१३ हजार दुबार नावे वगळण्याला निवडणुक आयोगाचा हिरवा कंदील
05-Nov-2024
Total Views | 12
ठाणे : लोकसभा निवडणुकीनंतर विविध राजकिय पक्षाकडून दुबार मतदानाच्या तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी सहा विधानसभा क्षेत्रातील तब्बल १३ हजार ४३० दुबार मतदारांची नावे वगळण्याच्या सुचना संबधीत अधिकाऱ्यांना दिल्याचे ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे दुबार मतदारांचा निवडणुक यंत्रणेला एक प्रकारे ताप झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मिरा-भाईंदर, ओवळा- माजिवाडा, कोपरी-पाचपखाडी, बेलापूर, ऐरोली आणि कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदार संघामध्ये २ लाख १७ हजारांच्या आसपास दुबार मतदार असल्याच्या तक्रारी शिवसेना (उबाठा) पक्षाकडून करण्यात आल्या होत्या. तर,मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघात २४ हजार ४२६ दुबार मतदार असल्याची तक्रार राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून करण्यात आली होती. परंतु संपुर्ण ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रात केवळ १३ हजार दुबार मतदार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला होता. या १३ हजार दुबार नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवला होता. निवडणूक आयोगाने १३ हजार ४३० दुबार नावे तत्काळ वगळण्याचे (डिलीट) आदेश दिले असुन त्यानुसार दुबार नावे वगळण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सुचना संबधितांना दिल्याचे शिनगारे यांनी स्पष्ट केले.