मराठीच्या आधुनिक काळातील नव्या विकास दिशा शोधणे महत्त्वाचे : सदानंद मोरे

    26-Feb-2024   
Total Views |
Sadanand More


“आधुनिक काळात मराठीचा वापर विविध माध्यमातून, विविध आघाड्यांवर कसा होतोय हे पाहताना त्यांच्या पुढील काळातील विकासाच्या दिशा कोणत्या असतील, यांचा वेध घेणे महत्त्वाचे ठरते,” असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले. आज मराठी भाषा गौरव दिन. यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मराठीचे भवितव्य, मराठीची राजकीय संस्कृती, साहित्य संस्कृती आणि तिचे बदलते प्रवाह यांसारख्या विविध मुद्द्यांवर मोरे यांनी दिलखुलास चर्चा केली. मराठी आणि साहित्याच्या क्षेत्रात या एवढ्या वर्षांत काय घडलंय ते सांगताना आणि त्यातील अंतर्प्रवाह जोखताना डॉ. सदानंद मोरे यांच्याशी साधलेला हा संस्कृतीसंवाद...

महाराष्ट्रावर अनेक आक्रमणे झाली, मुसलमानी असो, पोर्तुगीजांची असो, अगदी अलीकडे ब्रिटिशांची... मराठीने या काळात अनेक परकीय शब्दही स्वीकारले, तिची रचना बदलली. या मराठी भाषेच्या या स्थित्यंतरांकडे तुम्ही कसे पाहता? ही समग्र मराठी टिकवण्यासाठी बोलींचे आणि प्रमाणभाषेचे काय योगदान अपेक्षित आहे?

तुला ज्ञात असलेली आक्रमणं इतिहासातली लिखित असतील, पण त्याही पूर्वीपासून या प्रदेशावर आक्रमक चाल करुन येत असतं. दीर्घकाळ राज्यही करत. यासाठी आपल्याला मराठीचा इतिहास पाहायला हवा. ‘महाराष्ट्री’ आकारास आली ती यादव काळात, 13व्या शतकात. त्याहीआधी भाषा बोलली जात होतीच. तिला आपण काय नाव द्यायचं? खरंतर भाषा हे माणसांचे एक वेगळे इंद्रिय आहे, असेच म्हणावे लागेल. त्या इंद्रियाने तिचा वापर आपापल्या बुद्धीला पटेल तसा केला. प्रवास झाले, भाषेचा प्रसार झाला. तिचा पट विस्तारला. मनुष्य हा प्राणी आहे, त्याला भाषा अवगत आहे, म्हणून त्याच्या समूहाला आपण ‘कळप’ म्हणत नाही. आपण कसं आपल्या आजीला आपल्या पूर्वजांबाबत विचारू शकतो, तसे प्राणी विचारु शकत नाही. या भाषेमुळे आपल्या ज्ञानात भर पडते आणि ज्ञानामुळे बुद्धीचा विस्तार होतो. भाषा आणि बुद्धी म्हणून एकमेकांची अगदी जवळचा संबंध राखून आहेत.आता मी तुझ्या प्रश्नाकडे येतो. आजची मराठी हे मूळ ‘महाराष्ट्री’च उत्क्रांत स्वरूप आहे. 13व्या शतकात यादव साम्राज्यामुळे तिचा विस्तार झाला आणि राज्यव्यवहाराची भाषा मराठी असल्याने ती व्यवहारात आली आणि टिकली.

‘महाराष्ट्री’च महत्त्व सांगतो. कात्यायनाने सर्व भाषांचे व्याकरण तयार केले. तेव्हा त्याने सर्वप्रथम ‘महाराष्ट्री’चे व्याकरण तयार केले आणि ते संपूर्ण केले. इतर भाषांच्या व्याकरणात जे वेगळे आहे, तेवढेच लिहून ठेवले. इतर ठिकाणी दाखले ‘महाराष्ट्री’चे दिले. त्या काळातील संस्कृत नाटकातही ‘महाराष्ट्री’चा वापर मोठ्या प्रमाणावर झालेला आढळतो. समीक्षकांनीही संस्कृतातील ‘महाराष्ट्री’चे स्थान मान्य केले आहे. पण, ही ‘महाराष्ट्री’ म्हणजे ‘मराठी’ नव्हे. आजची मराठी हे तिचं उत्क्रांत रूप आहे, हे पुन्हा एकदा सांगतो.आता तू वाचलेल्या आक्रमणाकडे येतो. आजवर झालेली आक्रमणे इथल्याच जवळपासच्या प्रदेशातली होती. संस्कृतीत मोठ्या प्रमाणावर अभिसरण घडलं ते मुसलमानी आक्रमकांच्या वेळी. खाद्यसंस्कृती, भाषा, भक्तीच्या पद्धतींपासून सर्वच. पण कौतुकाचं म्हणजे, तेव्हाही मराठी टिकली. ती टिकवली संतांनी! भाषेचा विस्तार बहुतांशी धार्मिक अंगानेच झाला. अभंग, भारूड, लोककला, ज्ञानेश्वरी आणि समग्र संतसाहित्य. या सर्व संतांनी ती मराठी इथंवर आणली. ही स्थित्यंतरं इतकी विविध प्रकारची आहेत की आपण त्यांना कोणत्या परिमाणात मोजू शकत नाहीत. या सर्व अभिसरणांतून मराठी समृद्ध झाली.

