लखनौ : वाराणसीच्या राष्ट्रीय हिंदू दलाने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचा पुतळा अयोध्येतील धन्नीपूर येथे बांधण्यात येत असलेल्या मशिदीत बसवण्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पत्र पाठवून अखिलेश यादव यांना मुलायम यांचा पुतळा मशिदीत बसवण्याच्या वेळी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
रोशन पांडे यांनी अखिलेश यादव यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, त्यांचे 'स्वर्गीय पिता मुलायम सिंह' आयुष्यभर मुस्लिम समाजासाठी लढत राहिले. अयोध्येत राम मंदिर बांधले जाऊ नये यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. कारसेवकांवर गोळ्या घातल्या. रोशन पांडे पुढे बोलताना म्हटले की, मुलायम सिंह यादव यांचे राम मंदिरात कोणतेही योगदान नसले तरी अयोध्येतील धन्नीपूर येथे न्यायालयाच्या निर्णयानुसार उभारण्यात येत असलेल्या मशिदीच्या उभारणीत त्यांचे नक्कीच योगदान आहे.
या योगदानामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचा पुतळा या मशिदीत बसवण्यात येणार असल्याचे रोशन पांडे यांनी सांगितले आहे. या मूर्तीचा दगड किचौचा शरीफ दर्ग्यातून आणण्यात येणार असल्याचे रोशन पांडे यांनी सांगितले आहे. त्यानंतर हा दगड अजमेर शरीफ, हाजी अली, दारुल उलूम देवबंद आणि कालियार शरीफ या दर्ग्यांच्या पाण्याने शुद्ध केला जाईल.
हा पुतळा मशिदीत बसवण्याचा कार्यक्रम अखिलेश यादव यांनी दिलेल्या वेळेवरच केला जाईल, असे रोशन पांडे यांनी म्हटले आहे. पॅलेस्टाईन, बांगलादेश, पाकिस्तान आणि पॅलेस्टाईन-गाझा या मुस्लिम देशांतील मुस्लिमांना या कार्यक्रमाला आमंत्रित करून जय समाजवादाचा नारा बुलंद करावा, असे आवाहनही त्यांनी अखिलेश यादव यांना केले आहे.
रोशन पांडे यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमियत उलेमा उल हिंद यांच्याकडून मुलायम सिंह यांचा पुतळा मशिदीच्या प्रांगणात बसवण्याची परवानगी मागितली आहे. सर्व खर्च तो स्वत: उचलणार असला तरी कोणीतरी मदत केली तर बरे होईल, असे त्यांनी म्हटले आहे.