कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये रामभक्तांच्या विजयाची पताका झळकू लागली आहे. उच्च न्यायालयाने एका खटल्यात रामभक्तांना पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवार, दि. १६ एप्रिल रोजी दोन हिंदू संघटनांना बंगालच्या हावडास्थित राम नवमीची शोभायात्रा काढण्याची परवानगी दिली आहे. अंजनी पुत्र सेना आणि विश्व हिंदू परिषदेने ममता सरकारच्या विरोधाला कोर्टात आव्हान दिले होते. त्यामुळे आता राम नवमीला शोभायात्रा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
'बार अँड बेंच'च्या एका अहवालानुसार, कोलकाता उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती जय सेन गुप्ता यांनी हिंदू संघटनांनी शोभायात्रा काढण्यासाठी परवानगी मागितली होती. गेली १५ वर्षे ज्या रस्त्यावरुन शोभायात्रा काढली जाते तिथूनच ही शोभायात्रा निघणार होती. गेल्या वर्षी शोभायात्रेच्या दरम्यान हावडा मैदानात हिंसाचार उफाळून आला होता. या कारणास्तव ममता सरकारने शोभायात्रा काढण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा, असे निर्देश दिले होते. मात्र, हिंदू संघटनांनी याला विरोध करत न्यायालयात आवाज उठवला.
#JustIn: Calcutta High Court permits two Hindu organisations - Anjani Putra Sena & Vishwa Hindu Parishad, to carry out their annual Ram Navami Shobha Yatra (processions) in Howrah district on April 17. #CalcuttaHighCourt#RamNavami2024pic.twitter.com/5a69v7aL3Y
आता कोर्टाने हिंदू संघटनांची बाजू ऐकून घेत या शोभायात्रांना सशर्थ अनुमती दिली. शोभायात्रेत दोनशेहून अधिक लोक सहभागी होणार नाहीत, याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे. तसेच कुठलीही भडकाऊ भाषणे किंवा नारेबाजी करू नये, असे आवाहनही कोर्टाने केले आहेत. राम नवमीची शोभा यात्रा ही पोलीसांच्या मदतीने शांतता अबाधित राहिल याची खबरदारी घेऊन केली पाहिजे, असे आवाहनही न्यायालयाने केले आहे. राज्य पोलीस दलाने केंद्रीय सुरक्षा दलांचीही मदत घ्यावी, असे निर्देश न्यायलयाने दिले आहेत.
दरम्यान २०२३ मध्ये श्रीराम नवमीच्या दिवशी पश्चिम बंगालच्या कित्येक जागी हिंसाचार उफाळून आला होता. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर उघड झाले होते. रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली होती. कोलकाता उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे याची जबाबदारी सोपविली होती. या प्रकरणात एकूण ११ जणांनी अटक झाली होती.