‘मिशन दिव्यास्त्र’ : ‘अग्नी-५’ची ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञानासह यशस्वी चाचणी

    16-Mar-2024
Total Views | 68
Agni 5 Mission Divyastra
 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशात विकसित झालेल्या ‘न्यूक्लिअर बॅलेस्टिक मिसाईल’ ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राचे ‘मल्टिपल इंडिपेन्डंटली टारगेटेबल रिएंट्री व्हेईकल’ तंत्रज्ञानासह (एमआयआरव्ही) पहिले यशस्वी उड्डाण असलेल्या ‘मिशन दिव्यास्त्र’साठी ‘डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञांचे नुकतेच कौतुक केले. ‘मिशन दिव्यास्त्र’ची निर्मिती ही संपूर्णपणे स्वदेशात झाली आहे. त्यानिमित्ताने ‘अग्नी-५’ची संरक्षण सज्जता आणि ‘मिशन दिव्यास्त्र’ यांचा आढावा घेणारा हा लेख...

‘एमआयआरव्ही’मुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा शक्य

‘एमआयआरव्ही’मुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राची भारताने सोमवारी यशस्वी चाचणी घेतली. ‘दिव्यास्त्र’ या नावाने सुरू असलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटांवरून ही चाचणी घेण्यात आली. या यशस्वी चाचणीमुळे असे तंत्रज्ञान विकसित केलेल्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.

‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या ’अग्नी-५’ या आंतरखडीय क्षेपणास्त्राचा पल्ला पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. ‘एमआयआरव्ही’ या क्षेपणास्त्राच्या अंतर्गतच विकसित करण्यात आले आहे. प्रत्येक ‘एमआयआरव्ही’ स्वतंत्रपणे अनेक अण्वस्त्रे/स्फोटक वॉरहेड (३-५) वाहून नेण्यास सक्षम आहे. त्यामुळे एकाच वेळी शेकडो किलोमीटर पसरलेल्या विविध लक्ष्यांवर मारा करण्याची किंवा एकाच ठिकाणी सर्व मारा केंद्रित करण्याची क्षमता प्राप्त होते.


‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञान नेमके काय आहे?

या तंत्रज्ञानाचा वापर लांब पल्ल्याच्या मिसाईलमध्ये करण्यात येतो. यामध्ये एकाच वेळी अनेक ‘वॉरहेड’ (शस्त्रे) घेऊन जाण्याची क्षमता असते. प्रत्येक ‘वॉरहेड’ला वेगवेगळे लक्ष्य भेदण्यासाठी किंवा विविध ‘वॉरहेड’ना एकाच वेळी एकच लक्ष्य भेदण्यासाठी प्रोग्रॅम करता येते. एकाच मिसाईलमध्ये विविध ‘वॉरहेड’ नेता येत असल्यामुळे खर्च कमी होतो.


‘एमआयआरव्ही’चे तीन टप्प्यांमध्ये काम

पहिल्या टप्प्यात हे मिसाईल सामान्य पद्धतीने लाँच केले जाते. दुसर्‍या टप्प्यात हे मिसाईल हवेत असतानाच, विविध ‘वॉरहेड’ वेगळे होतात. तिसर्‍या टप्प्यात प्रत्येक ‘वॉरहेड’ आपल्या आपल्या टार्गेटच्या दिशेने जातं आणि त्याला नष्ट करतं.
 
‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञान वापरून बाह्य वातावरणातून (Outside earths atmosphere) क्षेपणास्त्राच्या साहाय्याने एकाच वेळी शेकडो किलोमीटर पसरलेल्या विविध लक्ष्यांवर मारा करता येतो. प्रामुख्याने अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी, या तंत्रज्ञानाचा वापर होत असला, तरी पारंपरिक अस्त्रेही हे तंत्रज्ञान वापरून डागता येतात. यामुळे सामरिक दलाची (स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड) प्रथम मारा करण्याची क्षमता (First strike capability) वाढते. त्याचबरोबर एकाच वेळी अनेक ठिकाणी मारा करता येत असल्यामुळे, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी मारा करण्यासाठी नव्याने क्षेपणास्त्र डागण्याची गरज उरत नाही. ‘एमआयआरव्ही’मुळे अनेक ठिकाणी मारा करणे होत असल्यामुळे, क्षेपणास्त्र भेदी यंत्रणेचा प्रभाव कमी होतो किंवा होत नाही.

