ठाणे : ठाणेकर जनतेने तसेच समाजातील सर्व घटकांनी भाजप महायुतीला एकदिलाने समर्थन दिल्याने विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजयी झाले. त्यामुळे ठाणेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अशी ग्वाही भाजपचे आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी दिली. ठाणे शहर मतदारसंघात ५८ हजाराहून अधिक मताधिक्य मिळवून आमदार केळकर यांनी हॅटट्रीक केल्यानंतर ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्यानी शहरभर जल्लोष केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विजयानंतर भाजप विभागीय कार्यालयात आमदार संजय केळकर यांना त्यांच्या मातोश्रीने लाडु भरवुन अभिनंदन केले. यावेळी केळकर यांचे कुटुंबिय देखील उपस्थित होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघात भाजप महायुतीतर्फे विद्यमान आमदार संजय केळकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव अशी तिरंगी लढत होती. प्रचारात मनसेने आघाडी घेत विजयाचे दावे केले होते. मात्र, स्वच्छ व सुसंस्कृत प्रतिमेच्या संजय केळकर यांनाच मतदारांनी पसंती दर्शवली. केळकर यांना १ लाख २० हजार ३७३ मते मिळाली असुन त्यांनी उबाठाचे राजन विचारे यांचा ५८ हजार २५३ मताधिक्याने पराभव केला. आठव्या फेरीअखेर केळकर यांना पाऊण लाख मतांचे दान मिळताच भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केळकर यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष केला.
लाडक्या बहिणींनी आर्शिवाद देत मला निवडून आणले तसेच लाडक्या भावाला ओवाळणी घातली आहे. तिसऱ्यांदाही ठाणेकरांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला विजयी केले. विजयासाठी सर्वानीच जीवाचे रान केले आणि जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. तेव्हा, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. अशी ग्वाही आमदार केळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आमदार केळकर यांची हॅटट्रीक होताच कार्यकर्त्यानी व लाडक्या बहिणींनी जल्लोष केला.
या जल्लोषावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा देत, फुलांची उधळण तसेच ढोल – ताशे आणि बॅण्डच्या गजरात लाडु वाटप करून आनंद साजरा केला.
त्यांचा विरोधी पक्षनेताही होणार नाही
हा विजय ठाणेकरांचा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे श्रेय असुन महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याची ताकद केंद्र सरकार आणि महायुती सरकारकडेच आहे. महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारच हवे, म्हणुन जनतेने तसेच समाजातील सर्व घटकांनी महायुतीला एकदिलाने समर्थन दिल्याने आता त्यांचा विरोधी पक्षनेता देखील होणार नाही. असा टोला आ.संजय केळकर यांनी महाविकास आघाडीला लगावला.