झारखंड बस अपघातात १८ भाविकांचा मृत्यू

    29-Jul-2025
Total Views |

18-dead-in-jharkhand-bus-accident
 
 
रांची: झारखंडच्या देवघरमध्ये बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला असून यात १८ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील इतर भाविकांची प्रकृती ही गंभीर असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवघरमधील नवापुरा गावात मंगळवार दि. २९ जुलै रोजी पहाटे ५ वाजता हा अपघात झाला.
 
बस आणि ट्रक यांच्यातील ही धडक इतकी भीषण होती कि, बसमधील १८ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त बस आणि ट्रकच्या ढिगाऱ्याखाली अनेक मृतदेह अडकल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, देवघर पोलीस प्रशासनच्या माध्यमातून ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. गोड्डा लोकसभेचे खासदार निशिकांत दुबे यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत १८ जणांच्या मृत्यूची माहिती दिली.
 
पोलीसांच्या म्हणण्यानुसार, बस अपघातातील सर्व मृत व्यक्ती बिहारमधील गयाजी मासूमगंज गावचे स्थानिक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त बस ४० भाविकांना कावड दर्शनासाठी घेऊन देवघरहून बासुकीनाथ येथे जात असताना देवघरपासून जवळच असलेल्या नवापुरा गावात समोरून येणाऱ्या सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला धडकली आणि ही भीषण घटना घडली. पोलीस पुढे म्हणाले की, " बस चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला, झालेल्या अपघातात चालक बसच्या सीटसह रस्त्यावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला." असे पोलीस म्हणाले. दरम्यान, या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.