मुंबई, दि.२३: मुंबई उपनगरीय लोकल सेवेद्वारे दररोज लाखो प्रवासी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून पश्चिम आणि मध्य रेल्वेवरून ये-जा करतात. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी १७ स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. सुमारे ९४७ कोटी रुपये खर्च करून ही विकास कामे करण्यात येत असून प्रवाशांसाठी विविध सुविधांची निर्मिती आणि स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीला सामावून घेण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये स्थानकांवर डेक बांधणे, सरकते जिने उभारणे, उद्वाहक (एस्केलेटर) बांधणे, नवीन तिकीट विक्री केंद्र उभारणे प्रवासीकेंद्रीत सुविधा उभारणे आणि जीर्ण झालेल्या सोई-सुविधांना नवे रूप देणे अशा कामांचा समावेश स्थानक सुधारणा प्रकल्पांमध्ये करण्यात आला आहे.
एमआरव्हीसीमार्फत करण्यात येत असलेल्या स्थानक विकास सुधारणा प्रकल्पांमध्ये पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या एकूण १७ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरील सांताक्रूझ, खार, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसईरोड, नालासोपारा, या स्थानकांचा समावेश आहे. तर मध्य रेल्वेच्या घाटकोपर, भांडुप, मुलुंड, डोंबिवली, कसारा, नेरळ, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, जीटीबी नगर या स्थानकांचा समावेश आहे. खार रोड आणि घाटकोपर स्थानकावरील फेज-१चे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर फेज-२चे काम प्रगतीपथावर आहे. इतर १५ स्थानकांवरील सुधारणा कामांनाही गती आहे. येत्या ३० महिन्यांत म्हणजे मार्च-एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पश्चिम रेल्वे (WR)
1. खार
2. सांताक्रूझ
3. कांदिवली
4. मीरा रोड
5. भाईंदर
6. वसई रोड
7. नालासोपारा
मध्य रेल्वे (CR)
1. घाटकोपर
2. भांडुप
3. मुलुंड
4. डोंबिवली
5. नेरळ
6. कसारा
हार्बर रेल्वे (HR)
1. जीटीबी नगर
2. मानखुर्द
3. गोवंडी
4. चेंबूर