काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयात दाखल!
ताप, अशक्तपणा आणि घशाचा संसर्ग झाल्याची माहिती
03-Dec-2024
Total Views | 86
मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप आणि अशक्तपणा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून आता त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लवकरच राज्यात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती ठीक नाही. ते सातारा येथील त्यांच्या दरे गावी विश्रांतीसाठी गेले होते. त्यानंतर ठाण्यातील निवासस्थानी परतल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
एकनाथ शिंदेंना घशाचा संसर्ग झाल्याचीही माहिती आहे. तसेच त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली असून त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र, आता त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात येणार आहे.