सांताक्रूझ येथे हिवाळी मोसमात नीचांकी तापमानाची नोंद
09-Dec-2024
Total Views | 39
मुंबई : हिवाळा ऋतु सुरू असून मुंबईमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. रविवारपासून किमान तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी प्रथमच किमान तापमान २० अंशाखाली नोंदवण्यात आले असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तर सांताक्रूझ येथे हिवाळी मोसमात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागातील कुलाबा येथे सोमवारी १९.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद आहे. तर सांताक्रूझ येथे १३.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. अशातच आता प्रथमच मुंबई येथे २० अंशाखाली तापमानाची नोंद नोंदवण्यात आल्याचे वृत्त आहे. हे तापमान आता रविवारी ३.५ अंशांनी कमी झाले असून सांताक्रूझ येथे प्रथमच हिवाळी हंगामात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यापासून मुंबईतील सांताक्रूझ केंद्रात अनेकदा किमान तापमानाचा पारा १५-१९ अंशावर पोहोचला होता. मात्र, या आठवड्यात तापमानातील घट कायम राहिली असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
उत्तरेकडे थंड वाऱ्याचे प्रवाह वाढल्याने राज्यात पुन्हा थंडी वाढू लागली आहे. राज्यात सध्या किमान तापमानात घट होण्याचा आणि थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, विषुवृत्तीय हिंद महासागरात आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात काही दिवसांपासून कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. यंसंबंधित प्रणालीचे वैशिष्ट्य ठळक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुधवारी तमिळनाडू आणि श्रीलंका किनाऱ्याकडे जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.