भारतात सणासुदींच्या काळात मोठ्या प्रमाणात जाहिरातींवर खर्च केला जातो. या जाहिराती बहुतेकवेळा हिंदूंच्या सणांबाबतच असतात. मात्र, त्यामध्ये काम करणारे कलाकार हिंदू धर्मियांच्या धार्मिक वैशिष्ट्यांबाबत उदासीन असतात. त्यामुळेच यांना वठणीवर आणण्यासाठी ‘नो बिंदी, नो बिझनेस’ मोहीम राबविली गेली. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे.
हिंदू समाजाचे विविध सणवार आले की, विविध माध्यमांमधून मोठमोठ्या जाहिराती झळकण्यास प्रारंभ होतो. अशा जाहिरातींमध्ये दागदागिन्यांपासून, वस्त्र प्रावरणे, अन्य उत्पादने आदींचा अंतर्भाव असतो. या जाहिराती करणारे उत्पादक किंवा अशा जाहिराती बनविणार्या जाहिरात कंपन्या, हिंदू समाजास गृहीत धरून जाहिराती करीत असल्याचे दिसून येते. परंतु, अलीकडे अशा जाहिरातींना हिंदू समाजाकडून विरोध होऊ लागला. हिंदू समाजाचा उत्सव, पण जाहिरातीत दाखविल्या जाणार्या मॉडेल मात्र हिंदू समाजाचे रितीरिवाज गुंडाळून ठेवलेल्या. जाहिरात कंपनी सांगेल तसा त्या मेकअप करणार! हिंदू सणांच्या जाहिरातींमध्ये ज्या महिला, मुली मॉडेल म्हणून प्रदर्शित केल्या जातात, त्यांच्या कपाळावर बिंदी दाखवायचा विसर या जाहिरात उत्पादकांना पडला होता. सण हिंदू समाजाचा, मग त्या समाजाप्रमाणे वेशभूषा, अन्य आभूषणे आणि कपाळावर बिंदी नको का? असा विचार उत्पादकांकडून केला जात नव्हता. अलीकडच्या काळात ‘नो बिंदी, नो बिझनेस’ अशी चळवळ उभी राहिली, आणि अशा जाहिरातींना तीव्र विरोध होण्यास सुरुवात झाली. हिंदूंच्या सणांसाठी जाहिराती करताना, त्या समाजाच्या प्रथा, परंपरा यांचा विचार न करताच या जाहिराती केल्या जात होत्या. दसरा, दिवाळी आणि अन्य हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रचंड जाहिराती करायच्या. त्याद्वारे आपली उत्पादने विकून, कोट्यवधींचा नफा मिळवायचा. पण, असे करताना ज्या समाजाच्या जीवावर आपण व्यवसाय करीत आहोत, त्या समाजालाच गृहीत धरायचे, असे कसे चालेल?‘नो बिंदी, नो बिझनेस’ या चळवळीमुळे आता अशा उद्योगांचे आणि जाहिरात करणार्या कंपन्यांचे डोळे उघडू लागले आहे. काही कंपन्या हिंदू समाजास गृहीत धरून जाहिराती करीत होत्या. अशा जाहिराती करणार्यांवर बहिष्कार टाकण्याचे वारे वाहू लागल्यानंतर, अशा उद्योगांचे डोळे उघडले. सण हिंदूंचे पण जाहिरातींमध्ये त्याचा मागमूसही नाही! हिंदू समाजास गृहीत धरून चालणार नाही, असे उत्पादकांना वाटू लागले आहे. त्यातून हिंदू सणांसाठी केल्या जात असलेल्या जाहिरातींमध्ये बदल होत असल्याचे दिसू लागले आहे.
