नागपूरच्या खाणपट्ट्यांची कसून तपासणी; महसूलमंत्री बावनकुळे यांचे कठोर कारवाईचे संकेत
15-May-2025
Total Views |
मुंबई : ( inspection of Nagpur mining areas Minister Bawankule ) नागपूर जिल्ह्यातील खदानी तसेच खाण पट्ट्यात घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. “मी स्वतः खाणपट्ट्यांची तपासणी करेन आणि अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई करेन,” असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. मंत्रालयात आयोजित बैठकीत सुरगाव येथील ३४४ एकर शासकीय जागेचा उपयोग आणि खाणपट्ट्यांबाबत चर्चा झाली. आमदार राजू पारवे यावेळी उपस्थित होते.
सुरगाव शिवारातील पाणी साचलेल्या जुन्या खदानीत पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता. अशा खदानी भरून त्या समतल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. “खाणपट्ट्यांची नियमित तपासणी आवश्यक आहे. शर्तभंग करणाऱ्या खाणींवर कठोर कारवाई करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर जिल्ह्यातील खदानींमध्ये साचलेल्या पाण्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याने उपाययोजनांचा आग्रह बावनकुळे यांनी धरला. नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी सर्व खाणपट्ट्यांची तपासणी आणि देखरेखीवर भर देण्याचे त्यांनी सांगितले. यासह, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खाणींच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.