कोंडी फोडण्यासाठी हवेतील बस वाहतुकीला प्राधान्य; राज्यात बेंगलोरच्या धर्तीवर रोप वे उभारणार
प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्री पदाचा पदभार स्वीकारला
24-Dec-2024
Total Views | 50
ठाणे : वाहतुक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने रस्ते वाहतुकीसोबतच आता हवेतील बस वाहतुकीला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. यासाठी बेंगलोरच्या धर्तीवर एमएमआर क्षेत्रात रोप वे द्वारे बस वाहतुकीची संकल्पना राज्याचे नूतन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांनी व्यक्त केली आहे. सरनाईक यांनी मंगळवारी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
पदभार स्वीकारल्यानंतर ना. सरनाईक यांनी वयोवृद्ध आणि महिलांना ५० टक्के सवलत याप्रमाणे अनेक हितकारक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. राज्यातील जनतेला अधिक चांगल्या आणि सोयीस्कर परिवहन सेवा देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. राज्य परिवहन मंत्री मंडळाचे उत्पन्न वाढवणे व एसटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याकडे प्रामुख्याने भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. एसटी महामंडळात सुसूत्रता आणायची आहे. एसटी ही तळागळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काही कठोर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते वाहतूकीवर येणारा ताण त्याचबरोबर होणारी वाहतुक कोंडीसाठी बेंगलोर रोप वे च्या धर्तीवर हवेतील वाहतुकीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. बँगलोर रोप वे प्रमाणे १५ ते १६ सीटच्या बसेस रोपवे द्वारे एमएमआर क्षेत्रात सुरु केल्यास रस्तावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. या दृष्टीने आपल्या येथे वाहतूक व्यवस्था करता येईल का या दृष्टीने प्रयत्न असेल असे प्रताप सरनाईक म्हणाले. बँगलोरच्या रोप वे वाहतुकीचे निरीक्षण करून त्यांचा अहवाल तयार करण्यात येईल. त्यावर परिवहन विभाग प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करेल. तो दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती ना. सरनाईक यांनी दिली.
हवेतील वाहतुकीमुळे महाराष्ट्र अव्वल ठरेल
हवेतील प्रवासी वाहतूक आपण जर चालू केली तर देशातील महाराष्ट्र राज्य हे एक नंबरचे ठरेल. नफा कमवणारी परिवहन सेवा म्हणून आपल्या राज्याची नवी ओळख निर्माण होईल. हे माझे व्हिजन असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. टप्पा टप्प्याने या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यात येईल. राज्याच्या परिवहन विभागाला अत्याधुनिक, सुसज्ज अशी दिशा देण्यात येईल.
इतर राज्यातील चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव
गुजरातमधील बस डेपो अत्याधुनिक आहेत. त्याप्रमाणे आपले डेपो करण्यात येतील. तसेच कर्नाटकची प्रवासी वाहतूक अत्यंत सुसज्ज आहे. या दोहोचीही पाहणी करण्यात येईल. इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या राज्यात कशा राबवाव्यात या दृष्टीने परिवहन विभाग कार्य करेल. याची ग्वाही ना. सरनाईक यांनी दिली.