मुंबई : प्रभू श्रीरामांविषयी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य मुर्खपणाचे होते, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ५ जानेवारी रोजी व्यक्त केले. ‘बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ...’, अशाप्रकारचा त्यांचा स्वभाव आहे, असेही फडणवीस म्हणाले.
पुणे येथे माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आहेत. ते बहुजनांचे, अभिजनांचे, आदिवासींचे, दलितांचे अशा सर्वांचेच आहेत. ते शाकाहारी होते की मांसाहारी, या विषयात पडण्याची गरज नाही. ज्यांची प्रभू श्रीरामावर श्रद्धा आहे, अशा लोकांच्या भावनाना दुखावण्याचे काम विनाकारण केले जात आहे. आमचे वारकरी, धारकरी, टाळकरी हे सर्व बहुजन असून, ते सर्व शाकाहारी आहेत, या सर्वांचा यातून अपमान नाही का झाला? विनाकारण विवाद निर्माण करून लोकांच्या भावना दुखावून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जे लोक स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत होते, त्यांनी याबाबत साधलेले मौन त्यांची बेगडी वृत्ती दाखवून देत आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लगावला.
स्वतःला शहीद घोषित करण्याचे प्रकार सुरू
रोहित पवार यांच्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विनाकारण स्वतःला शहीद घोषित करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यांच्या कंपनीवर छापा पडला अशी माहिती मिळत आहे, त्याच्या खोलात मी गेलेलो नाही. त्यांचा व्यवसाय आहे. व्यवसायात अशा वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. त्यांनी काही केले नसेल, तर काही होणारही नाही. विनाकारण घाबरण्याची गरज नाही.”