नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर बोलताना सांगितले की, पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमधील लोक एक दिवस भारतात परत येतील आणि अभिमानाने सांगतील की ते भारतीय आहेत. त्यांनी हा विश्वास व्यक्त करताना स्पष्ट केले की भारताची कारवाई दहशतवादाविरोधात असून, ही कृती भारताच्या स्वतःच्या संरक्षणासाठी आहे. त्यांनी सांगितले की, भारत कोणतीही मर्यादा न ओलांडता दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्याचे ठोस उदाहरण आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, भारताने अचूक आणि नियोजित कारवाईत लष्कर-ए-तोयबा व हिजबुल मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनांच्या नियंत्रणाखाली असलेले नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला इजा झाली नाही. त्यांनी हे ही नमूद केले की, भारताचे उद्दिष्ट केवळ दहशतवादी केंद्रांवर निशाणा साधण्याचे होते आणि यात भारतीय लष्कराची कौशल्यपूर्ण रणनीती दिसून आली. संरक्षण मंत्र्यांनी खुलासा केला की पाकिस्तानने भारतीय लष्करी व नागरी स्थळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी ते सर्व प्रयत्न हाणून पाडले आणि एकाही भारतीय ठिकाणावर हल्ला झाला नाही. हे भारताच्या संरक्षण यंत्रणांची क्षमता आणि सज्जतेचे प्रत्यक्ष उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात संरक्षण मंत्र्यांनी १० मे रोजी पाकिस्तानकडून युद्धविरामाची विनंती झाल्याचा खुलासा केला. भारताने ही विनंती मान्य केली, मात्र स्पष्ट अट घातली की जर पुन्हा कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पुन्हा सुरू करण्यात येईल. ही कारवाई संपलेली नाही, ती सध्या सक्रीय स्वरूपात सुरु आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.संरक्षण मंत्र्यांनी शेवटी स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या सुरक्षा धोरणात एक ऐतिहासिक वळण ठरले आहे. भारत आता दहशतवाद सहन करणारा नव्हे तर निर्णायक पाऊले उचलणारा देश बनला आहे. आपण शांततेचे समर्थक आहोत, मात्र आपल्या सीमांवर कोणत्याही प्रकारचा रक्तपात सहन केला जाणार नाही. लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे आणि गरज पडल्यास भारत जमिनीवर, समुद्रात आणि आकाशातही निर्णायक प्रत्युत्तर देण्यास सिद्ध आहे.
‘ऑपरेशन महादेव’चे संरक्षण मंत्र्यांनी केले कौतुक
‘ऑपरेशन महादेव’ची माहिती सभागृहास देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मी या सभागृहाच्या माध्यमातून भारतीय सैन्य आणि इतर सुरक्षा दलांचे अभिनंदन करतो की त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये टीआरएफ या दहशतवादी संघटनेच्या तीन कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवले आहे. हे तेच टीआरएफचे दहशतवादी आहेत, ज्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम परिसरात २६ निष्पाप नागरिकांची निर्दय हत्या केली होती. ही कारवाई आपल्या सुरक्षा दलांच्या दक्षतेचे, शौर्याचे आणि दहशतवादाविरोधातील त्यांच्याकडील अढळ निर्धाराचे प्रतीक आहे.