तेव्हा पाकिस्तानी नौदल नेमके लपले होते कोठे?

    25-Aug-2025
Total Views |

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानची घबराट उडाली होती. त्यातून त्या देशाने युद्धविरामाचा प्रस्ताव पुढे केला होता, हे स्पष्ट आहे. भारतीय हल्ल्यांना घाबरून पाकिस्तानने आपल्या नौदलातील युद्धनौका सुरक्षितस्थळी हलविल्या, हे नेमके कशाचे द्योतक आहे

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानचे कंबरडे मोडले, तरी पाकिस्तान मात्र त्या चार दिवसांच्या संघर्षात आम्हीच विजयी झालो असल्याचा डांगोरा पिटत आहे. पाकिस्तान विजयी झाल्याचे सांगून पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी स्वतःस ‘फील्ड मार्शल’ हा किताब देऊन आपलीच पाठ थोपटून घेतली! पण, पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर हे बंकरमध्ये लपून बसल्याच्या बातम्या त्यावेळी झळकल्या होत्या. अशीच एक माहिती पाकिस्तानी नौदलाबाबत पुढे आली आहे. भारतीय नौदल पाकिस्तानच्या कोणत्याही आगळिकीस तोंड देण्यासाठी सदैव सिद्ध असताना, त्याचवेळी पाकिस्तानी नौदलाच्या विविध युद्धनौका पाकिस्तानच्या पूर्व आणि प. भागातील बंदरांमध्ये दडून बसल्या होत्या. ही सर्व माहिती ऐकीव नसून उपग्रहांद्वारे जी छायाचित्रे प्राप्त झाली आहेत त्यावरून उपलब्ध झाली आहे. भारतीय हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठीच पाकिस्तानी नौदलाच्या नौकांनी सुरक्षित बंदरांमध्ये आश्रय घेतला होता, असाच याचा अर्थ नाही का? असे असताना आपलाच विजय झाला अशा बाता पाकिस्तान कशाला मारत आहे? या चार दिवसांच्या युद्धकाळात पाकिस्तानी युद्धनौका नेहमीच्या बंदरांमधून गायब झाल्याचे चित्र उपग्रहाच्या माध्यमातून दिसून आले. उपग्रहांच्या माध्यमाद्वारे जी छायाचित्रे उपलब्ध झाली ती पाहता पाकिस्तानी युद्धनौका या कराचीमधील नेहमीच्या नौदल तळावरून कराची आणि ग्वादर येथील व्यापारी गोद्यांमध्ये हलविण्यात आल्याचे दिसून आले. चार दिवसांच्या संघर्षाच्या वेळी आघाडीवर राहण्याऐवजी पाकिस्तानी युद्धनौकांनी व्यापारी बंदरांमध्ये आसरा घेतला होता. भारताचे संभाव्य हल्ले लक्षात घेऊन, पाकिस्तानी युद्धनौकांनी सुरक्षित बंदर गाठले! महत्त्वाच्या वेळीच पाकिस्तानी नौदलाने केलेली ही कृती पाहता पाकिस्तानी लष्कराची अवस्था किती दुर्बळ होती, ते दिसून येते. पाकिस्तानच्या काही युद्धनौका कराची नौदल तळावरून व्यापारी गोद्यांमध्ये हलविण्यात आल्या, तर काही युद्धनौका ग्वादर बंदरामध्ये हलविण्यात आल्या. भारताच्या दिशेने या युद्धनौका न जाता, त्या इराणच्या सीमेपासून जवळच असलेल्या ग्वादर बंदरामध्ये नेण्याचे कारण स्पष्ट आहे. पाकिस्तानने भारताचा धसका घेऊन ही कृती केल्याचे दिसून येते.

पाकिस्तानच्या काही युद्धनौका बंदरांमध्ये नांगर टाकून उभ्या होत्या, तर काही अन्यत्र हलविण्यात आल्या होत्या. याचा अर्थ पाकिस्तानी लष्कर आणि नौदल यांच्यात समन्वयाचा अभाव होता, असे मत लष्करी तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले. दि. १० मे रोजीच्या दिवशी ग्वादर बंदरामधून व्यापारी नौका हलवून ती जागा युद्धनौकांसाठी रिकामी करण्यात आल्याचे उपग्रहाच्या छायाचित्रांवरून दिसून आले. आपल्या युद्धनौका वाचविण्यासाठी पाकिस्तानने व्यापारी आणि नागरी जागांचा वापर कसा केला, हे यावरून दिसून येते. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानची घबराट उडाली होती. त्यातून त्या देशाने युद्धविरामाचा प्रस्ताव पुढे केला होता, हे स्पष्ट आहे. भारतीय हल्ल्यांना घाबरून पाकिस्तानने आपल्या नौदलातील युद्धनौका सुरक्षितस्थळी हलविल्या, हे कशाचे द्योतक आहे? विजयाचे की पराभवाचे?

म्हैसूर दसरा उत्सवासाठी मुस्लीम लेखिका!


