"राऊतांची पत्रकार परिषद गांभीर्याने घेण्याची गरज नाही!"

मंत्री उदय सामंतांचा टोला

    13-Apr-2024
Total Views | 60

Raut 
 
नागपूर : संजय राऊतांची रोज सकाळची पत्रकार परिषद आपण एवढी गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. याबद्दल उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. ते शनिवारी माध्यमांशी संवाद साधत होते.
 
उदय सामंत म्हणाले की, "संजय राऊतांची रोज सकाळची पत्रकार परिषद आपण एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तीन दिवसांपूर्वी त्यांचं वक्तव्य होतं की, त्यांच्या ३५ जागा निवडणून येणार आहेत. पण ते वाक्य महाराष्ट्राबद्दसल नसून देशाबद्दल होतं. संजय राऊतांसारखे शब्दप्रयोग करायला मी काही साहित्यिक नाही. त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेला तुम्ही एवढं गांभीर्याने का घेता हेच कळत नाही. ज्यांना महाराष्ट्र आणि उबाठासुद्धा गांभीर्याने घेत नाही त्यांना तुम्हीसुद्धा गांभीर्याने घेऊ नका." असे ते पत्रकारांना म्हणाले.
 
उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, "कुणीच कुणाला संपवण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येकाचं कर्म त्याला संपवतो. ज्यापद्धतीने त्यांची कार्यप्रणाली होती आणि ज्याप्रमाणे ते भाजपबरोबर युती असताना काँग्रेससोबत गेले होते त्यातून एकनाथ शिंदेंनी उठाव केला आहे. ज्यावेळी आपण संपत असतो त्यावेळी कुणावरतरी खापर फोडण्यासाठी केलेली ही उठाठेव आहे," असेही ते म्हणाले.
 
तसेच शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी या यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याविषयी बोलताना सामंत म्हणाले की, "भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली असून त्यांच्या सगळ्या शंका दूर झाल्या आहेत. त्यांनाही भविष्यात मानाचं स्थान दिलं जाणार आहे. त्यामुळे भावना गवळींची आजची पत्रकार परिषद ही महायूतीला ताकद देण्यासाठी असेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121