आपण म्हणतो की, कलेला, तिच्या अभिव्यक्तीला राजाश्रय लागतो. भाषेचेही तसेच. प्रशासकीय कामांमध्ये जोवर मराठीला आश्रय मिळत नाही, तोवर तिच्या वृद्धीला मर्यादा येणारच. असे असेल तर प्रशासकीय कामकाजात मराठीचा अंतर्भाव करण्यात नेमक्या काय अडचणी आहेत?

तू लक्षपूर्वक पाहिलंस तर आपल्याकडे जे राजकीय मॉडेल आहे, ते अजूनही ब्रिटिश आहे, हे तुझ्या लक्षात येईल. त्यावेळी गोखले, टिळक आपली खासगी पत्रेही इंग्रजीतच लिहीत. त्यावेळी शाळाच इंग्रजी माध्यमाच्या असल्याने ही सर्व मंडळी उत्तम इंग्रजी बोलत. म्हणून लिखाणाची भाषाही तिचं राहिली. आजही तो प्रभाव आपल्यावर मोठ्या प्रमाणात आहे. हा प्रश्न भावनिक नाही, व्यावहारिक आहे. आपण तिला उगाच भावनिक आवरण चढवतो. टिळकांचं मंडालेला जाण्यापूर्वीचं बचावाचं भाषण तू वाचलं आहेस का? तो सर्व भाषिक युक्तिवाद आहे. ते समजावून सांगतायत सरकारला की, आम्ही ‘केसरी’त जे शब्द वापरले आहेत, त्यांचे शब्दशः भाषांतर केल्यास जो इंग्रजी अर्थ प्रतीत होतो, तो अर्थ मराठी वाचकांना अभिप्रेत नाही. हे किती मोठे नुकसान आहे मराठीचे? पण, असे घडत राहते आणि आपण त्याला पायबंद घालू शकत नाही.आज मराठी लेखनासाठी आपण देवनागरी लिपी वापरतो. पण, यापूर्वी ती एकाहून अधिक लिपीतून लिहिली जायची. आज आपण म्हणतो दुकानांच्या पाट्या मराठीत असायला हव्यात. खरंतर मराठी जीवंत राहील का, असा प्रश्न अनेकांना भेडसावतो आणि ती जीवंत ठेवण्यासाठी आपण प्रयत्नही अनेक स्तरांवर करतो.


तर मग मराठी भाषेच्या संवर्धनात लिपीचा किती हात आहे?


खरंय, मराठीचं देवनागरीकरण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. भाषेच्या प्रांतात लिपी फार महत्त्वाची भूमिका बजावते. हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की, उर्दू भाषा बघ. आपल्या सर्व भारतीय लिपी साधारण एका वळणाच्या, मात्र उर्दू आपण कशी पाहतो? अरबी प्रांतातून ती आली असली, तरीही उर्दू/रेखता ही खरेतर हिंदुस्थानी भाषा. पण, लिपी वेगळी असल्याने आपण तिला ‘आपली’ म्हणत नाही. बघ! तू म्हणालीस तसे पाट्यांचे नाव देवनागरीत केल्याने फारसे काही होणार नाही, पटतंय मला. आपण एखाद्या इंग्रजी नाव असलेल्या उपाहारगृहाचे नाव देवनागरीत लिहिले. हे देवनागरीकरण, आता आत गेले, तर तिथे किती मराठी पदार्थ दिसतील? दाक्षिणात्य, उत्तर भारतीय पदार्थही दिसतात. पण, आपण त्यांना नावं ठेवू शकत नाही. कारण, हे पदार्थ मराठी माणसांनी स्वीकारले आहेत. ही संस्कृती आपण स्वीकारलीय आणि हा स्वीकार उत्तम आहे. हा व्यापक पट लक्षात आला पाहिजे.