कर्नाटकमधील म्हैसूरमध्ये होणारा दसरा महोत्सव हा केवळ भारतीयांचाच नव्हे, तर विदेशातून येणार्या पर्यटकांचे आकर्षण केंद्र असते. म्हैसूर संस्थान विलीन झाले असले तरी, ज्या थाटात तेथील दसरा उत्सव साजरा होतो तो सर्व सोहळा अवर्णनीय! दसरा हा हिंदूंचा सण. दसर्याच्या निमित्ताने चामुंडेश्वरीदेवीची भव्य मिरवणूक काढली जाते. पण, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने या धार्मिक उत्सवास वेगळा रंग देण्याचा प्रयत्न चालविला आहे. दसरा उत्सवास यावेळी बुकर पुरस्कर विजेत्या लेखिका बानू मुश्ताक यांना शासनाने निमंत्रित केले आहे. या दसरा मिरवणुकीचे उद्घाटन बानू मुश्ताक यांच्या हस्ते होणार आहे. या दसरा मिरवणुकीस प्रारंभ करतेवेळी देवी चामुंडेश्वरीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला जातो, तसेच या मूर्तीसमोर दीपप्रज्वलन केले जाते. ही त्या महोत्सवाची कित्येक शतकांची परंपरा आहे. असे असताना एक मुस्लीम महिला, ज्या महिलेच्या धर्माचा अल्लाशिवाय अन्य कोणावर विश्वास नाही, अशा व्यक्तीच्या हस्ते चामुंडेश्वरीदेवीच्या मूर्तीची पूजा कशी काय करणार? हिंदू-मुस्लीम सद्भाव दाखविण्यासाठी कर्नाटक सरकारला दसरा उत्सवाचेच निमित्त मिळावे का?

कर्नाटक सरकारच्या या निर्णयास भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार प्रताप सिंह आणि आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. या दसरा उत्सवाचे स्वरूप हे पूर्णपणे धार्मिक असताना आणि सर्व परंपरा हिंदू धर्मानुसार पाळल्या जात असताना उद्घाटन सोहळा एका मुस्लीम महिलेच्या हस्ते कशासाठी? लेखिका बानू मुश्ताक यांचा चामुंडेश्वरीदेवीवर विश्वास आहे का? त्या या देवीच्या उपासक आहेत का? दसरा हा या देवीचा उत्सव असताना आणि हा एक धार्मिक उत्सव असताना या सोहळ्याचे उद्घाटन मुस्लीम महिलेच्या हस्ते कशाला, असा प्रश्न या भाजप नेत्यांनी उपस्थित केला आहे. लेखिका म्हणून बानू मुश्ताक महान आहेत. त्यास कोणीच आव्हान देत नाही. त्यांचा आम्हास अभिमान आहे. पण, दसरा हा काही धर्मनिरपेक्ष सण नाही. तो धार्मिक सण आहे. त्यामुळे हिंदू परंपरेनुसारच हा उत्सव साजरा व्हायला हवा, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. बानू मुश्ताक यांच्या हस्ते दसरा उत्सवाच्या सोहळ्यास प्रारंभ करणे योग्य नाही, असा आक्षेप बसवनगौडा पाटील यत्नाळ यांनी घेतला आहे.

या दसरा महोत्सवातील अन्य एखाद्या समारंभास बानू मुश्ताक यांना निमंत्रित करता येऊ शकते, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. म्हैसूरचा दसरा महोत्सव आता बानू मुश्ताक यांच्याशिवाय साजरा होतो की, हिंदू समाजाच्या भावना पायदळी तुडविण्याचा प्रयत्न यानिमित्ताने कर्नाटक सरकारकडून केला जातो, ते नजीकच्या काळातच दिसून येईल!

सीरियन टोळी उद्ध्वस्त!

गुजरात पोलिसांनी अलीकडेच गाझामधील युद्धग्रस्तांच्या नावाखाली मदत गोळा करीत असलेल्या एका सीरियन नागरिकास अटक केली. हा गोळा केलेला पैसा या टोळीकडून स्वतःवरच उधळला असल्याचे लक्षात आले. ही सीरियन टोळी अहमदाबादमधील मशिदींमध्ये जाऊन गाझामधील पीडित जनतेसाठी पैसे गोळा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अली मेघत अल-अझहर नावाच्या इसमास अटक केली. पर्यटक व्हिसा घेऊन हा इसम भारतात आला होता. त्या इसमाची चौकशी केली असता, आपण गाझा पीडितांसाठी पैसे गोळा करीत असल्याचे त्याने मान्य केले. पण, ते पैसे आम्ही आमच्यावरच उधळले, याची कबुली त्याने दिली. अल-अझहर हा एकटाच नसून त्याच्यासमवेत या टोळीत आणखी तीनजण असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. ते तिघेही पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आले असल्याचा संशय आहे. तिघेही अजून फरार आहेत. अंतर्गत सुरक्षा लक्षात घेता पोलिसांनी हे सर्व प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. गाझा पीडितांच्या नावाखाली भारतात येऊन पैसे गोळा करण्यामागे या सीरियन टोळीचा नेमका हेतू काय होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. पर्यटन व्हिसा घेऊन भारतात प्रवेश करायचा, मुस्लीम असल्याने मशिदींमध्ये जाऊन पैसे गोळा करायचे हे म्हणजे अतीच झाले! आपली सुरक्षा यंत्रणा किती तकलादू आहे, याची कल्पना यावरून येते. या सर्व प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणा अधिक तपास करीत आहेत. तसेच, या टोळीला परत पाठविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. पण, भारतात कोणीही यावे आणि वाटेल ते करून जावे, हा प्रकार थांबणार कधी? सुरक्षा यंत्रणेत काही त्रुटी असल्याचेच हे द्योतक नाही का?


दत्ता पंचवाघ
९८६९०२०७३२