मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या सूचना

    06-Sep-2023
Total Views | 26

chandrakant patil


मुंबई :
मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.


मंत्रालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मराठी भाषा विद्यापीठ समितीचे अध्यक्ष सदानंद मोरे, समितीचे सदस्य डॉ. विद्या पाटील, प्रो. राजेंद्र नाईकवाडे, डॉ.अविनाश आवलगावकर, महंत कारंजेकर, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. रुपाली शिंदे, डॉ. केशव देशमुख, डॉ. छाया महाजन, मराठी भाषा विभागाचे सहसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी सर्व समिती सदस्यांनी सर्वांगीण अभ्यास करावा. या विद्यापीठात मराठी भाषेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्यासाठीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. विद्यापीठाची स्थापना या वर्षाच्या आत करण्यासाठी समितीचा अहवाल महत्त्वाचा आहे. तो प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर करावे लागेल. सर्वांनी लवकरात लवकर संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


बैठकीत अभ्यासक्रम कशाप्रकारे राबवले जातील याबद्दल चर्चा करण्यात आली. तातडीने या विद्यापीठाच्या कामकाजास प्रारंभ व्हायला हवा. थीम पार्क क्षेत्रातच याची स्थापना करण्यात येईल व इमारत तयार झाल्यानंतर नव्या ठिकाणी सर्व विभाग स्थलांतरित केले जातील.” असे त्यांनी सांगितले. अध्यक्ष मोरे यांचे स्वागत करून अहवाल सादर करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 


















अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121