मुंबई, दि.३० : विशेष प्रतिनिधी काँग्रेसचे निष्ठावान आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. खरंतर महाराष्ट्रातल्या निवडणूक धामधुमीत महाविकास आघाडीकडून मुख्यंमत्रीपदाच्या शर्यतीत असणार हे नाव अशा इतक्या वर्षांपासून मतदारसंघावर पकड असणाऱ्या नेत्याला या निवडणुकीत एका सर्वसामान्य घरातून आलेल्या महायुतीच्या उमेदवाराने पराभूत केले.
संगमनेर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र हा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप आणि बाळासाहेब थोरातांच्या पराभवाने चांगलाच चर्चेत आला. भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी या मतदारसंघात विशेष लक्ष घातले होते. प्रत्येक प्रचारसभा, प्रचार यंत्रणा यांवर सुजय विखे बारकाईने लक्ष ठेवून होते. तत्पूर्वी राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील या मतदारसंघात आपल्या बैठका, दौरे सुरु केले होते.
लोकसभेत दडलेली थोरातांच्या पराभवाची मुळ
थोरात विखे यांच्यातील विधानसभेच्या जागेसाठी राजकीय संघर्षची खरी सुरुवात ही अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या पराभवानंतरच झाली होती. विधानसभा निहाय विचार करता अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी याठिकाणी सहापैकी ४ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तर २ ठिकाणी भाजपचे आमदार होते. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाने निलेश लंके यांना उमेदवारी देत भाजप उमेदवार सुजय विखे यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. पडद्यामागची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत निलेश लंके यांच्या पाठीमागे काँग्रेसची म्हणजेच बाळासाहेब थोरातांची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लागली होती. लंके यांच्या बाजूने निर्णायक भूमिका बजावल्यानेच सुजय विखे यांचा पराभव झाल्याच्या चर्चा यावेळी रंगल्या. हाच वचपा घेण्यासाठी सुजय विखे यांनी संगमनेर आणि शिर्डी यमतदारसंघावर विधानसभा निवडणुकींसाठी आपले लक्ष केंद्रित केले.
मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आमदारकीही गमावली
बाळासाहेब थोरातांवर त्यांचा गड संभाळून राज्याची जबाबदारीही देण्यात आलेली होती. अशातच बाळासाहेब थोरातांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असल्याने बाळासाहेब थोरातांनीही आपले लक्ष राज्यभरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारवर केंद्रित केले. अशावेळी थोरातांची प्रचाराची धुरा मुलगी जयश्री थोरात हिच्यावर सोपवण्यात आली होती. जयश्री थोरातांनी संगमनेर पिंजून काढला मात्र मतदारांवर प्रभाव पाडण्यात जयश्री थोरात सपशेल फेल ठरल्याचे निकालांतून दिसून आले. थोरातांच्या कार्यकर्त्यांना आपले नेते कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच, त्यांना कुणीही पराभूत करू शकत नाही, असा अतिआत्मविश्वास होता. लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसमध्येदेखील ओव्हरकॉन्फिडन्स आला होता. तोच ओव्हरकॉन्फिडन्स त्यांना नडला आहे. थोरातांनी संपूर्ण राज्यात प्रचार केला पण ते मतदारसंघात कदाचित जनतेपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्याचाच फटका त्यांना बसला.
मैदानात उतरलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टीम
बदलत्या वातावरणात तरुण मतदारांचीही भूमिका निर्णायक ठरली. महायुतीचे उमेदवार असलेल्या तरुण अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी सुजय विखेंनी संगमनेरमधील विखेंनी स्थानिक यंत्रणा तर कामाला लावलीच, शिवाय लोणी, राहुरीतूनही खताळांच्या प्रचाराला यंत्रणा पाठवली. विशेष म्हणजे संगमनेरमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनीही प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली. सुजय विखे यांनीही आपल्या भाषणातून थोरातांवर थेट हल्ले चढवत असतानाच लाडकी बहीण, शेतकरी सन्मान, एसटी प्रवासातील सूट यांसारख्या महायुती सरकारने सुरु केलेल्या योजनांची माहिती दिली. परंतु वसंतराव देशमुख यांनी विखे यांच्या धांदरफळ इथल्या सभेत गरळ ओकली. यातूनच संगमनेरमध्ये उद्रेक झाला. याचे पडसाद राज्यपातळीवर उमटले. मात्र हा पडसाद उलटून लावत नियोजनबद्ध सभा घेत विखेंनी संगमनेरमधील वातारण पालटून टाकले.
मराठा मतंही वळाली आणि अमोल खताळ जिंकले...
अमोल खताळ यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात संगमनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून झाली. विशेष म्हणजे ते बराच काळ बाळासाहेब थोरातांचे कार्यकर्तेही होते. काही काळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांनी काम केले. राष्ट्रवादीतून बाहेर पडत राधाकृष्ण विखे पाटील यांचे काम सुरू केले. विखेंनी अमोल खताळ यांना संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेच अध्यक्षपद दिले. त्याकाळात वर्षभरात त्यांनी सामान्य नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ मिळवून देत प्रभावी काम केलं आणि त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची फळी उभी केली. हीच फळी या निवडणुकात त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि खताळणी थोरातांचा गड भेदत विजयश्री खेचून आणला. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने मराठा समाजाची मतेही महायुतीच्या बाजूने वळाल्याचे या निकालांतून स्पष्ट झाले आहे.