मराठी असा राजकीय अजेंडा घेऊनच काही पक्ष उदयास आले, पण तरीही तीचं अस्तित्व म्हणावं तेवढं का आकारास येत नाही?


मराठीचा व्यापक पट लक्षातच नाही येत गं! मराठी केवळ भाषा नाही. तो ‘महाराष्ट्री’ संस्कृतीचा एक भाग आहे आणि तेवढाच गुंतागुंतीचा. त्यात खाद्य संस्कृतीपासून बरंच काही येतं. आता कित्येक नव्या गोष्टी, त्यांची परकीय नावं मराठीने स्वीकारली आहेत. मराठी बोलली जाणार्‍या विविध भागांत तिची रूपं वेगवेगळी आहेत. एकंदर स्वरूप सहज आवाक्यात येण्याजोगं नाही. या राजकीय पक्षांना हे मोठं आव्हान झेपलेले नाही. अर्थात, त्यांनी पायाभरणी केली आणि ती प्रशंसनीयच आहे. या राजकीय पक्षांच्या दबावामुळे सरकारला काही निर्णय घ्यावे लागले. ते घेण्यास या पक्षांनीच भाग पडले, हे विसरण्यासारखे नाही. अभ्यासाअभावी हे घडले असे मला वाटते. अभ्यासपूर्व धोरण राबवले असते, तर ते तडीस नेता आले असते. अजूनही लोकसहभागातून हे शक्य आहे. विचार व्हायला हरकत नाही.


मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी कित्येक वर्षांपासूनची आग्रही मागणी अद्याप प्रलंबित आहे. तसेच तुमची नुकतीच ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात दर्जासंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार्‍यासाठी गठित केलेल्या समितीवरही निवड झाली आहे. तेव्हा हा प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो की, मराठीचं हे व्यापक स्वरूप पाहता, अभिजात दर्जाविषयी तुमचं काय म्हणणं आहे? अभिजात भाषेच्या दर्जासाठी जे निकष-नियम आहेत, त्यात मराठी बसत नाही का?


अभिजात भाषेच्या निकषांत मराठी बसते ना! आताचे निकष मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी पूरक आहेत. पण, ते घोडं नेमकं कुठे अडलंय ते सांगताच येत नाही. आता पाहा, उडियाला अभिजात दर्जा मिळतो, मग मराठीला का मिळू नये? संस्कृत आणि तामिळची गोष्टच वेगळी आहे. तामिळ भाषेत काळाप्रमाणे बदल झालेले नाहीत. त्यांनी इतर संस्कृतीचे प्रतिबिंब भाषेवर पडू दिले नाही. संस्कृतीचेही तसेच. मात्र, तामिळ आजही बोलली जाते. सर्व व्यवहार तामिळमध्ये केले जातात. राज्याची ती केवळ राजभाषाच नाही, तर व्यवहार भाषासुद्धा आहे आणि बोलीसुद्धा. संस्कृत आज बोलली जात नाही. आपल्याला तिचा अभिमान वाटतो वगैरे गोष्ट वेगळी. मराठीचे तसे नाही. मराठीचा आदिकाल आपण यादवकाळापासून पाहतो. ‘महाराष्ट्री प्राकृत’ ही मराठीच! ती टिकवण्यासाठी महानुभाव पंथाचे योगदान मोठे आहे. चक्रधर स्वामींच्या ‘लीळाचरित्रा’त ती आपल्याला दिसते. म्हणूनच मराठीला हा दर्जा मिळायलाच हवा. मराठी अभिजात हवी आपल्याला!


