान ४५ ते ५० मिनिटे उशीर गाड्यांची वाट पाहावी लागत होती. या विलंबामुळे प्रवाशांकडून टीकेची झोड उठली होती. अनेकांनी किमान एक तास ट्रेन उशीरा झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि मध्य रेल्वेच्या व्यवस्थापनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
-------
छशिमट प्लॅटफॉर्म १ आणि २ जवळ १० किमी/ताशी सावधगिरीचा आदेश लागू करण्यात आला आहे. परिणामी हार्बर लाइन गाड्या अपरिहार्य कारणांमुळे ३०-३५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
- विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे