अत्यंत मानाचा असा ‘पद्मभूषण’ सन्मान मिळालेले, राम नाईक हे बहुदा मुंबईतील पहिलेच राजकारणी. त्यांच्या कामात खारीचा वाटा उचलणारी, त्यांची कन्या विशाखा कुलकर्णी यांचे यानिमित्ताने मनोगत...
मुलीचा पहिला ‘हिरो’ असतो ‘बाबा!’ माझ्या आणि ताईच्या आयुष्यातल्या या पहिल्या ‘हिरो’ने आमच्या हृदयात स्वतःसाठी अढळपद निर्माण केलंय. आमच्या या ‘हिरो’च्या ‘पद्मभूषण’ राम नाईक यांच्या हिरोगिरीच्या असंख्य सत्य घटनांनी आमचं आयुष्य समृद्ध झालंय.
अगदी लहानपणी आपले बाबा इतरांपेक्षा वेगळे आहेत, याची पहिली खणखणीत जाणीव झाली, ती आणीबाणीत! अनेकदा बाबा घरातून गायबच होत. त्याचं काही विशेष वाटत नसे. एरवीही जनसंघाच्या कामांमुळे बहुतेकदा ते रात्री उशिराच येत. पण, आणीबाणी उठली, मोरारजीभाई पंतप्रधान झाले आणि जनता पक्ष स्थापनेपूर्वी जनसंघाच्या शेवटच्या बैठकीतून परतताना अपघात होऊन दीड-दोन महिने बाबा शीवच्या महापालिका रुग्णालयात होते. सरसंघचालक बाळासाहेब देवरस, अटलजी, अडवाणीजींपासून थेट राजनारायणांपर्यंत अनेकानेक मोठी लोकं बाबांना बघायला यायची, त्यावेळी रुग्णालयात उडणारी धावपळ, थोरामोठ्यांकडून आस्थेने होणारी चौकशी यातून आपले बाबा एकदम ‘खास’ असल्याची जाणीव झाली.
लोकप्रतिनिधी ते कुष्ठपीडितांचे आधारस्तंभ
त्यानंतर लगेचच १९७८ साली बाबा पहिल्यांदा आमदार झाले. आमच्या दोन खोल्यांच्या घरातच त्यांचं कार्यालय सुरू झालं आणि एक दिवस काही कुष्ठपीडित मंडळी दबकत-दबकत आली. संपूर्ण मुंबईत सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या बाबांना एका मतदान केंद्रात मात्र फक्त दोनच मतं मिळाली होती. संघवाल्या राम नाईकांना निवडलं, तर बेकायदेशीर दारू गाळता येणार नाही, भीक मागता येणार नाही, आपलं जीणं मुश्किल होईल म्हणून कुष्ठपीडितांच्या वस्तीत त्या मतदान केंद्रात फक्त दोनच मतं पडली होती. या विरोधकांना आपल्या कामाने, वागण्याने आपलंसं करायचं, या कुष्ठपीडितांचं जीणं सुकर करायचं, असं बाबांनी ठरविलं. हा एक निश्चय गेली ४५ वर्षे ते नेकीने पार पाडताहेत. बोरिवलीच्या कुष्ठपीडितांना संजय गांधी निराधार अनुदान मिळावं, म्हणून पहिल्यांदा मंत्रालयात नेण्यापासून सुरुवात झाली, देशभरातल्या कुष्ठपीडितांच्या विविध संघटनांना सोबत घेऊन राज्यसभेत विनंती अर्ज झाला, आंतरराष्ट्रीय कुष्ठपीडित संघटनेचे अध्यक्ष झाले, देशभरातल्या कुष्ठपीडितांना मासिक निर्वाह भत्त्यासाठी सफल प्रयत्न झाले, राज्यपाल असताना आग्रहाने उत्तर प्रदेशात ’पंतप्रधान आवास योजने’तून प्राधान्याने ३ हजार, ८९७ कुष्ठपीडित कुटुंबांना घरे देण्याची योजना होईल, असे पाहिले. अगदी ‘पद्मभूषण’ जाहीर होण्याच्या काही तासांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडेही कुष्ठपीडितांसाठी विशेषाधिकार वापरायचे साकडे घालायला गेले होते. या त्यांच्या धावपळीतून अगदी सहज सर्वांशी समभावाने वागायचा संस्कार तर झालाच; पण प्रत्येक काम झाले, त्यापेक्षा अधिक चांगले करायचं सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे, हेही मनावर ठसले.