समाजमाध्यमांवर अत्यंत सक्रिय असलेल्या लेखिका शेफाली वैद्य यांनी ही चळवळ सुरु केली. ‘फॅब इंडिया’ने आपल्या दिवाळी उत्पादनांची जाहिरात करताना, ‘जश्न-ए-रिवाज’ या शीर्षकाखाली जाहिराती केल्या. त्यास तीव्र आक्षेप घेण्यात आला. सण हिंदूंचा आणि जाहिरातीस शीर्षक अन्य समाजाच्या सणास शोभेसे! असे हिंदुस्थानात कसे चालेल? ‘फॅब इंडिया’च्या जाहिरातीस आक्षेप घेतल्यानंतर, त्या कंपनीने सारवासारव केली. ती जाहिरात दिवाळीसाठी नव्हती, असा थातुरमातुर खुलासा केला. पण जो आक्षेप घेण्यात आला, तो लक्षात घेऊन ‘फॅब इंडिया’ने आपल्या मोहिमेचे नाव बदलले, आणि ते ‘झिलमील सी दिवाली’ असे ठेवले! शेफाली वैद्य यांनी सुरु केलेल्या चळवळीस देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. २० लाख लोकांनी त्यास त्वरित प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रसिद्ध उत्पादकांना आणि त्यांच्या जाहिराती करणार्या कंपन्यांना, आपल्या जाहिराती हिंदू समाजास अनुकूल असतील अशा केल्या पाहिजेत, असा ‘साक्षात्कार’ झाला. तसेच प्रत्यक्षात तसे घडण्यास प्रारंभही झाला. दिवाळीच्या जाहिरातीमध्ये हिंदू महिलांच्या कपाळावर बिंदी दिसू लागली. अंगावर परंपरागत वस्त्र प्रावरणे, दागदागिने, हातामध्ये दिवे, पणत्या दिसू लागल्या. हिंदू समाजाच्या परंपरागत चिन्हांचा अशा जाहिरातींमध्ये समावेश केला जाऊ लागला. २०२० मध्ये टाटा समूहाच्या ‘तनिष्क’ या दागिने निर्माण करणार्या कंपनीने जी एक जाहिरात केली होती, त्यावरूनही गदारोळ निर्माण झाला होता. ती जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रवृत्त करणारी असल्याने, टीकेची झोड उठविण्यात आली होती. समाजमाध्यमांवर ‘तनिष्क’ वर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु झाली. त्यावरून निर्माण झालेला वाद लक्षात घेऊन, ‘तनिष्क’ने आपली वादग्रस्त जाहिरात मागे घेत, या वादापासून आपण दूर असल्याचे घोषित केले होते. गुजरातमध्ये तर ‘तनिष्क’ने हिंदू समाजाची माफीही मागितली होती. अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी जाहिराती करताना, त्यांच्या परंपरा लक्षात घेऊन जाहिरती केल्या जात असल्याचे दिसून येते. मग हिंदू सणांच्या वेळी जाहिराती करताना अशी वृत्ती का दिसून येते? या आक्षेपार्ह जाहिरातींच्या विरुद्ध सुरु झालेल्या चळवळीचा प्रभाव दिसू लागला आहे. २०२४ च्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तनिष्कने ‘नव-रानी कलेक्शन’ नावाने आपले उत्पादन बाजारात आणले आहे. त्यामध्ये हिंदू संस्कृतीची आवर्जून दखल घेण्यात आली आहे. एखादी सकारात्मक चळवळ कसा बदल घडवून आणू शकते, आणि मोठमोठ्या कंपन्यांनाही हिंदू समाजास गृहीत धरून चालणार नाही, हे दाखवून देते, हे यावरून लक्षात यावे!
इस्रायल नावावरून भारतात वादंग!
