‘भगवा दहशतवाद’ ते ‘ऑपरेशन सिंदूर तमाशा’ ; प्रणिती शिंदे यांचा ‘सुशील’ वारसा

    29-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ हा प्रसारमाध्यमांमध्ये केलेला तमाशा होता, असे संतापजनक वक्तव्य करून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे या ‘सुशील’ वारसा चालवत असल्याचे दिसून आले आहे.

लोकसभेत २८ जुलै रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेस प्रारंभ झाला आहे. चर्चेच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील विविध खासदारांनी भाग घेतला. यावेळी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दात टिकाही केली. मात्र, टिका करण्याच्या नादात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’ला ‘तमाशा’ असे संबोधून भारतीय सैन्यदलांचाही अपमान केल्याचे चित्र दिसले.

भाजपने प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्यावर टिका केली आहे. आपल्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून भाजपने खासदार शिंदे यांच्या या संतापजनक वक्तव्याचा व्हिडीओ सार्वजनिक केला आहे. “काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पाकिस्तानचा बचाव केला असून ऑपरेशन सिंदूरची त्यांनी निर्लज्जपणे खिल्ली उडवली आहे” असे भाजपने म्हटले आहे.

अर्थात, प्रणिती शिंदे यांच्याप्रमाणेच त्यांचे वडील म्हणजेच देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीदेखील यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून अशाचप्रकारचे संतापजनक वक्तव्य केले होते. देशाचे गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी ‘भगवा दहशतवाद’ ही संकल्पना जन्माला घातली होती. त्यावरून काँग्रेस सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघास लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही शिंदे यांच्या वक्तव्यावरून देशभरात रोष निर्माण झाला होता. अर्थात, त्यानंतर तब्बल दशकभराने शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात तसे केल्याविषयी खेद व्यक्त केला होता. मात्र, शिंदे यांच्या विधानाने भारताच्या पाकिस्तान पुरस्कृत इस्लामी दहशतावादाच्या लढ्यास मोठा धक्का बसल्याचे दिसून आले होते. आतादेखील प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यामुळे भारतीय सैन्यदलांच्या पराक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे.

‘राहुल ऑक्युपाईड काँग्रेस’ आणि थरूर – तिवारी

सध्याची काँग्रेस ही ‘राहुल ऑक्युपाईड काँग्रेस’ असल्याची टिका भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत आपल्या भाषणात केली होती. ‘राहुल ऑक्युपाईड काँग्रेस’ ही देशविरोधी भूमिका घेत असल्याचा टोलाही ठाकूर यांनी लगावला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस खासदार आणि ऑपरेशन सिंदूर शिष्टमंडळाचे सदस्य राहिलेले मनिष तिवारी यांनी एक ट्विट करून स्वपक्षालाच लक्ष्य केले. खासदार तिवारी यांनी तिवारी यांनी त्यांना आणि शशी थरूर यांना चर्चेत का समाविष्ट करण्यात आले नाही यावरील एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यासोबत तिवारी यांनी ‘पूरब और पश्चिम’ या सिनेमातील "है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहा के गाता हूं, भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं. जय हिंद," या लोकप्रिय गाण्याचे कॅप्शनही दिले आहे.