अथर्व सुदामेच्या समर्थनार्थ अभिजीत केळकर पुढे सरसावला

    26-Aug-2025
Total Views |


मुंबई: सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण आहे. मात्र सोशल मीडियावर वेगळंच प्रकरण तापलेलं पाहायला मिळत आहे. ते म्हणजे सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामेने केलेलं रील. सध्या या रीलवरुनच वादंग निर्माण झालं आहे. अनेकजण अर्थवला विरोध करताना दिसत आहेत. मात्र काहीजन त्याला पाठिंबाही देताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेता अभिजीत केळकरनेही अथर्वला पाठिंबा दर्शवत एक पोस्ट लिहिली आहे.

दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अथर्वने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका रीलवरुन हा वाद सुरु झाला. अनेक संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर माफी मागत त्याने हा व्हिडीओ डिलीट केला आहे. यावरुनच आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच एका मराठी अभिनेत्याने, अथर्वच्या समर्थनार्थ केलेल्या या पोस्टमध्ये अभिनेत्याने अनेक प्रसिद्ध मुस्लिम धर्मीय कलाकार, आणि सेलिब्रिटींचाही उल्लेख केला आहे.

अभिजीतने या पोस्टमध्ये लिहिलं आहे,



"माझ्या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम...युद्धात देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, संरक्षणाची जबाबदारी सक्षमतेने पार पडणाऱ्या सोफिया कुरेशी, सनई वादक उस्ताद बिस्मिल्लाह खान, तबलानवाज उस्ताद अल्लारखा खान, झाकीर हुसेन, ए. आर रेहमान, सानिया मिर्झा, महाराजांचं संरक्षण करणारे सैय्यद बंडा, तिन्ही खान, रफी साहेब, युसूफ खान, मधुबाला, नर्गिस, मीना कुमारी आणि असे अनंत... यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम, आदर, अभिमान असेल आणि त्यांच्यावर प्रेम करताना त्यांचा धर्म कुठला हा विचार आपल्या मनातही येत नसेल. मला गरज पडली तर माझ्यासाठी ज्याने रक्तदान केलं, डॉक्टर म्हणून उपचार केले, जेवताना ते धान्य ज्याने पिकवलं तो कुठल्या धर्माचा, जातीचा आहे हे मला विचारावंसं ही वाटत नसेल तर मग आपण जिला बुद्धीची देवता मानतो अशा गणपती बाप्पाची मूर्ती कोणी घडवली आहे, त्या माणसाची जात, धर्म कुठला आहे याचा मला का फरक पडावा?" असा सवाल अभिनेता अभिजित केळकरने उपस्थित केला आहे.

तर पुढे तो म्हणतो, "मी ब्राह्मण जातीत जन्माला आलो यात माझं काहीही कर्तृत्व नाही, ना माझ्या आई-वडिलांनी जात पात मानण्याचे संस्कार माझ्यावर केले. सरकारी ठिकाणी, कागदपत्रांवर जात, धर्म लिहावा लागतो म्हणून नाईलाजाने मी तो लिहितो /लिहावा लागतो," असंही अभिजित केळकरने म्हटलं आहे.

"जन्माने मिळालेला माझा हिंदू धर्म, जन्माने मला मिळालेली ब्राह्मण ही माझी जात, मला कुठलाही भेदभाव किंवा द्वेष करायला शिकवत नाही. उलट माझा हिंदू धर्म मला, वसुधैव कुटुंबकम हीच शिकवण देतो. हे असं असताना जर अथर्व सुदामे हाच संदेश आपल्या व्हिडिओतून देत असेल तर तो आपल्यातल्याच काही लोकांना का खटकावा?" असा प्रश्न त्याने आपल्या पोस्टच्या शेवटी विचारला आहे.


अथर्व सुदामेने नेमकं काय पोस्ट केलं होतं?
अथर्व सुदामेचा व्हिडीओ...




प्रचंड टिकेनंतर अथर्वने हा व्हिडीओ डिलीट केला होता. मात्र समाज माध्यमांवर आधीच हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.