मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) या दोन्ही टी-२० लीग्सची मुळात तुलनाच होऊ शकत नाही. मात्र, पाकिस्तानी खेळाडूंना भारतात बंदी आणल्यानंतर त्या देशाने स्वतंत्र क्रिकेट प्रिमिअर लीग सुरू केली. मुळात अशा प्रकारचे सामने खेळवले जाऊ शकतात ही संकल्पनाच मुळी भारतीय व्यक्तीची होती.
आतापर्यंत झालेल्या एकूण १७ आयपीएल सिझनपर्यंत भारतात याचे वेड अबालवृद्धांपर्यंत साऱ्यांनाच लागले आहे. आयपीएल आता क्रिकेटचा महाकुंभ बनला आहे. त्याच धर्तीवर इथे होणारी आर्थिक उलाढाल तर त्याहून जास्त आहे. क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क, जाहिराती, तिकीट बुकींग, थेट प्रक्षेपण याची आर्थिक उलाढालच एकूण ५० हजार कोटींच्या घरात आहे. यात केवळ जाहिरातींतून मिळणारे उत्पन्नच ४५०० कोटी आहे. प्रायोजकत्वावर मिळणाऱ्या उत्पन्नाची रक्कम १३०० कोटी इतकी आहे. तर माध्यम प्रसारण हक्क ४८ हजार ३९० कोटींना विकले जातात.
यात खेळाडूंना मिळणारे मानधन, जिंकल्यानंतर मिळणारी रक्कम हा हिशोब तर वेगळाच आहे. आयपीएलच्या २०२३ सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सला विजेतेपदासाठी एकूण २० कोटी रुपये मिळाले, तर पीएसएलमध्ये २०२४ साली इस्लामाबाद युनायटेडला फक्त ४.१३ कोटी पाकिस्तानी रुपये मिळाले. यावरून पाकिस्तानी प्रिमिअर लीगचा आवाका लक्षात येईल. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या तणावामुळे स्थगित झालेल्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेची पुन्हा सुरुवात शनिवारी, १७ मे रोजी होणार आहे. ८ मे रोजी सुरक्षतेच्या कारणांमुळे सुपर लीग स्थगित केली होती. यानंतर उर्वरित सामने युएई मध्ये घेण्याचे ठरले होते, मात्र परवानगी न मिळाल्याने ते रद्द करण्यात आले. पाकिस्तानी खेळाडूंना स्वतःच्याच देशात आयपीएल खेळण्यासाठी भीती वाटत आहे, हे देखील यावरुन स्पष्ट झाले होते.
आता उर्वरित आठ सामने रावळपिंडी आणि लाहोर येथे खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना २५ मे रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पार पडणार आहे. हा सामना मूळ वेळापत्रकानुसार ठरलेल्या तारखेच्या एक आठवड्यानंतर पार पडणार आहे. या वेळापत्रकातील बदलामुळे पाकिस्तानची बांगलादेशविरुद्धची टी २० मालिका पुढे ढकलली जाऊ शकते. कारण या मालिकेचा पहिला सामना अंतिम फेरीच्या दिवशी खेळला जाणार होता.
स्पर्धा स्थगित झाल्यानंतर परदेशी खेळाडूंनी पाकिस्तान सोडले होते. इंग्लंडचे सॅम बिलिंग्स, जेम्स व्हिन्स आणि डेव्हिड विली हे खेळाडू या स्पर्धेत खेळणार होते. मात्र, आता ते पुन्हा खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. ‘पीएसएल’ अर्धवट सोडल्यामुळे अनेक सामने शिल्लक आहेत. त्यानंतर क्वालिफायर, दोन एलिमिनेटर आणि अंतिम सामना अशी असे सामने होतील. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये कोटेटा ग्लॅडिएटर्स या संघानेच नॉकआऊटमध्ये प्रवेश निश्चित केला आहे, तर मुलतान सुलतान्स हा बाहेर पडलेला संघ आहे.
मीडिया हक्क आणि ब्रँड मूल्याच्या बाबतीतही पीएसएल मागेच आहे. आयपीएलची ब्रॅण्ड व्हॅल्यू ८८००० कोटींची आहे. त्याधर्तीवर पीएसएलचे मुल्य केवळ २७०० कोटी आहे. या माहितीवरुन सहज आयपीएलचे वर्चस्व दिसून येते.
खेळाडूंच्या पगारातही फरक आहे. आयपीएलमध्ये मिचेल स्टार्कला २४.७५ कोटींची बोली मिळाली, तर पीएसएलमध्ये प्लॅटीनम श्रेणीतील खेळाडूंना जास्तीत जास्त १.७० कोटी मिळतात. आयपीएलची ट्रॉफी कोणत्या संघाला मिळते ह्यावरून भारतीयांमध्ये एक वेगळीच स्पर्धा दिसून येते. जागतिक स्तरावर आयपीएलला जो दर्जा प्राप्त आहे, तो पीएसएलला नाही. अशा विविध पैलूंवरून हे स्पष्ट होते की आयपीएल आर्थिकदृष्ट्या, लोकप्रियतेत आणि क्रिकेट गुणवत्तेत पीएसएल पेक्षा खूपच पुढे आहे.