जळगाव : वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणीसह सर्व ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्यास प्राधान्य द्यावे. सेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीतच सेवा द्यावी. तसेच वीजहानी कमी करून वीजबिलांच्या वसुलीला आणखी वेग द्यावा असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंगळवारी (दि. २९) कोकण प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
जळगाव येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जळगाव, नाशिक, कल्याण, भांडूप व कोकण परिमंडलातील विविध कामे, योजनांचा लोकेश चंद्र यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, संचालक (संचालन/प्रकल्प) सचिन तालेवार, कार्यकारी संचालक श्री. प्रसाद रेशमे (प्रकल्प), सौर प्रकल्पांचे सल्लागार श्रीकांत जलतारे, मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी (जळगाव), श्री. सुंदर लटपटे (नाशिक), चंद्रमणी मिश्रा (कल्याण) व संजय पाटील (भांडूप) उपस्थित होते.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र म्हणाले, दर्जेदार वीजपुरवठा व ग्राहकसेवा, वीजबिलाची शंभर टक्के वसूली तसेच तांत्रिक व वाणिज्यिक हानी कमी करणे या त्रिसूत्रीनुसार प्राधान्याने काम करावे. गेल्या काही दिवसांमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. ही गंभीर बाब आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ताबडतोब उपाययोजना कराव्यात. वारंवार वीजपुरवठा खंडित होणारे भाग ओळखून प्रभावी उपाययोजना करा. पायाभूत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक आराखडे करून संबंधित कामांना वेग द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
गेल्या एप्रिलपासून वीजबिलांच्या थकबाकीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबिल वसूलीशिवाय अन्य पर्याय नाही. महसूलवाढ व वसूलीमध्ये हयगय केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असे श्री. लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कोकण प्रादेशिक विभागात वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची मोठी संख्या आहे. परिणामी वीजहानीत वाढ होत आहे. काही वितरण रोहित्रांवर तर चालू ग्राहकांपेक्षाही कायमस्वरूपी खंडित ग्राहकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे विशेष मोहीम राबवून वीजचोरी आढळल्यास त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
वीज दर कपातीचा उद्योगांना लाभ – जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांशी लोकेश चंद्र यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गेल्या अडीच वर्षांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीमुळे महाराष्ट्रात प्रथमच वीज दरात कपात झाली आहे. त्याचा फायदा औद्योगिक ग्राहकांनाही निश्चितपणे होणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये लघु व उच्चदाबाच्या औद्योगिक वीज दरात घट होत जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी उद्योजकांच्या विविध वीज प्रश्नांवर चर्चा करून ते त्वरित सोडविण्यासाठी स्थानिक यंत्रणेला निर्देश दिले. यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्याला सौर कृषिपंप, सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस), विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स आदी योजनांच्या कंत्राटदार एजन्सीचे संचालक व प्रतिनिधींची आढावा बैठक घेतली व विविध कामांना वेग देण्याची सूचना केली.