कामाचे व्यसन
स्वतः सतत काम करीत राहायचे आणि दुसर्यालाही कामाला लावायचे अफाट कौशल्य बाबांकडे आहे. सगळ्यांच्या मते, मी बाबांची लाडकी लेक! बहुदा लाडक्या लेकीचा सहवास जास्त मिळावा, म्हणून बाबांनी कौशल्याने त्यांची कार्यालयीन कामे मला सांगायला सुरुवात केली. लहानपणचं ‘जरा फोन लावून दे’चं पुढे त्यांच्या कार्यालय प्रमुखपदात कधी रुपांतर झालं, ते कळलंच नाही. अर्थात, त्यामुळेच त्यांच्या कामांतून ते अधिकच उमगत-भावत गेले. आजही मला लख्ख आठवतंय की, बाबा पहिल्यांदा खासदार झाल्यावर अक्षरशः दुसर्या-तिसर्या दिवशीच दिल्लीला दारात ‘ऑफर’ घेऊन एक व्यक्ती उभी होती. मग काही दिवस अशा दलालांची रांगच लागली होती. डाळ शिजत नाही म्हटल्यावर त्यांचा ससेमिरा थांबला. त्यावेळी देशभरात घरगुती गॅसपुरवठ्याचा असलेला प्रचंड तुटवडा लक्षात घेऊन, प्रत्येक खासदाराला वर्षाला १०० कूपन्स मिळत. मतदारसंघातील ज्या व्यक्तीला खासदार हे कूपन देईल, त्याला वर्षानुवर्षाची प्रतीक्षा सूची डावलून खरोखर तत्काळ गॅस जोडणी देण्यात येई. लक्षावधी कुटुंबे गॅस जोडणीसाठी प्रतीक्षेत असल्यामुळे, या कूपन्स्ला भलतीच मागणी होती. बाबांचा मतदारसंघ क्षेत्र व संख्या यादृष्टीने खूपच मोठा. साहजिकच आमच्याकडे तर त्या १०० कूपन्स्साठी अक्षरशः दिवसाला दहा तरी अर्ज येत. बाबा पेट्रोलियम मंत्री झाले, तेव्हा गॅस जोडणीसाठीची प्रतीक्षा सूची १.१० कोटींवर पोहोचली होती.
अंत्योदय
कामाचा कैफ आणि समाधान याची अनुभूती देणारा काळ म्हणजे त्यांची पेट्रोलियम मंत्री पदाची कारकिर्द. बाबांनी कोणतीही घोषणाबाजी न करता, सर्वप्रथम गॅस जोडणीचे काम हाती घेतले. अतिशय खोलात जाऊन पुरवठा तंत्राचा अभ्यास करून थांबले नाहीत, तर गॅस कंपन्यांना खरं तर त्यांनी वेठीसच धरले. थेट अंदमानपासून लेहपर्यंत नवे बॉटलिंग प्रकल्प उभे केले. अवघ्या पाच वर्षांत प्रतीक्षा सूचीतील १.१० कोटींसह एकूण ३.३७ कोटी नव्या गॅस जोडण्या त्यांनी दिल्या. त्यांनी निर्माण केलेला कामाचा हा वेग दीर्घकाळ पुरला. ज्या पंडित दीनदयाळ उपाध्यायांना आदर्श मानून बाबांनी उत्तम पगाराची नोकरी सोडून पूर्णवेळ जनसंघाचे काम करायला १९६९ पासून सुरुवात केली, त्या दीनदयाळांना अभिप्रेत ’अंत्योदय’ आज मोदी सरकार ‘उज्ज्वला गॅस योजने’तून साकार करते आहे. त्यामागची पार्श्वभूमी बाबांमुळे झाली, या जाणीवेने माझा उर अभिमानाने भरून येतो.