साहित्य ही रूढार्थाने अभिव्यक्तीच. मी आता मराठी भाषेकडून साहित्य संमेलनांकडे येतेय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शंभरीकडे वाटचाल करते आहे. तेव्हा नेहमीच वादात सापडणार्‍या साहित्य संमेलनाने कालसापेक्ष होण्यासाठी काय करायला हवं? आजची नवीन पिढी फेसबुकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत असते. ही बदलती लेखन संस्कृती साहित्याच्या मुख्य प्रवाहात शोभून दिसेल का? मला तुमची दोन्ही बाजूंची मते ऐकायला आवडतील.नक्कीच, त्यांचीही दखल घ्यायला हवी, हे खरं आहे. तुझा मुद्दा पटतोय मला. पण तूच सांग, एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती होतेय. पुस्तक छापायचे म्हणजे त्यामागे एक पद्धती असते, ठरावीक सोपस्कार पार पडून पुस्तक प्रकाशित होते. प्रकाशन ही त्याची लोकमान्यता असते. तसं फेसबुकचं होत नाही. फेसबुकवर उत्कृष्ट दर्जाचा मकूर दिवसागणिक निर्माण होतोय, याबद्दल दुमत नाहीच. परंतु, त्यासाठी एक व्यवस्था असायला हवी. मंडळाने या मुद्द्याचा क्वचितच विचार करायला हवा. तसेच समन्वय साधला तर साहित्य संमेलने गाजतील. मला दुसरा एक मुद्दा मांडायचा आहे. तू म्हणालीस कालसापेक्ष. पण, कालसापेक्ष म्हणजे त्या त्या काळापुरते मर्यादित. संमेलनाने कालनिरपेक्ष व्हायला हवे. सार्वकालिक असायला हवे. त्या त्या काळापुरते मर्यादित नव्हे.


रिद्धपूरचे मराठी विद्यापीठ म्हणजे मराठीला फुटलेले आशेचे अंकुर. पण, मला जाणून घ्यायचेय, यात उपयोजित मराठीला किती स्थान आहे? मराठी अभ्यासकांना रोजगारक्षम बनवण्याच्या किती संधी उपलब्ध होतील, तेव्हा या अभ्यासक्रमाचे होणारे संभाव्य फायदे काय आहेत?


मुळात हा मुद्दाच वेगळा आहे. मराठी बोलणार्‍या किंवा अभ्यास केलेल्यांना रोजगार मिळावा, अशी रचनाच यातील अभ्यासक्रमाची नाही. परंतु, कोणत्या क्षेत्रातील मराठीसाठी कशी भाषा असावी, याचे शिक्षण या विद्यापीठातून दिले जाईल. तुला उदाहरणादाखल सांगतो, समजा तू निवेदक आहेस. मग निवेदनासाठीची मराठी भाषा कशी असावी, याचा कोर्स तुला या विद्यापीठात करता येईल. इथून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल किंवा नाही, हा मुद्दाच वेगळा. आज मराठीतील अनेक क्षेत्र मुख्य प्रवाहात येत आहेत. क्षेत्रे वाढतायेत, त्यासाठी विद्यापीठांनी काही करायला नको. परदेशात जसे ‘कॉम्पिटिशनल लिंग्युइस्टिक कोर्सेस’ असतात, तसे आपल्याकडे व्हायला हवेत. यातून मराठीच्या आधुनिक काळातील नव्या विकासाची दिशा शोधणे आणि त्यांचा योग्य वापर करणे महत्त्वाचे ठरेल.

आज वाचन संस्कृतीला अनेक पर्याय उपलब्ध होत असून, ते लोकप्रियदेखील होताना दिसतात. जसे की, ऑडिओबुक्स, वेबसीरिज वगैरे. तेव्हा त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही. पण, भाषेच्या संवर्धनाचा जेव्हा मुद्दा येतो, तेव्हा या नवमाध्यमांचा आणि प्रतिभावंत विचारी मराठी माणसांचा विचार करताना, आजच्या तरुण ‘टेक्नोसॅव्ही’ पिढीकडे पाहता काय मर्यादा तुम्हाला जाणवतात?

तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे ही समाजाची गरज आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आजचे तरुण तंत्रज्ञानाचा वापर करणारच, त्यांच्यावर तुम्ही बंधने घालू नका. वाचायलाच हवे, असा दबाव नको. ऑडिओबुक्स बदलत्या काळाचं अपत्य आहे, ते समाजाच्या गरजेनुसार फोफावणारच आणि तुझ्या एक लक्षात येतंय का, आपण काही वेगळे करत नाही, तर पुन्हा आपल्या श्रवण संस्कृतीकडे जातोय. भारतीय ज्ञानसंपादन करण्याची संस्कृती मुख्यत्वे श्रवण माध्यमातूनच होती. मग आपण लिहू लागलो, लिहू लागलो, म्हणून वाचू लागलो, आज वेळ कमी म्हणून केवळ वाचनासाठी वेळ काढणे जमत नाही. परंतु, जिथे डोक्याचे काम नसते, तेव्हा काम करता करता ऐकू शकतोच की आपण आणि हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे बहुतेकांच्या लक्षात येत नाही. तुम्ही दर्जेदार साहित्यनिर्मिती कराल तेव्हा तीदेखील मोठ्या प्रमाणावर ऐकली जाईल. साहित्यनिर्मिती झालीच नाही, तर ऑडिओबुक्समधून तुम्ही काय ऐकणार?