’अग्नी-५’ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये

’अग्नी-५’ क्षेपणास्त्राचे वजन ५० हजार किलो असून, १७.५ मीटर इतकी त्याची लांबी आहे. त्याचा व्यास दोन मीटर म्हणजेच ६.७ फूट असून, त्याच्यावर तीन टनापर्यंतची अण्वस्त्र लावता येऊ शकतात. या क्षेपणास्त्रात तीन स्टेजचे ‘रॉकेट बूस्टर’ आहेत, जे घन इंधनावर चालतात. याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा २४ टक्के जास्त आहे. म्हणजेच एका सेकंदात हे मिसाईल ८.१६ किमीपर्यंत अंतर कापते.

१९८३ साली 'Integrated Guided Missile Development Programme (IGMDP)' कार्यक्रम हाती घेण्यात आला. या माध्यमातून जमिनीवरून हवेत, हवेतून हवेत मारा कऱणारी विविध क्षमतेची क्षेपणास्त्रे विकसित करण्याचे निश्चित झाले. त्याचाच एक भाग म्हणून ’अग्नी’ नावाने विविध लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली. ’अग्नी-५’ हे त्याचे सर्वात शक्तिशाली स्वरूप आहे. जून २०१८ला हे क्षेपणास्त्र सैन्यात दाखल करण्यात आले.


’अग्नी-५’ का महत्त्वाचे?

पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. ’अग्नी-५’च्या मारक क्षमतेमुळे ते आंतरखंडीय क्षेपणास्त्र (InterContinental Ballistic Missile) म्हणून ओळखले जाते. म्हणजे एका खंडातून दुसर्‍या खंडात मारा करण्याची क्षमता या मिसाईलमुळे भारताला मिळाली आहे. हे क्षेपणास्त्र पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जात, पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते. या क्षेपणास्त्रामुळे संपूर्ण चीन हा आपल्या टप्प्यात आला आहे. वेळ पडल्यास तीन टनापर्यंतची स्फोटके किंवा अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता ’अग्नी-५’ची आहे. त्यामुळेच ’अग्नी-५’ला ’ब्रह्मास्त्र’ म्हणूनही ओळखले जाते.


भारतासाठी ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञान का महत्त्वाचे?

आता हेच ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञान स्वबळावर भारताने विकसित केले असून, त्याची चाचणी दि. ११ मार्चला ’अग्नी-५’च्या माध्यमातून करण्यात आली. यामुळे ’अग्नी-५’ची मारक क्षमता नुसती वाढली नसून, ते आता अधिक संहारक झाले आहे. त्यामुळेच या चाचणीला ‘मिशन दिव्यास्त्र’ असे नाव देण्यात आले आहे. अर्थात, सोमवारी झालेली चाचणी ही बनावट स्फोटके वापरत करण्यात आली आणि हे करताना या तंत्रज्ञानाची पूर्ण क्षमता तपासण्यास आली. विशेषतः वातावरणाबाहेर जात, पुन्हा वातावरणात प्रवेश करताना प्रचंड वेगाने आणि वातावरणातील घर्षणामुळे क्षेपणास्त्राच्या अग्रभागावरील स्फोटके ही नष्ट होण्याची शक्यता असते. ’अग्नी-५’च्या माध्यमातून या अडचणीवर मात केली होती; पण या ताज्या चाचणीने ‘एमआयआरव्ही’चे तंत्रज्ञानही आपण सिद्ध केले आहे. तसेच या तंत्रज्ञानामुळे चीनला नक्कीच धाक बसेल.


