समाजातील सर्व घटकांना न्याय दिल्याचे समाधान : आमदार केळकर
13-Nov-2024
Total Views | 42
1
ठाणे : ठाणे शहर तलावांचे शहर असून या शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. मी याच मातीतला असून माझ्या चार पिढ्या या शहरात आहेत. त्यामुळे शहरातील जो ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा आहे, त्याची जपणूक आपणच नाही केली, तर पुढच्या पिढीला शहराचे वैशिष्ट्य कसे कळणार? या हेतूने पहिल्यांदा आमदार झाल्यावर अक्षरशः डम्पिंग बनलेल्या ठाण्याच्या टाऊन हॉलचे नूतनीकरण केले, असे महायुतीचे उमेदवार व ठाण्याचे विद्यमान आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) म्हणाले. केळकर यांचा विधानसभेसाठी निवडणूक अजेंडा काय आहे, याबाबत दै.‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचित केली. यावेळी समाजातील सर्व घटकांना न्याय दिल्याबद्दल समाधान वाटते, असे संजय केळकर म्हणाले.
पंधरा वर्षे आमदार म्हणून तुमची कारकीर्द कशी राहिली?
ठाण्याची लोकसंख्या वाढत असताना मुंबईला जोडणारा पूर्वदृतगती मार्गावरील कोपरी पूल चार लेनचा होता. त्यामुळे दररोज अर्धा ते पाऊण तास वाहतुकीचा खोळंबा व्हायचा. २०११ साली सर्वप्रथम मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन कोपरी पुलाच्या रुंदीकरणाची फाईल उघडण्यास लावून एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला थेट कोपरी पुलावर आणले. तेव्हापासून सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर त्यांना विनंती करून या प्रकल्पासाठी १०० कोटी निधीची मागणी केली. फडणवीस यांनीही गांभीर्याने घेतल्याने आज हा आठ लेनचा कोपरी पूल निर्माण झाला आहे. एनए (अकृषिक) जिझिया कराचा मोठा जाच गृहनिर्माण संस्था आणि आस्थापनाना झाला होता. मोठ-मोठ्या रकमांच्या नोटीस आल्या होत्या. एक घर आणि दोन कर, यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वप्रथम या वसुलीला स्थगिती मिळविली. त्यानंतरही पाठपुरावा सुरू ठेवल्याने महायुती सरकारने हा जाचक एनए कर पूर्णपणे रद्द केला. मागील १५ वर्षांत अशी अनेक जनहिताची कामे तसेच अगणित लोक चळवळी उभारून समाजातील सर्व घटकांना न्याय दिल्याचे समाधान वाटते. मुंबईलगत असल्याने सर्वांचीच प्रथम पसंती ठाण्याला असते. त्यामुळे आज लोकसंख्या २५ लाखांच्या वर पोहोचलेली आहे. या ठिकाणी वाहनांची संख्याही जवळजवळ साडेआठ, नऊ लाख आहे. पुढील काळात ५० मजली इमारती प्रस्तावित आहेत. तेव्हा, नागरिकरण वाढत असल्याने एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून पाणी पुरवठ्याचे नियोजन करणार आहोत. तसेच पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढविल्यास रस्त्यावर वाहने कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होऊन संपू शकते. यासाठी त्या दिशेनेही आम्ही एक व्हिजन डॉक्युमेंट बनवत आहोत.
भाजपच्या विचारधारेचे असूनही मुस्लीम समाज तुमच्यासोबत आहे.
‘सबका साथ, सबका विकास’ हे ब्रीद जपून ‘सबका विश्वास, सबका प्रयास’ या तत्त्वाने माझी वाटचाल सुरू आहे. त्याच्यामुळे जात, धर्म, पंथ, भेद याच्यापलीकडे जाऊन लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही आपण काम करायला पाहिजे. त्यामुळे या शहरांमध्ये जे जे म्हणून मायनॉरिटीमध्ये आहे, त्यांच्या धर्माची गोष्ट न करता त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्याला हात घालून त्या सोडविण्याचा माझा अखंडपणे प्रयत्न असतो. त्यामुळेच हा समाजही आज चांगल्या पद्धतीने माझ्याशी जोडला गेलेला आहे.
ठाण्यात तिरंगी लढत होत आहे, यावेळेस हॅट्ट्रीक होईल?
लढत ही शेवटी लढत असते. आपण आपल्या कामाचा अहवाल आणि विकसित ठाण्याकरिता आम्ही काय करणार आहोत, हे सांगितले आहे. ठाण्याचा मतदार अत्यंत सूज्ञ आणि जागरूक आहे. मतदार राजाबद्दल मला खात्री आहे की, तो योग्य त्या ठिकाणी जागरूकपणे मतदान करतो. म्हणूनच विकसित ठाण्याचे काम करणार्या महायुतीच्या पाठीशी हा मतदार कायम आहे. लोकसभेला ज्या मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिलीत त्याचीच पुनरावृत्ती आता होईल. कारण, या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातूनच ठाणे शहराचा विकास होणार आहे. तेव्हा निश्चितपणे मतदार आम्हाला आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा निवडून देतील, हा विश्वास आहे.
शिक्षकाचा मुलगा ते थेट भाजपचे आमदार, हा राजकीय प्रवास कसा झाला?
मी शिक्षकाचा मुलगा आहे. आमच्या तीन पिढ्या शिक्षकी पेशात आहेत. त्यामुळे कुठलीही पार्श्वभूमी नाही की, राजकीय घराणे नाही. एका आंदोलनाच्या निमित्ताने चळवळीत आलो. देशात तेव्हा आणीबाणी लादून, स्वातंत्र्य हिरावून घेत लोकशाहीवर फार मोठा आघात झाला होता. मी एक उत्तम खेळाडू तसेच, नाट्य कलावंतही आहे. त्यावेळी महाविद्यालयात शिकत असताना एक मोठी चळवळ उभी केली. त्या चळवळीत आपसूक ओढला गेलो. अनेक तरुणांसोबत विद्यार्थी लढा कृती समितीचा मी ठाणे जिल्ह्याचा निमंत्रक होतो. भाजपच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत असून आजपर्यंत निष्ठेने काम करीत आहे. त्यामुळे एक शिक्षकाचा मुलगा म्हणून मला अभिमान वाटतो की, भाजपने एका शिक्षकाच्या मुलाला एकदा विधान परिषदेत आणि दोन वेळा विधानसभेमध्ये आमदार केले.
सर्व समाज घटक तुमच्यासोबत आहेत. याचे गुपित काय?
मी लोकप्रतिनिधी आहे. मी या पदाचा उपयोग जो कुणी अडला असेल तसेच ज्याला काही क्लेश-वेदना असतील त्याच्या करिता केला पाहिजे. अगदी गरिबातला गरीब माणूस केंद्रबिंदू मानून त्याला न्याय दिला पाहिजे. मग तो माझ्या मतदारसंघातील आहे की, नाही ही बाब माझ्यासाठी गौण असते. माझी नेहमी भूमिका असते की, जगातला कुठलाही माणूस माझ्याकडे आला, तरी त्याचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करीन. या तत्त्वामुळेच सर्व घटकातील लोक माझ्याकडे येत असतात. प्रत्येकासाठी कुठलाही आडपडदा न ठेवता मी उपलब्ध असतो. लोक हक्काने येतात आणि त्यांचे जे प्रश्न आहेत, ते मी सोडविण्याचा प्रयत्न करतो.