'लष्कराचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी तिरंगा यात्रा'
15-May-2025
Total Views |
मुबंई: (Chief Minister Fadnavis addressed at the Tiranga Yatra organized in Mumbai) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ, मुंबई येथे आयोजित तिरंगा यात्रेमध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करणे यासाठी आज तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला भारताचे लष्करी सामर्थ्य दिसून आले आहे. पाकिस्तानला भारताच्या लष्करी सामर्थ्यापुढे गुडघे टेकावे लागले आहेत. भारताची संरक्षण तयारी आणि सुरक्षा यंत्रणा भक्कम असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
यात्रेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनाही अभिवादन केले. ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरू झालेली यात्रा गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समाप्त करण्यात आली. समारोपावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण केले आणि टिळक स्मारकास अभिवादन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री पंकजा मुंडे, आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर माजी सैनिक व इतर मान्यवर उपस्थित होते.