उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाने तबल्यापासून ताल वेगळा झाला!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली
16-Dec-2024
Total Views | 42
1
नागपूर : (Ustad Zakir Hussain) उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाने तबल्यापासून ताल वेगळा झाल्याची क्षती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. सोमवार, १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "प्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाने तबल्यापासून ताल वेगळा झाल्यानंतर जी पोकळी निर्माण होईल तशीच पोकळी निर्माण झाली आहे. झाकीर हुसैन साहेबांनी तबला वादनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले. जवळपास तीन पिढ्यांना त्यांच्या मैफिलीने मंत्रमुग्ध केले. त्यांचा बाज, आविर्भाव आणि त्यांच्या बोटातील जादू बघणे म्हणजे एक पर्वणीच होती. लाखों तरुणांना त्यांनी तबला वादनाकडे आकृष्ट केले. मला उस्ताद झाकीर हुसैन यांच्यासारखा तबला वाजवायचा आहे हे एकच ध्येय प्रत्येकाचे होते. ही अशी क्षती आहे जी कधीही भरून निघू शकत नाही."
"उस्ताद झाकीर हुसैन यांच्याकडून प्रेरणा घेतलेले शिष्य किंवा त्यांच्या कुटुंबातील मंडळी या सर्वांच्या माध्यमातून त्यांच्या तबला वादनाची पद्धत चिरकाल जिवंत राहील. पण आता मैफिलीमध्ये ते दिसणार नाहीत, ही खंत प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल," असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उस्ताद झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली अर्पण केली.