नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योगसाधना सत्रात भाग घेतला.
या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. या संकल्पनेतून, पृथ्वीवरील प्रत्येक घटकाचे आरोग्य परस्परांशी जोडलेले आहे या एका गहन सत्याची प्रचिती येते. मानवी कल्याण, आपले अन्न पिकवणाऱ्या मातीच्या आरोग्यावर, आपल्या पाणी पुरवणाऱ्या नद्यांवर, आपल्या परिसंस्थेत राहात असलेल्या प्राण्यांवर आणि आपल्याला पोषण देणाऱ्या वनस्पतींवर अवलंबून असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. योग साधना आपल्याला या परस्पर संबंधांची जाणीव करून देते आणि जगाशी एकरूप होण्याच्या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन करत राहते असे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी जगाच्या विविध भागांमध्ये वाढलेल्या तणाव, अशांतता आणि अस्थिरतेबद्दल चिंता व्यक्त केली. अशा काळात, योग साधना शांततेचा मार्ग देत असून, योग हे श्वास घेण्यासाठी, संतुलन साधण्यासाठी, पुन्हा पूर्णत्वापर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने मानवतेसाठी गरजेचे असलेले विरामाचे बटण झाले असल्याचे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी जागतिक समुदायालाही विशेष आवाहन केले. योग केवळ वैयक्तिक साधना राहू नये तर जागतिक भागीदारीचे माध्यम बनला पाहिजे यावर त्यांनी भर दिला. त्यांनी प्रत्येक राष्ट्र आणि प्रत्येक समाजाला त्यांच्या जीवनशैलीत आणि सार्वजनिक धोरणात योगचा समावेश करण्याचे आवाहन केले. शांततापूर्ण, संतुलित आणि शाश्वत जग निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची कल्पना मोदी यांनी स्पष्ट केली. "योगाने जगाला संघर्षाकडून सहकार्याकडे आणि तणावाकडून उपायांकडे मार्गदर्शित केले पाहिजे, असेही ते म्हणाले.