पाच देशांच्या पंक्तीत भारत
 
‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे असे तंत्रज्ञान असलेल्या अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, चीन व रशिया या पाच देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश झाला आहे. अमेरिका व फ्रान्सने त्यांच्या पाणबुड्यांवर हे तंत्रज्ञान असलेली क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत, तर रशियाने हे तंत्रज्ञान त्यांच्या दोन्ही प्रकारच्या आंतरखंडीय व पाणबुडीवरून डागण्याच्या क्षेपणास्त्रासाठी वापरले आहे. पाकिस्तानही हे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

भारत आणि चीन क्षेपणास्त्र/अणुयुद्ध

भारताचे चीनशी अणुयुद्ध होईल का? खरं तर १९४५ नंतर अणुबॉम्बचा वापर जगात कोठेच झाला नाही, तरीदेखील पाकिस्तान व चीनकडून वेळोवळी मिळणार्‍या धमक्यांपासून रक्षण करण्याकरिता अणुयुद्धाची तयारी करणे गरजेचे आहे. मात्र, रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धात क्षेपणास्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो.

अणुयुद्धाकरिता अणुबॉम्ब ( war head) व तो टाकण्याकरिता वाहन (Carrier) दोन्ही गरजेचे आहेत. आकाशातून अणुबॉम्ब टाकण्याकरिता आपल्या हवाईदलात ‘सुखोई’, ‘मिराज’ अशी विमाने सुसज्ज आहेत. ही सध्याच्या गरजेसाठी पुरेशी आहेत. पाणबुडीतून क्षेपणास्त्राद्वारे अणुबॉम्ब टाकण्याची क्षमता आपल्या नौदलाकडे नाही. ती तयार व्हायला वेळ लागेल.

जमिनीवरून क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता ’पृथ्वी’ व ’अग्नी’ या दोन्ही मिसाईलमध्ये आहे. ’पृथ्वी’ क्षेपणास्त्राचा पल्ला १०० ते ७५० किमीचा आहे व ’पृथ्वी’ भारतीय लष्करात कार्यरत आहे.

चीनवर हल्ला करण्याकरिता ’अग्नी’सारख्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची गरज आहे. ‘अग्नी-५’च्या परीक्षेमुळे अशी गरज पूर्ण झाली आहे.

आण्विक तसेच पारंपरिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता ’अग्नी-१’ ते ’अग्नी-५’मध्ये आहे. भारताला ’एमआयआरव्ही’ प्रणाली तैनात करण्याकरिता संशोधन सुरू ठेवावे लागेल. सध्याच्या अंदाजाप्रमाणे ’अग्नी-५’ ‘एमआयआरव्ही’सोबत पुढच्या काही वर्षांत अनेक परीक्षणे केल्यानंतर सामील होतील. आशा करूया की, आपले शास्त्रज्ञ ही कामगिरी नियोजित वेळेत पार पाडतील.

भारताने यंदा संरक्षणासाठी ६.२१ लाख कोटी रुपयांची (सुमारे ७५ अब्ज डॉलर) तरतूद केली असली, तरी चीनच्या तुलनेत ती एक तृतीयांश आहे. सैन्यदलांचे आधुनिकीकरण आणि नवतंत्रज्ञानाचा वापर या चिनी धोरणाकडे पाहतानाच, भारताने आपली संरक्षण सज्जता वाढविण्याची आवश्यकता आहे.

स्वदेशात विकसित झालेल्या ’अग्नी-५’ या क्षेपणास्त्राचे, ’एमआयआरव्ही’ तंत्रज्ञानासह पहिले यशस्वी उड्डाण केल्याबद्दल, ’मिशन दिव्यास्त्र’तील ’डीआरडीओ’तील शास्त्रज्ञांचे, आपण पुन्हा एकदा अभिनंदन केले पाहिजे.

(नि.) ब्रि. हेमंत महाजन


अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121