 
मराठी साहित्यात बर्‍याचदा प्रतिबिंबित होते ती आपली लोकसंस्कृती. आपल्याकडे लोकदेवता अनेक आहेत. आजवर त्यावर बरेच साहित्य निर्माण झाले. पण, आजचे तरुण मात्र फारसे याकडे वळत नाहीत. तरुणांना आपल्या लोकसंस्कृतीशी जोडून घेण्यासाठी आपण काय करू शकतो?

मी पुन्हा पुन्हा सांगतो, लोकसहभाग गरजेचे आहे. आज आपण केवळ सांस्कृतिक कार्यक्रम करा, आम्ही केवळ पाहतो आणि टाळ्या वाजवतो असे म्हणून चालेल का? मग ती कला पुढे जाईल का? सादर करणारे संपले की कला संपली. लोकसंस्कृतीचेही तसेच. बोटावर मोजण्याइतक्यांनी ती जगवावी आणि आपण केवळ तिचा आस्वाद घ्यावा, असे कसे चालेल? कोणतीही कला, लोकसहभागातूनच जीवंत राहते, पुढे जाते. माझं बालपण गावाकडे ढोलकी वाजवत गेलं, आज मी ते वादन नाही करत. शेवटी आपल्याला काय टिकवायचे आहे, काय नाही, हे तो तो काळच ठरवत जातो.


‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’च्या मराठीसाठी प्रस्तावित उपक्रमांविषयी काय सांगाल?

‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’चं काम म्हणजे ग्रंथ छापणे. ही ठरलेली कामे असतात, कुणी काय करायचे, कुणी काय हे ठरलेले असते. सध्या आम्ही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्यावर 18 खंड तयार करतोय. तयार सर्व आहे, त्यांनी केलेले लेखन तर आहेच, त्यांनी दिलेल्या मुलाखती, पत्रे, त्यांच्यावर इतरांनी लिहिलेले लेख असे ‘समग्र तर्कतीर्थ’ असा मोठा विषय आहे. या खंडात साधारण 1930 सालापासून ते 1990 पर्यंतचा काळ आहे. याचे विशेष म्हणजे, तर्कतीर्थ केवळ साहित्य क्षेत्रातच सक्रिय नव्हते, तर सामाजिक, भाषा, संस्कृती, राजकीय आणि इतर कलाविषयक क्षेत्रांतही त्यांचा मोठा सहभाग होता. तसेच विश्वकोश मंडळाचे ते पहिले अध्यक्ष होते, तेव्हा हा एवढा मोठा जवळपास 60 वर्षांचा कालखंड या ग्रंथांतून प्रतिबिंबित होईल. भारतीय वृत्तपत्राचे जनक आपण बाळशास्त्री जांभेकरांना म्हणतो, ज्ञानेश्वरी समजेल अशा मराठी भाषेत त्यांनीच प्रथम आणली, तीसुद्धा यात येईल, हाही एक प्रकल्प सुरू आहे.


रूढार्थाने महाराष्ट्राची भाषा मराठी, असे आपण म्हणू. भाषेला एक स्वभाव आहे, असे मला नेहमी वाटते. आपली भाषा रांगडी आहे. कठोर आहे. तिच्यात सौंदर्य निःसंशय आहे. मग अशा या मराठीचा स्वभाव काय? मराठी माणसांचे विशेष काय? आणि या विशेषत्वाला कशाप्रकारे हाताळल्यावर तिचा गौरव होऊ शकतो?

संकर हा संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. जरी स्वभाव विविध असले तरीही संकर होतोच ना! आता भाषावार प्रांतरचना आपण करायला घेतली. पण, महाराष्ट्राची काही ती होत नव्हती. मुंबईचा मुद्दा आड येत होता. मराठी आणि पर्यायाने मुंबई हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, तर मुंबई हा गुजरातच्या व्यवहाराचा विषय. मग हा मेळ नेमका कसा साधायचा? चळवळ झाली तेव्हा किती मराठी माणसे मेली आणि किती गुजराती? संकर व्हावा लागतो, तेव्हा दोन्ही संस्कृती टिकतात. एखाद्या संस्कृतीवर बहिष्कार टाकून चालत नाही, जे जे उत्तम ते ते घ्यावे असे आपल्याकडे सांगितले आहेच!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.