मुंबई : राज्य शासन आणि हायड्रोजन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या विकासकांमध्ये सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विक्रमी सामंजस्य करार करण्यात आले. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधत याबद्दलची माहिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही अत्यंत महत्वाचे सामंजस्य करार झालेले आहेत. यामध्ये विशेषत: ग्रीन हायड्रोजन या विषयात जवळपास २ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. यातून ६४ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. या करारांमुळे ग्रीन हायड्रोजनमुळे महाराष्ट्र सर्वात अग्रणीय राज्य बनणार आहे. ज्या कंपन्यांशी करार करण्यात आले आहेत त्या देशातील अतिशय महत्त्वाच्या कंपन्या आहेत. ग्रीन हायड्रोजनमध्ये पॉलिसी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे."
"याव्यतिरिक्त आरसेलर मित्तल निप्पॉण स्टील या जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीसोबतही जवळपास ६ मिलियन टन एवढा स्टील प्लांटचा सामंजस्य करार केला आहे. यामध्ये ७० हजार कोटींची गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा मोठ्या गुंतवणुकीचा आहे," असेही ते म्हणाले. यासोबतच 'कृषी मुल्य साखळी' हा कार्यक्रम हाती घेतला आहे. याद्वारे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या खरेदीदारांशी करार करुन शेतकऱ्यासोबत मुल्य साखळी विकसित करणार आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी दिली.