मध्य-पूर्वेत सध्या इस्रायल आणि ‘हमास’, ‘हिजबुल्ला’ या दहशतवादी संघटनाच्या समवेत जोरदार संघर्ष सुरु आहे. या दहशतवादी संघटनांचे वर्चस्व असलेल्या गाझा, लेबेनॉन या प्रदेशांवर इस्रायलचे जोरदार हल्ले सुरु आहेत. या संघटनांना नेस्तनाबूत केल्याशिवाय थांबायचे नाही, असा निर्धार इस्रायलने केला आहे. या दहशतवादी संघटनांपैकी ‘हिजबुल्ला’स इराणचा पाठिंबा आहे. त्यामुळे या संघर्षात इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले करून, आगीत तेल ओतले आहे. मध्य-पूर्वेत सुरु असलेल्या या संघर्षाचे पडसाद जगभर उमटले आहेत. भारतातही विविध राज्यात इस्रायलचा निषेध करणारे मोर्चे काढण्यात आले. अनेक ठिकाणी ‘हिजबुल्ला’, ‘हमास’ समर्थक मुस्लिमांनी उग्र निदर्शने केली. कर्नाटक राज्यात एका बस व्यावसायिकास याचा फटका बसला. मंगलोर शहरातील लेस्टर नावाची व्यक्ती ‘इस्रायल ट्रॅव्हल्स’या नावाने खासगी बस व्यवसाय करीत होती. इस्रायल आणि पॅलेस्टाईन, लेबेनॉन, इराण यांच्यात संघर्ष सुरु झाल्यानंतर, समाज माध्यमांवर लेस्टर याच्या बस कंपनीला जे नाव देण्यात आले होते, त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाली. इस्रायलला विरोध असणार्या स्थानिक जनतेने या नावास आक्षेप घेतला. ज्याच्या मालकीची ही बस आहे तो मंगलोरच्या परिसरात राहणारा. तो १२ वर्षे इस्रायलमध्ये राहिला होता. त्यामुळे त्याला इस्रायलविषयी ममत्व वाटत होते. त्यातून त्याने आपल्या कंपनीस ‘इस्रायल ट्रॅव्हल्स’असे नाव दिले होते. मंगलोर परिसरात राहणार्या काही मुस्लीम लोकांनी इस्रायल नावास आक्षेप घेतला. या बस मालकाचा इस्रायलकडून जी कृती केली जात आहे, त्यास पाठिंबा असल्याचा अर्थही काहींनी काढला. या बसची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाल्यानंतर वातावरण आणखी तापले. सदर बस मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, अशीही मागणी करण्यात येऊ लागली. समाज माध्यमांवर या बसच्या नावाची चर्चा वाढत चालल्याचे पाहून गोंधळून गेलेल्या लेस्टर याने, नावात बदल करण्याचा निर्णय घेतला. इस्रायलमध्ये आपण १२ वर्षे व्यतीत केली. तेथील व्यवस्था आपणास आवडली. त्यातून आपण आपल्या कंपनीस इस्रायलचे नाव दिले, असे त्याचे म्हणणे होते. नावावरून वाढत चाललेला वाद लक्षात घेऊन, शेवटी लेस्टरने आपल्या बस कंपनीचे नाव ‘जेरुसलेम ट्रॅव्हल्स’ असे बदलले. जेरुसलेमबद्दल इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांनाही प्रेम असल्याने, आपण नाव बदलून ‘जेरुसलेम ट्रॅव्हल्स’ असे ठेवले, असे लेस्टर याने सांगितले. संघर्ष मध्य-पूर्वेमध्ये सुरु आहे. पण, आपल्या देशातील काही धर्मांध मुस्लीम इस्रायल समर्थकांविरुद्ध कशी टोकाची भूमिका घेत आहे, याची कल्पना या उदाहरणावरून यावी. जगात मुस्लीम समाज कोठेही राहत असला तरी, मुस्लीम देशांवर आक्रमण झाले, हल्ला झाला, तर ते कसे एकवटून निषेध व्यक्त करतात त्याची प्रचीती या लहानशा उदाहरणावरून आली.
हिंदूंवरील अत्याचाराकडे वेधले लक्ष!
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात तेथील हिंदू समाजाने बांगलादेशमधील हिंदू समाजावर सत्तांतर झाल्यानंतर, जे अमानुष अत्याचार झाले त्याकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. न्यूयॉर्कमधील हडसन नदीवरून उडत असलेल्या एका विमानास एक मोठा कापडी फलक लावण्यात आला होता. त्या फलकावरील मजकुराद्वारे बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांकडे, लक्ष वेधण्यात आले होते. हिंदू समाजावरील अत्याचार थांबवा, असे आवाहन त्या फलकाद्वारे जागतिक समुदायास करण्यात आले होते. फलकावर बांगलादेशचे हंगामी प्रमुख मोहम्मद युनूस यांचे छायाचित्रही होते. हडसन नदी, स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा या परिसरातून हा फलक घेऊन विमानाने घिरट्या मारल्या. बांगलादेशमधील हिंदू समाजावर जे अन्याय होत आहेत, त्याची जगाने आणि संयुक्त राष्ट्रांनी दाखल घ्यावी हा या उपक्रमामागचा हेतू होता, असे या कार्यक्रमाच्या एका आयोजकांनी म्हटले आहे. बांगलादेशमधून हिंदू समाज जर हद्दपार झाला तर, तो देश दुसरा अफगाणिस्तान होईल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले आहे.
दत्ता पंचवाघ