गोष्ट एका नेत्याची, एका कल्लोळाची!

    06-Apr-2024   
Total Views |
sharad joshi book


शरद जोशी... हे नाव ऐकल्यावर तुम्हाला आठवत असेल, तो शेतकरी नेता. पण, हे पुस्तक मात्र त्या नेत्याचं नाही. हे आहे त्याच्या नेतेपणाच्या चेहर्‍याआड असलेल्या माणसाचं.

शरद जोशींची स्वभाव वैशिष्ट्य बच्चूने तिच्या त्यांच्यासोबत, त्यांच्या सहवासात घालवलेल्या आठवणींतून मांडली आहेत. बच्चू म्हणजे वसुंधरा काशीकर भागवत. ही तरुणी १८ वर्षांची असताना, प्रथम अपघातानेच म्हणावी, अशी शरद जोशींच्या सान्निध्यात आली आणि त्या अथांग आणि गतिशील प्रवाहासोबत वाहून गेली, असेच म्हणावे लागेल. या प्रवाहाने तिला जगवले, शिकवले, समृद्ध केले आणि प्रवाहाला आवश्यक असलेली ऊर्जा तिच्यात तिच्याही नकळत रुजवली. हे पुस्तक कौतुकाचं वाटतं, याचं मुख्य कारण म्हणजे, जोशींसोबतच्या प्रत्येक संवादाची, त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची, निर्णयांची आणि मतांची लेखिकेने जागरूक नोंद घेतली आहे. तेवढ्यावरच न थांबता, त्याची चिकित्सक मीमांसा केली आहे आणि त्यातून तिची निरीक्षणं तिने शब्दबद्ध केले आहे.

हे पुस्तक म्हणजे, जितकं शरद जोशींचं चरित्र आहे, तेवढंच लेखिकेचंही आत्मचरित्र आहे. तिच्या आयुष्याचा घडत गेलेला मार्ग आणि त्यातून तिची स्वतंत्र मतं आणि आवडीनिवडीही यातून स्पष्ट होतात. त्यांच्याशी भेट होण्यापूर्वीपासून हे पुस्तक सुरू होतं, त्यानंतर मधला प्रदीर्घ काळ त्यांना समजून घेत, आपली मतं ठरवतानाचा कालावधी आणि त्यांच्या नंतर तिचं प्रगल्भ आणि प्रौढ स्त्रीत्व, हे सर्व पुस्तकात आहे.

नेतेपद त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळवलं होत, असं वसुंधरा एके ठिकाणी म्हणते. परंतु, नेतृत्वगुण माणसात जन्मजात असावे लागतात. कमालीची संवेदनशीलता आणि माणसांप्रतीचा आपलेपणा, जबाबदारी बिनदिक्कत घेण्याची आणि ती निभावून नेण्याची सवय, व्यक्ती स्वातंत्र्याविषयीची दुर्दम्य तळमळ हे सर्व गुण त्याच्या स्वभावात असावेच लागतात. स्वातंत्र्य हा शरद जोशींचा ध्यास होता, ते त्यांच्या स्वतःबरोबरच इतरांचेही! तरच त्या शब्दाला अर्थ उरतो.
 
एक उल्लेख जरूर करावासा वाटतो, पुस्तकाच्या शेवटास जोशींनी वसुंधरेस लिहिलेले एक पत्र आहे. त्याखाली त्यांची सही. ती सही पाहूनच त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा एक अंदाज बांधता यावा. या सर्व शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना ‘कॅनव्हास’ मिळावा, अशी भासवणारी प्रदीर्घ रेषा आणि त्यावर मधोमध सुबक पण ठाम उत्तर. शरद जोशी... हा त्यांचा व्यक्तिवेध घेताना, केवळ त्यांना आवडणार्‍या गोष्टीच यात आहेत असे नाही, तर त्यांच्या विशेष आवडीच्या नसलेल्या गोष्टीही आहेत. या गोष्टींकडे ते कसे पाहायचे, हे लेखिकेने सांगितले आहे. साहित्य, गझल, तारुण्य, वैयक्तिक नातीगोती, लिलाकाकू (श्रीमती जोशी), प्रेम, जीवनातली स्त्री आणि पुरुषाची एकमेकाला असलेली गरज, नर्मदा परिक्रमा, विपश्यना, पुस्तके, आर्थिक सक्षमीकरण, लक्षमीमुक्ती, स्वातंत्र्य आणि ऋणनिर्देश ते सर्वच आहे. हा एक प्रवास आहे. एका नेत्याचा आणि त्याच्या अनुयायांचा...

अत्यंत निरीश्वरवादी जोशी जीवनाच्या उत्तरार्धात मात्र श्रद्धाळू होतात. ते उपवास करायला लागतात. शंकराचार्य वाचू लागतात. संध्या करू लागतात आणि शेंडीही ठेवतात. ज्ञानेश्वरी वाचू लागतात. शेवटच्या जीवनकाळात त्यांना सतावणारी जीवन- मृत्यूच्या रहस्याची उकल करून घेण्यासाठी, त्यांनी गुरू केले होते. उत्तरं शोधण्याची अगतिकता ती ही. हा माणूस संपूर्ण आयुष्य उत्तरं शोधत राहिला असावा. ती त्याला मिळतही गेली. पुढे परत प्रश्न. पुन्हा उत्तरं आणि या साखळीतून घडून गेलेलं एक सुफळ कार्य. जोडली गेलेली माणसे, बांधलेली संघटना आणि अपेक्षाही नसताना झालेलं स्वप्नांचं, इच्छांचं सार्थक. हा सार्थकाचा प्रवास म्हणजे हे पुस्तक. शिकण्याजोगं, समजून घेण्याजोगं, ठरवण्याजोगं आणि स्वप्न पाहण्याजोगंही यात विपुल मिळेल. एखादी व्यक्ती, एखादं नातं इतकं आवडून जावं की, ज्याच्याबद्दल लिहिल्याने आपलीच लेखणी परिसस्पर्श झाल्यासारखी सालंकृत व्हावी. असं वाटायला लावणारं पुस्तक.
 
पुस्तकाचं नाव : शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा!
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
लेखिका : वसुंधरा काशीकर भागवत
पृष्ठसंख्या : १५३
मूल्य : २००


 

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.