पेट्रोलियमचा सुवर्णकाळ
त्यांची कारकिर्द ही देशाच्या पेट्रोलियम इतिहासात सुवर्णकाळ म्हणून आजही मानली जाते, याची अनेक कारणे आहेत. मंत्रिमंडळातील बहुसंख्य सहकारी साशंक असताना केवळ अटलजी पाठीशी आहेत, या विश्वासाने पहिल्यांदाच परदेशांमध्ये साखालीन, सुदान येथे तेल उत्पादनासाठी केलेली कोट्यवधींची गुंतवणूक (जिची फळे आजही मिळताहेत), देशात तेल उत्खननासाठी नवे ब्लॉक्स दिले, इथेनॉल निर्मितीला सुरुवात केली, आणखी बरंच. पण, मला स्वतःला आजही आश्चर्य आणि अर्थातच आदर वाटतो तो त्यांनी कारगिल युद्धातील ४३९ हुतात्म्यांच्या वीरपत्नी, वीरमातांना पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सी देण्याचा निर्णय घेऊन, अत्यंत तत्परतेने तो राबविला त्याबद्दल! खरं तर बाबा वरकरणी रूक्ष आणि भलत्याच घट्ट मनाचे. ’पद्मभूषण’ दिले जात आहे, हे कळताच त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की, “कुंदाला (माझी आई) फार समाधान वाटलं असतं, ती साथीला होती म्हणून तर आयुष्यात एवढं काम करू शकलो!” ही प्रतिक्रिया जेवढी सहज होती, जणू तेवढ्याच सहजतेने ११ महिन्यांपूर्वी आई गेल्यावरही त्यांनी आपल्या अश्रूंना बांध घातला होता. असे घट्ट मनाचे बाबा कारगिलच्या वीर पत्नींना पेट्रोल पंप, गॅस एजन्सी देताना गहिवरताना दिसले. एखाद्या वीरपत्नीला पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी अकारण नाडताहेत, अशी शंका जरी आली, तरी अक्षरशः प्रचंड संतापलेले बाबा मी पाहिलेत. त्यामुळे कधी-कधी वाटतं, दिवस-रात्र सोबत असूनही आपले बाबा आपल्यालाही अजून पूर्ण समजायचे आहेत.
एक गोष्ट मात्र मला त्यांनी न व्यक्त करताही पक्की ठाऊक आहे. पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून संविधानाने राष्ट्रगीत ‘जन गण मन’ व राष्ट्रगान ‘वंदे मातरम्’ या दोहोंचा समान आदर असला पाहिजे, हे ठरले. मात्र, तरीही अनेक ठिकाणी या दोन्ही गीतांची उपेक्षा होताना दिसे. अगदी देशाचे सर्वोच्च व्यासपीठ मानल्या जाणार्या संसदेतही ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’ गायले जात नव्हते. ही बाब बाबांनी संसदेच्या केवळ निदर्शनाला आणून दिली असे नाही, तर अनेकानेक आघाड्यांवर बाबांनी प्रयत्न केल्याने संसदेत दि. २४ नोव्हेंबर १९९२ रोजी पहिल्यांदा ‘जन गण मन’, तर दि. २३ डिसेंबर १९९२ रोजी पहिल्यांदा ‘वंदे मातरम्’ गायले गेले. तेव्हापासून संसद अधिवेशनाची सुरुवात ‘जन गण मन’ने तर समारोप ‘वंदे मातरम्’ने करायची थोर परंपरा सुरू करू शकलो, याचा बाबांना अपरंपार आनंद व अभिमान आहे. ६० वर्षांहून दीर्घ सामाजिक कारकिर्दीत केलेले हे सर्वोत्तम काम, अशी त्यांची धारणा. साहजिकच प्रजासत्ताक दिनाच्याच निमित्ताने मिळालेल्या ‘पद्मभूषण’ सन्मानाने त्यांना कृतकृत्य वाटते आहे.
विलक्षण योगायोग
आज ५०० वर्षांनी श्रीराम पुन्हा मंदिरात आले. मुघल काळात हे गाव ‘फैजाबाद’ झाले होते. स्वतंत्र भारताच्या सरकार दप्तरीही त्याची तीच नोंद कायम होती. उत्तर प्रदेशचे राज्यपाल झाल्यावर बाबांच्या हे लक्षात आले. ‘बॉम्बे’, ‘बम्बई’चे ‘मुंबई’ करायला मोठा संघर्ष करावा लागला होता. पण, ‘फैजाबाद’चे पुनश्च ‘अयोध्या’ आणि ‘अलाहाबाद’चे ‘प्रयागराज’ त्यांच्या एका स्वाक्षरीने झाले. अयोध्येत मंदिरात श्रीराम स्थानापन्न झाल्यानंतर पाठोपाठ बाबांना ‘पद्मभूषण’ सन्मान मिळाला. या योगायोगाने मी अक्षरशः चकीत आहे!
विशाखा कुलकर्णी
vishakha@ramnaik.com