पंजाब जेल ते मुंबई - बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागची A टू Z कहाणी !
13-Oct-2024
Total Views | 70
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा शनिवारी रात्री खून करण्यात आला. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने स्विकारली आहे.झीशान सिद्दीकी या आपल्या मुलाच्या कार्यलयाबाहेर असताना मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांचा खून केला. या हल्ल्यातील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून,या प्रकरणाबद्दल आता नवीन खुलासे समोर येत आहेत.
पंजाब जेल ते मुंबई
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने स्विकारली आहे. सोशल मीडीयावर पोस्ट शेअर करत या बद्दल त्यांनी खुलासा केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत सामील असणाऱ्या ४ आरोपींपैकी तीन जणं पंजाबच्या तुरुंगात एकत्र होते. तिथे बिष्णोई गँगच्या एका माणसाशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर तीन्ही आरोपी बिष्णोई गँगमध्ये सामील झाले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी या आरोपींना अडीच लाख रूपयांची सुपारी मिळाली. हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी आरोपींकडे, कुरियर द्वारे बंदुका सुपूर्द करण्यात आल्या होत्या. २ सप्टेंबर पासून हे आरोपी मुंबईच्या कुर्ला परिसारात भाड्याच्या घरात राहत होते. बाबा सिद्दीकी यांचा खून करण्यासाठी हे आरोपी संधीच्या शोधात होते. अनेक वेळा त्यांनी बाबा सिद्दीकी यांचा पाठलाग केला, पण त्यांचा डाव फसला. नवरात्री उत्सवाची सांगता झाल्यावर, आरोपींना ही संधी मिळाली. देवीच्या विसर्जनादरम्यान, गर्दीचा फायदा घेत, फटाक्यांच्या आतीषबाजी मध्येच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. जवळपास, ६ गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यातील दोन गोळ्यांनी सिद्दीकी यांच्या शरीराचा वेध घेतला. लगेचच, लीलावती हॉस्पिटल मध्ये सिद्दीकी यांना नेण्यात आले. डॉक्टारांनी प्रयत्नांची शर्थ केली पण, गोळीबारात, सिद्दीकी यांनी अखेर आपला जीव गमावलाच.
सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ.
बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सिद्दीकी यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्याच सोबत, अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर सुद्धा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बिष्णोई गँग आणि सलमान खान यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून तणाव निर्माण झाला आहे. तीन आठवड्यांपूर्वी सलमान खान यांचे वडील
सलीम खान मोर्निंग वॉकला जात असताना, त्यांना एका बुरखाधारी महिलेने धमकी सुद्घा दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. सलमान खान यांच्या घराबाहेर काही महिन्यांपूर्वी बिष्णोई गँगच्या लोकांनी गोळीबार केला होता. घटनांची ही साकळी सलमान खान यांची काळजी वाढवणारी आहे.