नवी दिल्ली: भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत ३७० जागांवर विजय प्राप्त करून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली वाहणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात व्यक्त केला.भाजपच्या दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनास नवी दिल्लीतील प्रगती मैदानस्थित भारतमंडपम येथे प्रारंभ झाला. यावेळी सकाळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस संबोधित केले. त्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत ३७० आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) ४०० जागा जिंकणारच, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, ३७० हा भाजपसाठी केवळ आकडा नव्हे तर एवढ्या जागा जिंकून कलम ३७० हटविण्याची आपले बलिदान देणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आदरांजली वाहणार आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्याचे तावडे म्हणाले.
भाजप आणि रालोआचा उमेदवार म्हणजे कमळाचे फुलच आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना पुढील १०० दिवसांचा कार्यक्रम दिला. केंद्र सरकार व भाजपशासित राज्य सरकारांच्या कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, प्रत्येक बूथवरून गतवेळपेक्षा ३७० अधिक मते प्राप्त करणे, यंदा प्रथमच मतदान करणाऱ्या युवा मतदारांना २०१४ पूर्वीची देशाची स्थिती व २०१४ नंतरची देशातील परिस्थिती समजावून सांगणे, महिला मतदारांचा आशीर्वाद घेणे, महिला बचतगट व एनजीओ यांच्याशी संवाद साधणे आदी जबाबदाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचेही तावडे यांनी पत्रकारपरिषदेत नमूद केले.
'त्या'१६१ पैकी बहुसंख्य जागा जिंकणार
गत लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या १६१ जागांवर भाजपने गेल्या ५ वर्षांत विशेष मेहनत घेतली आहे. त्यासाठी भाजपने लोकसभा प्रवास योजना आखली होती. यामध्ये १६१ मतदासंघांमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी ४३० प्रवास म्हणजेच एका मतदासंघात ३ प्रवास पूर्ण केले आहेत. परिणामी या १६१ पैकी बहुसंख्य जागा भाजप जिंकणार आहे, असे तावडे यांनी यावेळी सांगितले.
आरोपमुक्त आणि विकासयुक्त कारभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान म्हणून गेल्या २३ वर्षांपासून प्रशासनप्रमुख म्हणून काम करत आहेत. एवढ्या वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप न झालेले नरेंद्र मोदी हे पहिलेच नेते ठरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांच्या अपप्रचारास 'आरोपमुक्त आणि विकासयुक्त कारभार' याद्वारे उत्तर देण्याची रणनीती भाजपने आखली आहे.