नागपूर : काटोलमध्ये संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी सर्व प्रकारची सबसिडी आणि मदत देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. काटोल विधानसभेचे उमेदवार चरणसिंग ठाकुर यांच्या प्रचारार्थ आयोजित नरखेड येथील सभेत ते बोलत होते. बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड, अकोल्यातील मुर्तिजापूर आणि हिंगणा येथे त्यांच्या सभा पार पडल्या.
नरखेड येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "याठिकाणी मोठ्या प्रमाणात संत्रा पिकतो पण त्यावर प्रक्रिया होत नाही. मागच्या काळात मी आणि गडकरी साहेबांनी मिहानमध्ये रामदेवबाबांच्या कंपनीला जागा दिली आणि संत्र्यावर प्रक्रिया झाली पाहिजे असे सांगितले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक अडचणी आल्या. परंतू, आता त्यांचे काम पूर्ण झाले असून लवकरच उद्धाटन होणार आहे. त्याठिकाणी ते सर्व प्रकारच्या संत्र्यावर प्रक्रिया करणार आहेत. त्यासोबतच काटोल मतदारसंघात संत्रा प्रक्रिया करण्याचा उद्योग उभारण्यासाठी सर्व प्रकारची सबसिडी आणि मदत महाराष्ट्राचे सरकार देईल, असे वचन मी देतो.
यावेळी त्यांनी अनिल देशमुखांवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर १०० कोटी वसूलीचा आरोप लागला. त्यावेळी त्यांच्याच सरकारने चांदीवाल आयोग तयार केला. या आयोगाचा एक रिपोर्ट उद्धव ठाकरेंकडे आला आणि त्यांनी तो बंद करून टाकल्याने तो बाहेरच आला नाही. चांदीवाल आयोगाने मला क्लिनचिट दिली, असे अनिल देशमुख रोज सांगायचे. पण आज न्या. चांदीवाल यांनी मुलाखतीत कुठलीही क्लिनचिट दिली नसल्याचे सांगितले. तसेच सगळे पुरावे असूनही जाणीवपूर्वक दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी आरोप करणारे आणि आरोपी एकाच खोलीत बसायचे आणि कुठलातरी डीसीपी येऊन साक्ष देणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकायचे, असेही चांदीवाल यांनी सांगितले."
"आपल्या नागपूरमधून एक गृहमंत्री होतो आणि त्यांच्यावर १०० कोटी रुपये वसूलीचा आरोप होतो, याचे मला दु:ख आहे. त्यांच्याच पोलिस आयुक्तांनी त्यांच्यावर आरोप लावलेत. उच्च न्यायालयाने हे अतिशय गंभीर प्रकरण आहे, परंतू, तब्येतीच्या आधारे आम्ही देशमुखांना जामीन देत असल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानंतर गेले वर्षभर अनिल देशमुख जे खोटं बोलत होते त्यांची आता पोलखोल झाली आहे. परंतू, केवळ त्यांचीच पोलखोल झाली नाही तर त्यांचे उमेदवार सलील देशमुखांचीदेखील झाली. सलीलबाबूंनी बदलीचे ४० लाख रुपये घेतल्याचा पुरावा सचिन वाझे देत होता पण माझ्या कार्य कक्षेबाहेर असल्याने मला तो रेकॉर्डवर घेता आला नाही, असे चांदीवाल यांनी सांगितले. त्यामुळे असे उमेदवार निवडून दिल्यास आपला काय विकास होणार?" असा सवालही फडणवीसांनी जनतेला केला.
काटोल आणि नरखेड क्षेत्र विकासात मागे!
"काटोल आणि नरखेड क्षेत्र विकासात मागे राहिले. इतक्या वर्षांनंतरही इथे विकासाची मागणी होते. निवडणूका आल्या की, ते नौटंकी करतात, भावनिक होतात, जातीपातीचे राजकारण करतात. निवडणूका आल्या की, हम साथ साथ है म्हणतात आणि निवडणूका संपल्यावर हम आप के है कौन म्हणतात," असा टोलाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला.