केंद्रीय आयोगातील लष्करी अधिकार्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
02-Dec-2024
Total Views | 50
1
मुंबई : चीनमधील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एका उच्च लष्करी अधिकार्याला बडतर्फ करून, त्याची नुकतीच चौकशी सुरु करण्यात आली आहे. गेल्या जून महिन्यातच चीनने भ्रष्टाचाराच्या आरोपावरुनच काही उच्चपदस्थ लष्करी ( Chinese Army ) अधिकार्यांची हकालपट्टी केली होती.
चीनमधील साम्यवादी सरकारच्या शिस्तीबाबत कायमच चर्चा केली जाते. त्या माध्यमातून साम्यवादच कसा योग्य, हे दर्शवण्याचा एक प्रयत्नदेखील इतर देशातील साम्यवादी कंपूकडून कायम केला जातो. मात्र, या कंपूच्या प्रयत्नांना धक्का लागेल, असे चित्र सध्या चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मध्ये आहे. चीनच्या सैन्यातील ‘मियाओ हुआ’ या चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगातील उच्चपदस्थ अधिकार्याला चीनने तत्काळ सेवेतून निष्कासित केले असून, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्याची चौकशी सुरु आहे. ‘मियाओ हुआ’ हे चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे निरीक्षण करणार्या राजकीय कार्य विभागाचे संचालक होते. या आयोगामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अन्य पाच सदस्यांचा समावेश होता. या पाच सदस्यांपैकी एक म्हणजे ‘मियाओ हुआ’ होय.
शी जिनपिंग हे त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध राबविलेल्या मोहिमेसाठी ओळखले जातात. त्यांच्या पहिल्या कार्यकाळातदेखील शी यांनी चीनमधील अनेक भ्रष्ट नेत्यांना निष्कासित करत, त्यांच्यावर चौकशी आणि कडक कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, असे असून शी जिनपिंग यांनी त्यांच्याशी एकनिष्ठ नसलेल्या अधिकार्यांचा काटा काढल्याची कुजबूज आजही सुरु आहे. त्यातच ‘मियाओ हुआ’ हे केवळ लष्करी अधिकारी नसून, नौदलात दाखल होण्याआधी ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते.
गतवर्षी ४५ लष्करी अधिकार्यांची चौकशी
चिनी लष्कराला सध्या भ्रष्टाचाराने ग्रासले असून, एकामागोमाग एक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. जून महिन्यातदेखील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चीनने त्यांच्या माजी संरक्षणमंत्र्यांची हकालपट्टी केली होती. २०२३ सालीही जवळपास ४५ लष्करी अधिकार्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशीला सामोरे जावे लागले होते.