मनसेचा शिलेदार राज ठाकरेंचा विश्वासू नेता अविनाश जाधव यांचा राजीनामा
राज्याच्या राजकारणात एकच खळबळ
01-Dec-2024
Total Views | 57
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणाच्या माहितीचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे मनसे पक्षासाठी ही धक्कादायक घटना आहे. १ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. अविनाश जाधव हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सच्चे साथीदार आहेत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा राजीनामा अद्यापही स्वीकारला नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासह अनेक मनसे नेत्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाला आहे.
मनसे पक्षाच्या हुकुमाचा एक्का राजू पाटील यांचाही विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये पराभव झाला आहे. यामुळे मतांची टक्केवारी घसरली आहे. काही दिवसांआधी मनसेचे चिन्ह गोठणार असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत होती. अशा स्थितीत अविनाश जाधव यांनी घेतलेल्या निर्णयाने राजकीय भूकंप निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.